Skip to main content
x

चोणकर, नलिनी कृष्णराव

     बालगंधर्वांच्या नाटक कंपनीत गायक व नट म्हणून काम करणारे, तसेच ‘सोनी महिवाल’, ‘अफगाण अबला’, ‘सौभाग्यलक्ष्मी’ आदी बोलपटांमधून अभिनेते म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणाऱ्या कृष्णराव चोणकर यांची कन्या म्हणजे नलिनी चोणकर. घरातूनच अभिनयाचा वारसा लाभलेल्या नलिनी यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्या आवडीपोटीच त्यांनी नृत्याचे रीतसर शिक्षणही घेतले होते.

     रेखीव चेहरा आणि आकर्षक डोळे असणाऱ्या नलिनी चोणकर यांना दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी १९५७ साली ‘घरचं झालं थोडं’ या विनोदी चित्रपटात काम दिले. राजा गोसावी यांच्यासारख्या कसलेल्या नटाबरोबर केलेल्या त्यांच्या अभिनयाला आणखी झळाळी आली आणि पदार्पणातल्या या चित्रपटानेच त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

    अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर होणाऱ्या नलिनी चोणकर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवेशही दमदार ठरला, तो ‘राणी रूपमती’, ‘साजिश’ या चित्रपटांतील भूमिकांमुळे. त्यांनी साकारलेल्या नायिकांच्या भूमिकांमुळे ‘श्रावणकुमार’, ‘सिंहलदीप की सुंदरी’ हे हिंदी चित्रपटही खूप गाजले.

    १९५९ साली राजा नेने दिग्दर्शित ‘याला जीवन ऐसे नाव’ या विनोदी चित्रपटात नलिनी चोणकर यांनी महत्त्वाची भूमिका केली. मधुसूदन कालेलकर निर्मित या चित्रपटात जयश्री गडकर, राजा गोसावी, शरद तळवलकर या कलाकारांसमवेत नलिनी यांनीही खूप तन्मय होऊन भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयातील वैशिष्ट्य लक्षात आल्यावरच त्यांना हिंदीतील ‘मदन मंजिरी’, ‘मॉडेल गर्ल’, ‘पिया मिलन की आस’ या चित्रपटांतून भूमिका मिळाल्या.

     मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून नावाजल्या गेलेल्या नलिनी चोणकर यांनी वडील कृष्णराव चोणकर यांच्या दिग्दर्शनाखाली ‘नंदादीप’ (१९६२) या चित्रपटाची निर्मिती केली. तसेच यात त्यांनी गुजराती अभिनेते विजयदत्त यांच्यासमवेत नायिकेची भूमिकाही साकारली.

     चित्रपटनिर्मितीत अपयशी ठरूनही नलिनी चोणकर यांनी आपली अभिनयाची कारकिर्द सुरूच ठेवली, म्हणूनच प्रेक्षकांना त्यांच्या भूमिका असलेले ‘भाभी’, ‘पारसमणी’, ‘बाजे घुंघरू’ हे चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला. ‘पारसमणी’ चित्रपटातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा....’ हे नलिनी चोणकर यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही प्रेक्षकांना भुरळ घालते. देवाच्या नावाने सोडलेल्या स्त्रीची मानसिक कुचंबणा दाखवणाऱ्या ‘वाघ्यामुरळी’ (१९६४) या मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेले मुरळीचे दैन्य त्यातल्या बारकाव्यांनिशी नलिनी चोणकर यांनी सक्षमपणे आपल्या भूमिकेतून उलगडले आहेत.

    गुजराती भाषा ज्ञात असणाऱ्या नलिनी चोणकर यांनी ‘ढोल मारु’, ‘पाकीटमार’, ‘रानी रिक्षावाली’ या गुजराती चित्रपटांतूनही केलेले काम त्यांना पुरस्काराचे मानकरी ठरवून गेले. ‘मत्स्यगंधा’, ‘प्रीतिसंगम’, ‘मीरामधुरा’, ‘बावनखणी’, ‘अठरावं वरीस धोक्याचं’ अशा नाटकांमधून नलिनी चोणकर यांनी साकारलेल्या भूमिकांनी रंगमचांविषयीची त्यांची जाणही व्यक्त झाली, तसेच त्यांच्या कामाचे खूप कौतुकही झाले.

    ‘मीरामधुरा’ नाटकातील त्यांचे सहकलाकार विश्‍वनाथ बागुल यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर त्यांचा चित्रपटसृष्टीशी असणाऱ्या संपर्क कमी झाला व जो राहिला तो केवळ हिंदी चित्रपटांशीच. म्हणूनच मिथुन चक्रवर्ती आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी भूमिका केलेल्या ‘प्यारी बहना’ या चित्रपटानंतर त्या या क्षेत्रातून निवृत्त झाल्या. पण नृत्य व अभिनयाशी असणारे त्यांचे दृढ नाते त्यांना स्वस्थ बसू देईना म्हणून त्यांनी १९८५ साली नृत्य आणि अभिनय याचे शिक्षण देणारी संस्था सुरू केली.

    अर्धांगवायूच्या झटक्याने निकामी झालेल्या शरीरामुळे मनही खंगत गेले व त्यातच त्या निवर्तल्या.

- संपादित

चोणकर, नलिनी कृष्णराव