Skip to main content
x

ब्रह्मचारी, अनंत महाराज

चितारीबुवा

     पल्या चित्रकलेच्या कलाकारीमुळे ‘चितारीबुवा’ हे नामाभिधान मिळालेले अनंत महाराज यांना ‘ब्रह्मचारीबुवा’, ‘जटाधारीबुवा’ यांही नावांनी ओळखले जाते. पैठण, औरंगाबाद, नाते, महाड, हरिहरेश्वर, निपाणी, सावंतवाडी इत्यादी भागांत त्यांचा भक्तगण, शिष्य परिवार पसरला आहे. श्री अनंत महाराजांचा जन्म कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या माता-पित्यांबद्दल, अन्य कुटुंबकुळाबद्दल माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांच्या जन्मतारखेबद्दलही अनभिज्ञताच आहे.

     परंतु साधारणपणे १८३०च्या दशकात त्यांचा जन्म झाला असावा आणि १८५० च्या दशकात त्यांचे आध्यात्मिक कार्य बहरले. महाराजांनी देखील प्रसिद्धीपराङ्मुख राहून स्वत:बद्दलची ओळख गूढ ठेवली होती. मात्र, अनंत महाराज यांच्या आध्यात्मिक अधिकारामुळे त्यांचा भक्तसंप्रदाय हळूहळू वाढत गेला. त्यांच्या घरात परंपरेने नाथभक्ती मात्र होती. महाराज लहानपणापासूनच मितभाषी, त्यामुळे त्यांनी आपली अभिव्यक्ती आपल्या चित्रकलेतून आणि काव्यातून प्रामुख्याने प्रकट केली. अनंत महाराज नऊ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी घर त्यागले. सोबत घरातील ‘रुक्मिणी स्वयंवर’ हा ग्रंथ घेतला आणि जवळच्या गोकर्ण गावातील ब्रह्मगिरीचा डोंगर गाठला.

     ब्रह्मगिरीवर त्या काळी योगेश्वर हे साधुपुरुष वास्तव्य करून होते. त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती, असे गावकरी म्हणत. त्यामुळेच श्री अनंत महाराज यांनी त्यांची सहा महिने अगदी मनोभावे सेवा केली. आध्यात्मिक आचरण, साधना, शिकून घेतल्या; पण सारे मूक अवलोकनातूनच. कारण, योगेश्वर गुरूंनी सहा महिन्यांत एका अक्षराचाही मौखिक संवाद श्री अनंत महाराज यांच्याशी केला नाही. खरे तर, ती श्री अनंत महाराज यांची सत्त्वपरीक्षाच घेतली होती गुरूंनी. कठोर कसोटीला उतरल्यानंतर योगेश्वर गुरूंनी त्यांना कृपाप्रसाद म्हणून ‘रुक्मिणी स्वयंवर’ उलगडून दाखवला. त्यातून अनंत महाराज यांना नवोन्मेषी दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे योगेश्वर गुरूंनी त्यांना आता पुढे वाटचाल करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील एक ज्योतिर्लिंंग श्रीहरिहरेश्वर येथे प्रस्थान ठेवण्यास आज्ञा केली. त्यानुसार कोकणातील श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील काळभैरव मंदिरात ते राहू लागले. काळ होता १८५० चे दशक. तेथे बारा वर्षांचे कठोर तपाचरण करून त्यांनी चार धाम यात्रा केली. एका ठिकाणी फार काळ राहून तेथे गुंतायचे नाही, हा त्यांचा विचार असे. त्यामुळे चार धामनंतर ते महाराष्ट्रात एकनाथ महाराज यांच्या पैठण क्षेत्री आले. तेथे घराण्याच्या परंपरेतील नाथभक्ती जोपासायचे ठरवले. पैठण मुक्कामी त्यांना कृष्णराव नावाचे एक सरकारी अधिकारी निष्ठावान शिष्य म्हणून लाभले. श्री अनंत महाराजांनी या काळात जटा वाढवल्या. त्यामुळे त्यांना जटाधारीबुवा म्हणूनही लोक संबोधू लागले. या काळात त्यांचा शिष्यगण वाढत होता. तेथे अमरावतीची एक  जगन्नाथ बापट नावाची उच्चविद्याविभूषित श्रीमंत व्यक्ती पूर्णपणे निरीच्छ होऊन महाराजांच्या सेवेस लागली. असे कित्येक प्रापंचिक, चितारी महाराजांच्या आध्यात्मिक विचारांनी प्रेरित होऊन संपूर्ण प्रपंचाचाच त्याग करून अथवा प्रपंचात राहूनही नाथभक्तिमार्गाचा अवलंब करते झाले.

     चितारी महाराजांच्या प्रबोधनाचा मुख्य भर चित्रमय शैलीतून संदेश देण्यावर असे. आपल्या शिष्यांना ते देवादिकांची चित्रे काढून देऊन त्यावरून संदेश देत. चितारी महाराजांनी १८८४ साली एक चित्र काढले होते. ते एका भव्य पुरुषाचे चित्र होते. त्या चित्रातील कलात्मकता तर चित्रकलेचा एक उत्कृष्ट नमुना ठरणारी आहेच; परंतु त्या चित्राचे वैशिष्ट्य असे, की त्या पुरुषाच्या देहावरील विविध अवयवांना त्यांनी मानवी भाव-भावनांनुसार, षडरिपूंनुसार विविध सांकेतिक नावे आणि वर्णन दिले आहे. त्या चित्रातील रंगसंगती आजही ताजी आणि अबाधित आहे. सध्या हे चित्र महाड येथील एका शिष्याकडे सुरक्षित आहे. रंगांसाठी ते बहुतेक करून नैसर्गिक वनस्पतींचा वापर करीत. महाराज जेथे - जेथे जात तेथे, तेथील मंदिर, मठात, आश्रमात ते चित्र चितारीत व तेथेच ठेवून देत. आजही नेवासे येथे श्री मोहिनीराजाच्या मंदिरात चितारी महाराज यांची आशयसंपन्न चित्रे आढळतात. औरंगाबाद, नाते, मांजरी, महाड अशा अनेक मंदिरांत त्यांची चित्रे आजही पाहायला मिळतात.

     आपल्या चित्र-शिल्पाप्रमाणेच सुदृढ साहित्यमूल्ये असलेली काव्यप्रतिभाही श्री चितारीबुवांनी शिष्यगणांमध्ये, तसेच आध्यात्मिक विषयांच्या वाचकांपुढे सादर केली आहे. त्यांची प्रार्थना गीते, स्तोत्रे, अष्टके, अभंग, पदे, नवविधगोपी हे आध्यात्मिक रूपक, कविता, इत्यादी मिळून साठ हजारांच्या जवळपास रचना आहेत. शकुंतला आख्यान, सुदामा, दामाजी, ध्रुव अशा पौराणिक व्यक्तिमत्त्वांची चरित्रेही त्यांनी शब्दबद्ध केली आहेत. याशिवाय ‘श्रीनाथलीला’, ‘श्रीनाथाष्टक’, ‘श्रीनाथस्तुती’ या चरित्रग्रंथांतून श्रीनाथमहाराजांचे चरित्र उलगडले आहे. चितारीबुवा यांचे चरित्र त्यांचे शिष्य बळवंत संत यांनी लिहिले आहे.

संदीप राऊत

ब्रह्मचारी, अनंत महाराज