Skip to main content
x

चांदेकर, शंकर विष्णू

चांदेकर, दादा

     शंकर विष्णू चांदेकर उर्फ दादा चांदेकर हे मराठी बोलपटाच्या पहिल्या दशकातील संगीतकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर इथे झाला. त्यांचे वडील विष्णुपंत यांना संगीताची चांगली जाण होती व ते भजन व कीर्तन करत असत. त्यामुळे दादाही अगदी लहान वयापासून आपल्या वडिलांकडेच संगीत शिकू लागले. त्यानंतर त्यांनी धम्मनखाँ व नीळकंठबुवा जंगम यांच्याकडेही संगीताची तालीम घेतली. पुढे शालेय शिक्षण सोडून, ते आपल्या वडिलांना भजनाच्या व कीर्तनांच्या कार्यक्रमात हार्मोनियमवर साथ करू लागले. यातूनच पुढे अर्थार्जनासाठी १९१४ मध्ये त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत संगीत साथीदाराची नोकरी पत्करली. दादांना १९१७-१८ च्या दरम्यान मा. दीनानाथ यांच्या बळवंत संगीत मंडळीत काम करण्याचा योग आला व पुढे जवळजवळ पंधरा वर्षे ते तिथेच स्थिरावले.

     बलवंत नाटक मंडळी बंद पडली, तेव्हा बोलपटांना सुरुवात व्हायला लागली होती. त्यामुळे १९३५ मध्ये दादांनी कोल्हापूर सिनेटोनमध्ये प्रवेश मिळवला. तिथेच त्यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘कालिया मर्दन’ या चित्रपटाला सर्वप्रथम संगीत दिलं. त्यानंतर दादांनी संगीत दिग्दर्शन केलेला प्रिन्स शिवाजी प्रॉडक्शनचा ‘स्वराज्य सीमेवर’ हा चित्रपट आला.

     १९३७ मध्ये ‘प्रेमवीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हंस पिक्चर्सचे मालक व दिग्दर्शक मा. विनायक यांनी मुंबईहून कोल्हापूर इथे स्थायिक होऊन ‘ब्रम्हचारी’ चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली. त्यांनी दादा चांदेकरांना या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून नेमलं. त्या काळी चित्रपट संगीतावर मराठी नाटक व शास्त्रीय संगीत यांचा जबरदस्त प्रभाव होता. ‘ब्रम्हचारी’ (१९३८) या चित्रपटानं मराठी चित्रपट संगीताला या प्रभावातून बाहेर काढलं व त्याला अधिक आकर्षक रूप दिलं. या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली. परंतु नायिका मीनाक्षीने पोहण्याचा पोषाख घालून गायलेलं ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया, का लाजता’ या गाण्यानं धमाल उडवून दिली. आजही चित्रपट संगीताच्या इतिहासात त्या गाण्याला विशेष स्थान आहे.

     ‘ब्रम्हचारी’नंतर मा. विनायक व दादा चांदेकर या जोडीने अनेक चित्रपट केले. ‘ब्रँडीची बाटली’, ‘अर्धांगी’, ‘लग्न पहावं करून’, ‘अमृत’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’ ही त्यापैकी गाजलेली काही विशेष नावं. दादांनी ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात सर्वप्रथम लता मंगेशकर यांच्याकडून गीत गाऊन घेतलं. त्या चित्रपटात लता मंगेशकरांनी अगदी छोटीशी भूमिकाही केली होती. यानंतर दादांनी नवयुग चित्रपट लिमिटेडच्या ‘तुझाच’ व ‘पुंडलिक’ या दोन चित्रपटांना संगीत दिलं. त्याच काळात दादांनी काही मोजक्या हिंदी चित्रपटांनाही संगीत दिलं.

     चित्रपट संगीताला नाट्यसंगीताच्या प्रभावातून बाहेर काढणार्‍या दादा चांदेकरांनी ‘जय मल्हार’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत ग्रामीण संगीताचा पाया घातला. त्यातील गाणी खूपच गाजली. ‘नांदाय जावे खुशा हितं र्‍हावं’, ‘कुठं चाललीस गं चंद्रावळी’, ‘काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला’, ‘माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं’, ‘छबीदार नार गुलजार चालली नटून’ या गाण्यांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. यानंतर दादांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं. त्यातील आचार्य अत्रे यांच्या ‘मोरूची मावशी’ व ‘ब्रम्हघोटाळा’ यांचं संगीत खूप गाजलं. १९६४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वाघ्यामुरळी’ हा दादा चांदेकर यांनी संगीत दिलेला अखेरचा चित्रपट.

     यानंतर चित्रपटसृष्टीतून काहीसं बाजूला होऊन दादांनी पुणे आकाशवाणीवर नोकरी पत्करली. तिथे सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांचं संगीत संयोजन केलं. १९६४ ते १९७५ या अकरा वर्षांच्या काळात त्यांनी शेकडो संगीत कार्यक्रमांचं संयोजन केलं. नंतर वयाच्या ७८ व्या वर्षी १९७५ मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती पत्करली.

    अखेरीस पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. 

- शशिकांत किणीकर

चांदेकर, शंकर विष्णू