देसाई, अनुराधा जितेंद्र
अनुराधा जितेंद्र देसाई यांचा जन्म आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली. त्यांचे वडील पद्मश्री डॉ. बी.व्ही. राव यांच्या अकाली निधनामुळे त्यांना ‘वेंकटेश्वरा हॅचरीज ग्रूप’ या संस्थेची धुरा सांभाळावी लागली. त्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे आणि योगदानामुळे भारतीय कुक्कुटपालन उद्योगाला स्थैर्य मिळाले, अपूर्व प्रगती झाली आणि या उद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होऊ लागला. या उद्योगाने घेतलेल्या भरारीमुळेच आज भारत अंडी उत्पादनात जगात दुसऱ्या व मांसल पक्षी उत्पादनात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. कुक्कुटपालकांना अंड्यांचा चांगला व योग्य दर मिळावा यासाठी भारतामध्ये दरडोई अंडी खाण्याच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी, तसेच भारतातून इतर देशांना होणाऱ्या अंड्यांच्या निर्यातीमध्ये वाढ होण्यासाठी ‘राष्ट्रीय अंडी समन्वय समिती’च्या अध्यक्षा या नात्याने अनुराधा देसाई यांनी अतुलनीय योगदान दिलेले आहे.
जागतिक कुक्कुटशास्त्र संघटनेच्या भारतीय शाखेने देसाई यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे सप्टेंबर १९९६मध्ये कुक्कुटपालकांचा आणि व्यावसायिकांचा २०वा जागतिक मेळावा आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शन यशस्वीपणे केले. या संघटनेच्या ७५ वर्षांच्या इतिहासात असा मेळावा प्रथमच एका विकसनशील देशात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये संघटनेच्या पुढील चार वर्षांसाठी देसाई यांची अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. देसाई या हे पद भूषवणाऱ्या पहिल्याच महिला आणि सर्वांत लहान वयाच्या व्यक्ती ठरल्या.
वेंकटेश्वरा हॅचरीज ग्रूपच्या अनेक कंपन्यांच्या संचालकपदाबरोबर देसाई यांनी कृषी व कृषिसंलग्न उद्योगविषयक आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे अध्यक्षपद भूषवले आहे. भारतीय उद्योगधंद्यांच्या स्थायी प्रतिष्ठान, एम.एस. स्वामिनाथन संशोधन प्रतिष्ठान, योजना आयोगाने दहाव्या पंचवार्षिक योजनेसाठी (२००२-२००७) कृषी व कृषीसंबंधित विभागासाठी गठित केलेला सुकाणू गट, कृषिशास्त्रातील सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या संस्था व सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय औद्योगिक संस्थेच्या कृषी आधारित व्यवस्थापनविषयक पदव्युत्तर मंडळ यांवर त्यांनी सदस्य म्हणून केलेले कार्यही उल्लेखनीय आहे.
अनुराधा देसाई यांच्या नेतृत्वाखाली वेंकटेश्वरा हॅचरीज ग्रूपने कुक्कुट उद्योगाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ केली आणि कोंबड्या, अंडी व इतर कुक्कुट उत्पादनांच्या निर्यातीमध्ये नवनवीन उच्चांक स्थापन केले. या ग्रूपला या कामगिरीबद्दल १९८६ ते २००४ सतत १८ वर्षे राष्ट्रीय उत्पादन परिषदेची आणि १९९३ ते २००८ सतत १५ वर्षे उत्कृष्ट निर्यातीबद्दल अॅपेडा पारितोषिके देण्यात आली आहेत. देसाई यांना १९९० मध्ये पणन व्यवस्थापन संस्थेचे उत्कृष्ट महिला उद्योजिका सुवर्णपदक; १९९६मध्ये युवाभारतीकडून जागतिक महिलादिनी उत्कृष्ट महिला उद्योजिका पारितोषिक; विशेष उल्लेखनीय साध्यासाठी फाय प्रतिष्ठानचे पारितोषिक; १९९७ मध्ये वाणिज्य प्रतिष्ठेसाठी आंतरराष्ट्रीय पारितोषिक; २००३ मध्ये आयकर आयुक्त, पुणे यांचे अधिकतम आयकर भरणाऱ्यांना दिले जाणारे पारितोषिक; २००३ मध्ये दिल्ली येथील आर्थिक अभ्यास संस्थेकडून उद्योगरत्न पारितोषिक; २००२ मध्ये नवी दिल्ली येथील पणन आणि व्यवस्थापन संस्थेचे उत्कृष्ट महिला उद्योजिका पारितोषिक; २००३ मध्ये रेसिडेन्सी क्लब, पुणे या संस्थेकडून उत्कृष्ट सामुदायिक उद्योगासाठी पुणेभूषण २००३ पुरस्कार; २००४ मध्ये पुणे विद्यापीठ आणि विजिटेक्स प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने उद्योगरत्न पुरस्कार; २००८ मध्ये ट्रेड लीडर्स क्लब, माद्रिद (स्पेन) या संस्थेकडून उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि गुणवत्तेसाठी न्यू मलेनियम सुवर्णपदक; २००९ मध्ये संवाद पुणेतर्फे कुक्कुट व्यवसायातील योगदानाबद्दल साहेब पुरस्कार; बर्क्स विद्यापीठ, ब्रिटिश वेस्ट इंडिजकडून सन्माननीय पीएच.डी. पदवी; २००९ मध्ये तमिळनाडू पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विद्यापीठाकडून कुक्कुट जगतासाठी सेवा प्रदान केल्याबद्दलल पीएच.डी. पदवी मिळाली आहे. त्यांनी अनेक संस्थांना मदत केली आहे, त्यात ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र, पुणे या संस्थेचा उल्लेख करावा लागेल. या संस्थेचे चार पुरस्कार वेंकटेश्वरा हॅचरिज ग्रूपने पुरस्कृत केले आहेत.
- संपादित