दांडेकर, रामचंद्र नारायण
रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म सातारा येथे झाला. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले व जर्मनीतील हायडलबर्ग विद्यापीठातून त्यांनी संस्कृत विषयाची एम.ए. पदवी मिळविली. मुंबई विद्यापीठातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयातही त्यांनी एम.ए. केले. दोन्ही एम.ए. परीक्षांमध्ये ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. जर्मनीतील हायडलबर्ग विद्यापीठातून १९३८ साली पीएच.डी. मिळवली. (याच विद्यापीठाने पन्नास वर्षांनंतर, म्हणजे १९८८ साली त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जुन्या पदवीचे नूतनीकरण करून एका विशेष समारंभात सन्मानपूर्वक पदवी प्रदान केली.) आणखी दोन वर्षे शिष्यवृत्ती मिळाल्याने जर्मनीत अध्ययन करून त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत व प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्राध्यापक म्हणून १९५० पर्यंत शिकवले. १९४५ ते १९५० या काळात ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य व सेक्रेटरी होते. १९५० साली नव्याने स्थापन झालेल्या पुणे विद्यापीठात संस्कृत विभागप्रमुख व प्राध्यापक म्हणून दाखल झाले. (१९५० ते १९६९). पुणे विद्यापीठान्तर्गत असलेल्या प्रगत संस्कृत अध्ययन केंद्राचे ते संचालक झाले. (१९६४ ते १९७४). १९५९ ते १९६५ या काळासाठी पुणे विद्यापीठात कला शाखेचे ते प्रमुख झाले.
अनेक संस्कृत संमेलनांमध्ये सदस्य, निमंत्रित सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष अशी सन्माननीय पदे त्यांना मिळाली आहेत. भारत सरकारच्या शिक्षण खात्याच्या राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे सदस्य, युनेस्कोतर्फे सांस्कृतिक संबंधविषयक भारतीय काउन्सिलचे सदस्य ही त्यांतील वेचक नावे. अनेक देशी-परदेशी महत्त्वाच्या नियतकालिकांच्या संपादकीय मंडळांवर ते होते. भारतीय व भारताबाहेरील विशेषत: संस्कृत, भारतविद्या, प्राच्यविद्या यांविषयक काम करणाऱ्या अनेक विद्यापीठांशी त्यांचा संबंध आला.
१९३९ या वर्षी त्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यपद मिळाले. त्यांनी आपले अध्यापन क्षेत्र पक्के केले आणि भांडारकर संस्थेचे सक्रिय सदस्यपद स्वीकारले. अखेरपर्यंत ते भांडारकर संस्थेशी निगडित होते.
दांडेकरांनी मराठी, संस्कृत व इंग्लिश या भाषांमधून विपुल लेखन करून आपल्या विद्वत्तेची वारंवार प्रचिती आणून दिली आहे. या सर्वांत महत्त्वाचा ठरू शकेल, असा ग्रंथ म्हणजे त्यांनी केलेली वैदिक ग्रंथांची, लेखांची सूची (वैदिक बिब्लिओग्रफी - पाच भागांमध्ये) फ्रेंच विद्वान लुई रनू यांनी १९४५ पर्यंतच्या वैदिक अध्ययनाची एक सूची छापली होती. त्यानंतरच्या काळात संस्कृत, भारतविद्या यांच्यावर विपुल लेखन झाले.
१९४५ पासून १९९० पर्यंतच्या पंचेचाळीस वर्षांच्या कालावधीत निरनिराळ्या कालखंडांसाठी बिब्लिओग्रफी-सूची छापली आहे. सुरुवातीला कोणत्या नियतकालिकातून लेख, परीक्षणे घेतली आहेत, त्यांची सूची आहे. नंतर विषयवार विभागणी करून (सुमारे १९० वर्ग) पुस्तके व लेख यांची अकारविल्हे यादी दिली आहे. अभ्यासकाला ही सूची त्याच्या मार्गदर्शकाइतकीच मार्गदर्शक ठरते. त्यांची ग्रंथसंपदा मोजकी असली, तरी ती मूल्यवान आहे. त्यांच्या ग्रंथांपैकी ‘वैदिक देवतांचे अभिनव दर्शन’ (१९५१), ‘अ हिस्टरी ऑफ द गुप्ताज’ (१९४१), ‘सम अस्पेक्टस ऑफ द हिस्टरी ऑफ हिंदूइझम’ (१९६७), ‘सुभाषितावलि’, ‘रसरत्न प्रदोपिका’ (१९४५), ‘श्रौतकोश’ (सहकार्याने), महाभारत (काही पर्वे त्यांंनी संपादिली) वगैरे प्रसिद्ध आहेत.
डॉ. दांडेकरांनी इतक्या प्रदीर्घ काळात अध्यापन केले, मार्गदर्शन केले. ठिकठिकाणी देशात व देशाबाहेर भेटी दिल्या. त्यामुळे त्यांचा शिष्यवर्ग व चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांना १९६९ साली त्यांच्या साठाव्या वर्षी व १९८४ साली त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या वेळी ‘अमृतधारा’ असा ग्रंथ अर्पण करून त्यांच्या शिष्यवर्गाने आपली गुरुदक्षिणेची पुष्पे अर्पण केली आहेत.
वृद्धापकाळातही ते तरुणांइतकेच कार्यरत होते. सरस्वती देवीच्या कृपेने यश व कीर्ती कशी लाभते याचे उदाहरण म्हणजे डॉ. रामचंद्र नारायण दांडेकर होत. पुणे येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
— संपादित