देशपांडे, गौरी अविनाश
गौरी देशपांडे या दिनकर धोंडो कर्वे व इरावती कर्वे यांच्या कन्या असून त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. इंग्रजी वाङ्मयात एम.ए.पीएच.डी. प्राप्त केली. ‘दि इमेज ऑफ द सेन्ट इन मॉडर्न इंग्लिश लिटरेचर’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. अठराव्या वर्षी विवाह झाला. घटस्फोट घेतल्यानंतर त्या मुंबईत आल्या. ‘इलस्ट्रेटेड वीकली’मध्ये संपादन खात्यात त्यांनी काम केले. सुरुवातीला इंग्रजीमधून काव्यलेखन केले. १९७०साली ‘कावळा चिमणीची गोष्ट’ ही त्यांची पहिली कथा ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाली. १९७४मध्ये ‘कारावासातून पत्रे’ ही पहिली लघुकादंबरी लिहिली. कादंबरी-लेखनामुळे कथा-लेखन मागे पडले खरे, परंतु कथा या वाङ्मय प्रकारातही त्यांनी खूप प्रयोग केले. १९७५ ते १९८४ या काळात त्यांनी ‘अरेबिअन नाइट्स’च्या सोळा खंडांच्या अनुवादाचे प्रचंड काम हातावेगळे केले.
त्यांचे ‘एकेक पान गळावया’ (१९८०) हा कथासंग्रह, ‘आहे हे असं आहे’ (१९८६) हा कथासंग्रह, ‘तेरुओ’ आणि ‘काही दूरपर्यंत’ (१९८५), ‘निरगाठी’ आणि ‘चंद्रिके ग, सांरिके !’ (१९८७), ‘दुस्तर हा घाट’ आणि ‘थांग’ (१९८९) ह्या लघुकादंबर्या तर ‘मुक्काम’ (१९९२), ‘गोफ’ (१९९९), ‘उत्खनन’ (२००२) ह्या कादंबर्या आणि ‘विंचुर्णीचे धडे’ हे आत्मकथनपर पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ‘अरेबिअन नाइट्स’, ‘आहे मनोहर तरी’ (सुनीता देशपांडे), ‘तराळ अंतराळ’ (शंकरराव खरात), ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ (अविनाश धर्माधिकारी), ‘महानिर्वाण’ (सतीश आळेकर), ‘माता द्रौपदी’ (विद्याधर पुंडलिक) या पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले.
‘गौरी देशपांडे’ ही नाममुद्रा सर्वसाधारणपणे साठोत्तरी मराठी साहित्यातील आधुनिकतेची, अत्याधुनिक जीवनदृष्टीची आणि साहित्यगत प्रयोगशीलवृत्तीचीच स्वत्वखूण आहे, असे म्हणता येईल. गौरी देशपांडे ह्यांनी निर्माण केलेल्या साहित्याने एकूण मराठी साहित्याला नवा संस्कार, नवी मूल्यदृष्टी-विचारदृष्टी तर दिलीच; पण मराठी साहित्यात जो आशयात्मक आवर्त निर्माण झाला होता, तो भेदण्याचे काहीसे क्रांतिसदृश कार्यही त्यांच्या साहित्यकृतींनी केले. साठोत्तरी साहित्याचा एक विशेष म्हणजे त्यातून व्यक्त होणारी सामाजिक परिवर्तनाची अपेक्षा-आकांक्षा करणारी ‘बंडखोरी’ होय. जीवनाच्या (वैयक्तिक आणि सामाजिक-सांस्कृतिक) पूर्वसिद्ध वाङ्मयीन आशय-अभिव्यक्तिरूपांना नकार देणारी जी साहित्यरूपे साठोत्तरी काळात उदयाला आली, आणि ज्या साहित्यकृतींनी रूढ मराठी विचाराचे परिप्रेक्ष्य बदलण्याची आत्यंतिक निकड व्यक्त केली, अशा साहित्यकृतींमध्ये गौरी देशपांडे ह्यांच्या साहित्यकृतींचा समावेश अग्रत्वाने होतो. लोकप्रिय आणि लोकानुयायी साहित्यनिर्मितीच्या रुळलेल्या वाटांवरून प्रवास करण्याला नकार देणारी लेखनदृष्टी दूर सारण्याची भूमिका घेणारी असंख्य वाङ्मयकुळे अस्तित्वात असताना ज्या लेखकांनी निष्ठेने वेगळे मार्ग स्वीकारले, त्यांत गौरी देशपांडे यांचा समावेश सहजच होतो.
मराठी साहित्यातील स्त्रियांचे वाङ्मयीन योगदान अत्यंत लक्षणीय स्वरूपाचे आहे. रूढ वाङ्मयरूपांना आणि सामाजिक-सांस्कृतिक आशयरूपांना ठाम नकार देणारे स्त्रीनिर्मित साहित्यही संख्येने दखल घेण्याएवढे आहे. स्त्रीनिर्मित साहित्यात एक महत्त्वाचा टप्पा निर्माण करणार्या विभावरी शिरूरकर यांच्या बहुचर्चित साहित्यानंतरचा परिवर्तनाचा अध्याय गौरी देशपांडे यांच्या अखेरच्या साहित्यकृतीपर्यंत (उत्खनन) सामर्थ्याने सरूप झाला, असे स्पष्टपणे जाणवते. स्त्रीसाहित्याला आशय, अभिव्यक्ती, अंतिम परिणाम, प्रभावशीलता, प्रभावक्षमता आणि वेगवेगळ्या साहित्यगत आणि जीवनगत जीवनदृष्टीची जोपासना करण्याचे नवे आयाम गौरी देशपांडे यांच्या साहित्याने दिले, हे निःसंशयपणे मान्य करावे लागते.
गौरी देशपांडे यांच्या सर्व साहित्यकृतींमधील पात्रे बहुविध प्रकारची आहेत. त्या पात्रांच्या जगण्याचा वेध घेताना लग्नसंस्था, कुटुंबसंस्था, शिक्षणसंस्था आणि अन्य संस्थाव्यवस्थांचा त्या वेध घेतात. त्यांचे तुरुंगमय स्वरूप त्या स्पष्टपणे साकारतात. संस्थाव्यवस्थांनी निर्माण केलेल्या जाचक बंधनांची स्वत्व आणि सत्त्वहीन केलेल्या पात्रप्रतिमा उभारून देशपांडे यांनी सर्वंकष जीवनवास्तवाला मुखरीत केले आहे. ‘एकेक पान गळावया’पासून ‘उत्खनन’पर्यंत या वास्तवाचे बहुमुखी, बहुस्तरीय तांडव त्या व्यक्त करतात. या विशिष्ट वास्तवाचा आपपतः भाग झालेल्या आणि रूढ अरूढ नात्यांनी एकमेकांशी बांधल्या गेलेल्या पात्रांचे परस्परसंबंध अतिशय संवेदनशील-समंजसशील वृत्तीने त्या व्यक्त करतात. देशपांडे यांच्या सर्व निर्मितीत ही जाणकारी सहजभावाने व्यक्त झालेली आहे. गौरी देशपांडे यांच्या सर्व साहित्यकृतींमधील ‘निवेदक-पात्रे’ स्त्रीरूपांत प्रकटली असून या पात्रांना व्यक्ती, समाज, मानवीसंबंध आदी सर्व घटकांबद्दल अनन्य आस्था, कुतूहल आणि ममत्व असलेले जाणवते. ही निवेदक-पात्रे निर्मात्याची प्रवक्ती-पात्रे नाहीत. ती केवळ ‘कागदी पात्रे’ न राहता जीवनाचा सूक्ष्म विचार करणारी ‘लिव्हिंग कॅरेक्टर्स’ झाली आहेत. ही पात्रे स्वायत्त-स्वतंत्र आहेत; पण त्यांच्याठायी गौरी देशपांडे यांची मानसिकता व त्यांचे विचार जणू आनुवंशिकतेने संक्रमित झाले आहेत. त्यांची निवेदक-पात्रे स्त्रीदेहधारी आणि स्त्रीमनधारी आहेत. लग्न-कुटुंब-लैंगिकजीवन-नात्यांची व्यामिश्रता- त्यातील जटिलता- जीवनातील श्रेयप्रेयस कल्पना-‘स्व’चे होणारे शोषण, संघटन-विघटन-‘पर’शी येणारा संबंध, समाजसंस्कृती, भाषासंस्कृती तसेच माणसाचा आदिमतेशी असलेला अव्याहत संबंध या सर्वांचे स्त्रीच्या जीवनप्रेरणेतून ‘निकट वाचन’ आणि बहुस्तरीय अर्थशोधन त्यांनी केले आहे.
गौरी देशपांडे यांनी आपल्या लेखनाद्वारे विचार व आशय या पातळ्यांवर महत्तम असे वाङ्मयीन कार्य केलेले आहेच, पण त्याचबरोबर कथारचनेच्या पातळीवरही त्या एक प्रयोगशील लेखक आहेत. आत्मनिवेदन, तृतीयपुरुषी निवेदन याबरोबर निवेदनाच्या विविध तर्हा त्यांनी उपयोजिलेल्या आहेत. उदाहरणार्थ ‘कावळ्याचिमणीं’च्या बालकथेच्या उपयोजनापासून पत्रात्मक निवेदन (कारावासातून पत्रे), डायरी व पत्रे यांचा संमिश्र वापर (तेरुओ), दोन निवेदक पात्रांचे निवेदन (गोफ) इत्यादींचा खास उल्लेख करायला हवा. कोणता विचार व आशय कसा सांगावा, याची अतिसूक्ष्म जाण गौरी देशपांडे यांच्या लेखनातून वारंवार व्यक्त झालेली दिसते.
‘विंचुर्णीचे धडे’ या आत्मकथनात्मक पुस्तकात खेड्यातील जीवनाचे, तेथे भेटणार्या व्यक्तींचे त्यांनी मिस्कील शैलीत वर्णन केले आहे.
देशपांडे यांच्या अनुवादित कार्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला, तर समकालाच्या कक्षा ओलांडून जाण्याचे, बहुस्तरीय अर्थच्छटा प्रकटण्याचे सामर्थ्य असलेल्या आणि रचनात्मक पातळीवर प्रयोग करून पाहणार्या साहित्यकृतींचीच निवड त्यांनी केली, हे लक्षणीयच ठरावे.
-डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस