Skip to main content
x

गाट, सुजाता अनिल

         सुजाता अनिल गाट, पूर्वाश्रमीच्या सुजाता बापूसाहेब पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील, पाचगाव तालुक्यातील नांदरे शिरगाव येथे झाला. गाट यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात हुपरी येथे झाले. माध्यमिक शिक्षण हुपरी येथेच रयत शिक्षण संस्थेत झाले. गाट यांच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे शेती व घराकडे लक्ष देण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. घरची जबाबदारी सांभाळत त्यांनी कोल्हापूर येथील शहाजी महाविद्यालयातून  बी.कॉम. पूर्ण केले. गाट यांना शेती करण्याची पहिल्यापासूनच आवड होती. शेती करण्याचे ज्ञान त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून मिळवले. गाट यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या प्रयोगांविषयी माहिती मिळवली. प्रत्यक्ष काम करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याचा अभ्यास करून त्यांनी आधुनिक शेतीवर भर दिला. त्यांना एकूण २.४८ हेक्टर क्षेत्रावर आंबा, नारळ, चिकू ही फळझाडे लावली आहेत.

          सुजाता गाट या सर्व जमिनीचे सपाटीकरण करून समतल पद्धतीने मशागत करतात. ताग, चवळी यांसारख्या हिरवळीच्या खतांचा वापर करतात. सुरुवातीला शेती व्यवसाय करताना त्यांना बाजारभावाचा अंदाज येत नव्हता. गणेशोत्सवात झेंडूचे पीक हातात येईल अशा पद्धतीने मुबलक प्रमाणात लागवड केली जात असे व मोठ्या प्रमाणावर पीक आल्यावर ते पडून राहत असे. अशाच प्रकारे फूलकोबी या पिकाची सलग लागवड केल्याने व अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. यानंतर सुजाता गाट यांनी बाजारभावाचा अंदाज बांधण्याचे कसब अंगीकारले. आंतरपीक व बहुपीक या पद्धतींच्या माध्यमातून त्यांनी उत्पन्न वाढवले.

          गाट यांनी आपल्या शेतामध्ये एकात्मिक पद्धतीने पीक संरक्षण करताना प्रकाश सापळा, लिंबोळी अर्काचा वापर केला. जनावरांपासून मिळणारे शेणखत, प्रेसमड, गांडूळखत, कृष्णा कंपोस्ट खत यांचा त्या शेतीमध्ये वापर करतात. त्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. ते काकडी, मेथी, वांगी, कोथिंबीर तसेच ब्रोकोली यांसारख्या पाश्‍चिमात्य भाज्यांचे उत्पादन घेतात. ऊती संवर्धनाचा वापर करून केळीची बसराई व श्रीमंती या जातींची लागवड करून उत्पादन घेत आहेत. ऊस पिकाची एक डोळा पट्टा पद्धतीने लागवड करून गेली ५ वर्षे एकरी ९० ते १२० टन उत्पादन त्या घेत आहेत. तसेच, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाबरोबरच विविध भाजीपाला यांचीही लागवड त्या करतात. गाट गेली १० वर्षे गांडूळखत निर्मिती करून ज्यादा खताची विक्री ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर परिसरातील शेतकऱ्यांना करत आहेत. महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी ५ बचतगटांची स्थापना केली आहे. तसेच गावात व इतरत्र योग प्रचाराचे काम त्या करत आहेत.

           गाट यांनी विविध कृषी प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन यश संपादन केलेले आहे. त्यांनी फूलकोबी व कोहळा या पिकांच्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. कृषी क्षेत्रात काम करताना त्यांना शासकीय योजनांचे, विविध बँकांचे, खतविक्री, औषधविक्री केंद्रांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने जिजामाता कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरवले आहे.

- मनश्री पाठक

गाट, सुजाता अनिल