Skip to main content
x

देशपांडे, हरिहर वामन

    रिहर वामन देशपांडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील चंडिकापूर या गावी झाला. यांचे प्राथमिक शिक्षण चंडिकापूर येथेच झाले. पण माध्यमिक शिक्षणासाठी ते अमरावतीच्या सरकारी हिंदू विद्यालयामध्ये दाखल झाले. लहानपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड होती. त्या वेळचे देशभक्त वीर वामनराव जोशी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संस्थापक अनंत कृष्ण व अंबादास कृष्ण वैद्य यांच्या आचार विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. त्यावेळच्या पुढाऱ्यांमुळे ते राजकारणाकडे ओढले गेले.

      आपल्या मित्रांबरोबर त्यांनीही इंग्रजी शिक्षणावर बहिष्कार टाकला आणि धुळे जिल्ह्यातील अंमळनेर येथे राष्ट्रीय  शाळेत प्रवेश घेतला व ते शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे प्रवेश घेऊन (१९२३ ते १९२५) वाङ्मयविशारद ही पदवी घेतली. अकोट येथील राष्ट्रीय शाळेत अध्यापनाचे कामही केले. या काळात त्यांचे सहाध्यायी होते स्वामी रामानंद तीर्थ व ह. रा. महाजनी. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये काही क्रांतिकारी विचाराची मंडळी होती. शिवराम हरि राजगुरू हे त्यापैकी एक होते. त्यांच्याशी यांची जवळीक होती. या सर्वांना सहेतुक निरनिराळ्या कामावर पाठविले गेले. हरिहर व ज्ञानेश्‍वर देशपांडे यांना उत्तर प्रदेशात तर राजगुरूंची रवानगी बनारस येथे झाली. कोकर्डेकरांना जर्मनीस पाठविले गेले. उत्तर प्रदेशात कार्य करताना त्यांचा परिचय पंडित मदनमोहन मालवीय, लालबहादूर शास्त्री यांसारख्या राष्ट्रीय पुढाऱ्यांशी झाला. उत्तर प्रदेशातील काम आटोपून ते पुन्हा अमरावतीस आले. १९२९ च्या लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनासाठी ते अमरावतीचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले. १९३० च्या सविनय कायदेभंगात त्यांनी भाग घेतल्याने त्यांना १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली. शिवनी येथील त्याच तुरुंगात सुभाषचंद्र बोस व शरदचंद्र बोस हे स्थानबद्ध होते.

      १९३५ च्या काँग्रेसच्या सुवर्ण महोत्सवाच्या प्रसंगी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा व्यायाम प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांची डॉ. राजेंद्रप्रसाद व सरोजिनी नायडू यांच्याशी ओळख झाली. त्रिपुरी - मध्य प्रदेश येथे १९३९ मध्ये  काँग्रेसचे ५२ वे अधिवेशन भरले होते. त्यावेळी ३,००० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्या व इतर निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने अधिवेशनाची व्यवस्था उत्तम रीतीने पार पाडली. त्याचे सर्वांनी कौतुकही केले. १९४२ च्या असहकार आंदोलनात त्यांनी सक्रीय भाग घेतला. त्याबद्दल त्यांना पुन्हा कारावास भोगावा लागला.

     ते उत्तम वक्ता होते. त्यांना मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत अशा अनेक भाषा येत होत्या. त्यावर त्यांचे प्रभुत्वही होते. आयुर्वेद, इतिहास, राजनीती, शारीरिक शिक्षण, पत्रकारिता हे त्यांचे आवडते विषय. त्यांनी नागपूर टाइम्स, हितवाद, लोकमत, तरुण भारत, स्वतंत्र हिंदुस्थान तसेच भवितव्य इत्यादी वृत्तपत्रांतून लिखाण केले. ‘भवितव्य’ या पत्रातून दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ‘संजय उवाच’ या सदराखाली केलेले युद्धाचे वर्णन फार लोकप्रिय झाले.

      व्यायामाची त्यांना प्रथमपासूनच आवड होती. १९४६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने अखिल भारतीय शारीरिक शिक्षण परिषद भरवली. तिचे भव्य प्रमाणावर आयोजन केले. परिषदेस २५०० प्रतिनिधी आले होते. त्याचे आयोजन आणि यशस्वी संचलन हे हरिहर देशपांडे यांचे होते. १९४९ मध्ये स्वीडनमध्ये जागतिक ऑलिंपियाड महोत्सव झाला. २७ सदस्यांचा अधिकृत प्रवक्ता म्हणून हरिहर देशपांडे यांची निवड झाली होती. या जागतिक सभेपुढे ‘भारतीय संस्कृतीमध्ये शारीरिक शिक्षणाचे विविध पैलू’ यावर त्यांनी त्यांचे विचार मांडले. त्याचबरोबर स्वित्झर्लंड, डेन्मार्क, जर्मनी, इंग्लंड या देशांचा दौरा केला. भारतीय व्यायामपद्धतीचा प्रचार केला.

      सरकारी स्तरावर शारीरिक शिक्षणासंबंधी वेगवेगळ्या योजनांत त्यांचा महत्त्वाचा भाग होता. केंद्रीय शारीरिक शिक्षण सल्लागार समितीचे ते सदस्य होते. १९५०  ते ६० शारीरिक शिक्षणाचा आराखडा बनविणे, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची उभारणी यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. मध्य प्रदेशात गृहरक्षकची चळवळ त्यांनी लोकप्रिय केली. १९६२ ते १९६४ गांधी स्मारकातर्फे गांधी अध्ययन केंद्र चालविले. पनवेलच्या ‘पनवेल आरोग्य मंदिर’ मासिकाचे संपादकत्व स्वीकारले होते.

     - रोहिणी गाडगीळ

देशपांडे, हरिहर वामन