दहेजीया, विद्या
स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट, वॉशिंग्टन डीसीच्या सहयोगी संचालिका विद्या दहेजिया. फ्रिअर गॅलरी ऑफ आर्ट (कलावीथिका) आणि आर्थर एम सॅक्लिअर गॅलरी, अमेरिकेतल्या या दोन्ही ठिकाणी आशियाई कलाकृतींचा मोठा साठा आहे आणि विद्याताई दहेजिया या त्याच्या मुख्य अभिरक्षक म्हणजे क्युरेटर आहेत. ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ हा विषय घेऊन विद्याताईंनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून पदवी संपादन केली. नंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची ‘भारतीय कला’ विषयातील अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली. ‘ख्रिस्तपूर्व २०० ते इ.स. २००च्या कालखंडातील बौद्ध लेणी’ या विषयावर त्याच विद्यापीठाला प्रबंध सादर करून विद्याताईंनी डॉक्टरेट मिळवली.
डॉक्टरेट पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे कला इतिहासविषयक शिष्यवृत्ती मिळवून या विषयाचा अधिक सखोल अभ्यास केला. हाँगकाँग येथे त्यांनी कला-इतिहास विषयाचे दोन वर्षे अध्यापन केले आणि भारतात परतल्यावर नवी दिल्ली येथे सहा वर्षे संशोधनकार्य केले. डॉ. होमी भाभा शिष्यवृत्तीच्या अंतर्गत त्यांनी संशोधन करून ‘ओरिसामधील मंदिरे’ नावाचा ग्रंथ आणि ICSR शिष्यवृत्तीद्वारे ‘भारतातील योगिनींची मंदिरे’ नावाचा ग्रंथ लिहिला. आत्मानुभूती हा सर्वश्रेष्ठ भक्तिभाव आहे, हे भक्ती आंदोलनाने प्रस्थापित केल्याने योगिनी प्रभाव क्षीण होत गेला. विद्याताईंनी योगिनी मंदिरे नावाचा लिहिलेला ग्रंथ राष्ट्रीय संग्रहालय, दिल्लीने प्रकाशित केला. विद्याताईंनी होनोलुलू, हवाई येथे १९७९ ते १९८१ या काळात दक्षिण भारतातील संत - तामिळनाडू या विषयावर संशोधन केले. १९८२पासून न्यूयॉर्कच्या कोलंबिया विश्वविद्यालयात भारतीय कलेचे अध्यापन करीत असताना त्यांच्या संशोधनाची परिणती दोन पुस्तके लिहिण्यात झाली.
कोलंबिया विश्वविद्यालयात कला व कलेचा इतिहास हे प्रमुख विभाग असून मोठ्या संख्येने विद्यार्थी तिथे आकर्षिले जातात. विद्याताई दहेजिया यांनी तेथे भारतीय कला या विषयाचे अध्यापन केले. भारतातील ब्रिटिशयुगीन कला व कलापुस्तके यांचे प्रदर्शन ही त्यांची मुख्य कामगिरी होय. नंतर त्यांनी ‘एडवर्ड लियरकृत भारत’ नावाचे प्रदर्शन आयोजित केले. त्यात १८६३ ते १८६५च्या अवधीत लियरने जलरंगांनी रेखाटलेली ३००० चित्रे प्रदर्शित केली होती. अमेरिका तेथे भारतीय कलेला व्यापक प्रमाणावर उठाव देऊ इच्छित होती. म्हणून फ्रिअर व सॅक्लियर गॅलरींच्या प्रमुखपदी व नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट तसेच दि स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटच्या क्युरेटर (अभिरक्षक) पदासाठी १९९४ साली विद्याताईंना पाचारण केले गेले. स्मिथसोनियन हे व्यापक संकुल मोक्याच्या जागी राजधानीत स्थापन केले आहे. एकाच क्षेत्रात संग्रहालयाच्या सोळा इमारती आहेत. ही संस्था १५० वर्षांची असून त्यात विश्वभरातील इतिहास व कलासंस्कृतीविषयक काही अनमोल वस्तूंचा संग्रह आहे. त्यात होप डायमंडचा समावेश आहे. जगातले हे एकमेव असे संग्रहालय आहे, ज्याच्या प्रमुखपदी कॅबिनेट दर्जाचा मंत्री आहे. ते खास कायदा करून पूर्णत: सरकारकडून चालवले जाते. यामुळे मालकी हक्काचे सुयोग्य कायदेशीर दस्तऐवज असल्याशिवाय इतिहास व संस्कृती संंबंधित कलाकृती खरेदी करू शकत नाही. ही संस्था या नियमाचे पालन करते. येथे चोरटे व संशयास्पद परिस्थितीतले काहीही विकत घेतले जात नाही.
१९९९ साली विद्याताईंनी देवीरूपांचे प्रेक्षणीय प्रदर्शन भरवले. त्यांनी युरोप, ब्रिटन येथील व जगभरातल्या ३७ खाजगी संग्रहकर्त्यांकडून सामग्री जमवली. ख्रिस्तपूर्व पहिले शतक ते १९८७ एवढा कालखंड त्यांनी व्यापला. या प्रसंगी अगणित घडामोडींचे दर्शन घडले. अमेरिकेच्या मॅपिन पब्लिशर्सने सदर प्रदर्शनाच्या कॅटलॉगचे (तालिकेचे) प्रकाशन केले.
विद्या दहेजिया वॉशिंग्टन येथे वास्तव्य करतात व काम करतात; परंतु चर्चासत्रे, पाठ्यक्रम, व्याख्याने आणि भारतीय कलेच्या प्रसंगी जगभर प्रवास करीत असतात.
२०१२ साली आपल्या कार्यासाठी, विद्याताई यांचा भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
— वि.ग. जोशी / आर्या जोशी