Skip to main content
x

भागवत, विद्याधर गंगाराम

     विद्याधर गंगाराम भागवत यांचा जन्म त्यावेळच्या सावंतवाडी संस्थानातील वालावल (ता. कुडाळ) या खेडेगावात झाला. वडील सतत आजारी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्याच परिस्थितीत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावंतवाडीला सुरुवातीला काका आणि नंतर आत्याकडे राहून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आत्याचे यजमान पुजारी होते. त्यांच्या बरोबर भागवत देखील पूजा-अर्चा करण्यासाठी जात असत. सावंतवाडी संस्थानची राजधानी असल्याने दिवाण व सर्व अधिकारी इथेच राहत. या अधिकाऱ्यांकडे भागवत सकाळी सात ते दहा पर्यंत पूजा-अर्चा करायचे आणि अकरा ते साडेपाच शाळेत जायचे.

      मॅट्रीक नंतर बहिस्थ विद्यार्थी ( एक्स्टर्नल) म्हणून मराठी व संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी (एम.ए.) व बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गोव्यातील म्हापसा गावातील ज्ञानप्रसारक विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. पण एके दिवशी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘माझा भारत’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला. त्यात एका मुलाने निबंधाच्यावर तिरंगा ध्वज काढला होता. त्या काळी गोव्यात पोर्तुगीजांचा अंमल असल्याने भागवत यांना मारहाण करण्यात आली व एक दिवसाचा तुरुंगवासही भोगावा लागला. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना लपत-छपत सीमापार करून रत्नागिरी जिल्ह्यात आणले.

      त्यानंतर देवगड तालुक्यातील वाडा या खेडेगावात डॉ. नेनेंच्या सहकार्याने भागवत यांनी माध्यमिक शाळा सुरू केली. त्यासाठी स्थानिक आंबा व्यापारी अनंत केळकर यांनी काही एकर जमीन  व  त्यातील आंबापीक शाळेसाठी मदत म्हणून दिले. यातूनच अनंत कृष्ण केळकर विद्यालयाची सुरुवात झाली. परंतु वडिलांच्या आजारपणामुळे इथली नोकरी सोडून कुडासा या खेडेगावात राहण्यास गेले. कुडासामध्येच नवभारत एज्युकेशन सोसायटीच्या ‘खेमराज विद्यालयात’ त्यांनी सुरुवातीला शिक्षक आणि पुढे मुख्याध्यापक म्हणून काम केले. शिक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यात अ‍ॅड. रामनाथ सौदागर यांच्या सहकार्याने शाळेत पाचवी ते सातवी व ११ वी, १२ वी सायन्स विषयाच्या इयत्ता सुरू केल्या. यासाठी विज्ञान विषय साहित्याच्या अटी पूर्ण केल्या. शिवाय दोन खोल्या बांधल्या. वसतिगृह अधिक सुसज्ज करून इमारतीच्या खोल्या, स्वयंपाकघर व भोजनकक्ष वाढविले. यामुळे परिसरातील बत्तीस गावातील मुलांच्या शिक्षणाची व राहण्याची सोय झाली. त्याचबरोबर मुलांची गरज पाहून पेज योजना सुरू केली. तसेच भेडशी विद्यालयासाठी विहीर व मैदान तयार करून दिले. मडुरा विद्यालयामधील मुलांसाठी देखील पेज योजना सुरू केली. त्याचबरोबर कुडासे विद्यालयामधील १५ हुशार गरीब मुलांना दत्तक घेऊन त्याच्या ८ वीपासून पदव्युत्तरपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च केला व त्यांचे जीवन घडविले.

      कुडासे हे कोकणातील एक छोटेसे खेडे असल्याने तिथे एस.टी थांब्याची व विजेची देखील व्यवस्था नव्हती. गावातील वस्ती कमी या सबबीवर नेते मंडळी येथील सुधारणांकडे दुर्लक्ष करीत. परंतु भागवत यांनी संघर्ष करून व वेळप्रसंगी आर्थिक तूट सोसून गावात एस.टी. व विजेची व्यवस्था केली. त्याचा फायदा आजूबाजूच्या तीस गावांना देखील झाला. त्याचबरोबर शाळेतील मुलांसाठी देखील शाळा भरतेवेळी व सुटल्यानंतर अशा दोन गाड्या सुरू केल्या. तरीही मणेरी या गावातील मुलांना पाच कि.मी. डोंगराळ पायवाटेने चालत शाळेत यावे लागत होते. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्याने कुडासे व मणेरी दरम्यानची जागा मिळवून पाच कि.मी. लांबीचा कच्चा रस्ता तयार केला. आज तिथे डांबरी रस्ता झाला आहे.

      भागवत हे उत्तम लेखक व साहित्यिक होते. त्यांनी लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. स्वतःला लेखनकार्याला वाहून घेतले. भागवत लेखन, संपादनाबरोबरच साहित्य समीक्षाही करीत असत. कविता, कथा, कादंबरी, नभोनाट्य, बालसाहित्य, चरित्रादी प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केले. त्यांच्या बालकवी ठोंबरे यांच्या वरील ‘एैलतटावर - पैलतटावर’ या चरित्रात्मक कादंबरीला महाराष्ट्र शासन पुरस्काराबरोबरच अन्य सात पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांच्या कवितेला साहित्य अकादमी दिल्ली येथील ‘अखिल भारतीय कविता संग्रहात’ स्थान मिळाले आहे.

      भागवत यांनी नवसाहित्यिकांना घडविण्याचे काम केले आहे. नवसाहित्यिकांना लेखनासाठी प्रेरणा दिली, मार्गदर्शन केले व सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात साहित्य चळवळ उभी केली. वेगवेगळे साहित्यिक मेळावे, कार्यशाळा भरवून मोठ्या साहित्यिकांचे मार्गदर्शन नवसाहित्यिकांना मिळवून दिले. भागवत यांचे चिं.त्र्यं.खानोलकर तथा आरती प्रभू’ हे मित्र. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी ‘चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था’ स्थापन केली. याद्वारे नवीन साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करून त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच ‘आरती’ या नावाने वाङ्मयीन मासिकाची सुरुवात केली. त्यांचा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेमध्ये मोठा सहभाग आहे व त्यांनी कोकण विभागाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

      या शिक्षक- साहित्यिकाचे निधन गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाले. त्यांच्या स्मृतीत आरती मासिकातर्फे काव्य स्पर्धेचे आयोजन केले जाते व ‘विद्याधर भागवत शिशु वाटिका’ या नावाने ‘अटल प्रतिष्ठान’ तर्फे सावंतवाडी येथे बालशाळा चालविली जाते.

- विवेक वि. कुलकर्णी

भागवत, विद्याधर गंगाराम