Skip to main content
x

गफूर, मोहम्मद अब्दुल

            रभणीच्या पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता मोहम्मद अब्दुल गफूर यांचे नाव ‘लाल- कंधारी’ पशुधनाच्या राष्ट्रीय नोंदणीत अग्रक्रमाने समोर येते. शेतकर्‍यांच्या दारात वर्षानुवर्षे संवर्धित झालेला लालकंधारी गोवंश भारतीय देशी वंशाच्या यादीत दिमाखाने समाविष्ट झालेला दिसताना डॉ. गफूर यांचे पशुधन विकास आणि पशुवंश संवर्धनाचे कार्य ठळकपणे स्पष्ट होते.

            मोहम्मद अब्दुल गफूर यांचा जन्म मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण बीड येथे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपले पशुवैद्यकीय पदवी शिक्षण उस्मानिया विद्यापीठातून पूर्ण केले. पदवीनंतर हैदराबाद, मुंबई आणि महाराष्ट्र राज्यात त्यांनी १९५४ ते १९६२ दरम्यान पशुवैद्यक अधिकारी म्हणून कार्य केले.

            पशुवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठातून पशु-परोपजीविशास्त्र विषयात पूर्ण केल्यानंतर गफूर यांनी मुंबई आणि नागपूर येथील पशुवैद्यक महाविद्यालयात १९६२ ते १९७० दरम्यान व्याख्याता म्हणून कार्य केले. त्यांच्या उत्कृष्ट अध्यापनाची दखल घेऊन त्यांची नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयात थेट प्राध्यापकपदी पदोन्नती झाली. परभणी पशुवैद्यक महाविद्यालयात ते सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत होते.

            गफूर यांनी पशुपरजीविशास्त्रात पीएच.डी. मिळवली. ग्रामीण पशुधन व्यवस्थापन विषयात प्रशिक्षणे, चर्चासत्रे, संशोधन परिषदा यांतून त्यांनी स्वतःची निरीक्षणे आणि तांत्रिक विचार नियमितपणे मांडले. परभणी महाविद्यालयाची १९७२ची मुहूर्तमेढ आणि १९८७च्या उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये डॉ. गफूर यांचे बहुमोल योगदान होते. त्यांना शेर-ए-कश्मीर विद्यापीठातर्फे काश्मीर येथे पशुवैद्यक महाविद्यालय स्थापनेसाठी निमंत्रित करून त्यांच्या प्रशासनिक व्यवस्थेत पशुवैद्यक शिक्षणाची सुरुवात करण्यात आली.

            डॉ. गफूर यांनी मराठवाड्यातील लालकंधारी पशुवंशाविषयी दीर्घकालीन संशोधनाद्वारे व या जातीच्या गोवंशाची गुणवैशिष्ट्ये ठरवून आपली भूमिका राष्ट्रीय पातळीवर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडे मांडली आणि लालकंधारी वंशाची अधिकृत नोंद केली. यामुळे लालकंधारी पशुधनास महाराष्ट्रासह जवळच्या राज्यांत महत्त्व मिळाले. या गोवंश जोडीची विक्रीची किंमत लाखाहून अधिक असते, हे विशेष.

            भारतीय विज्ञान परिषदेचे १९६५पासून सदस्य आणि वैद्यक-पशुवैद्यक उपसमितीची धुरा सहा वेळा सांभाळणारे डॉ. गफूर अनेक तांत्रिक प्रकाशनांचे संपादकीय सदस्य म्हणून संशोधकांना परिचित होते. भारतीय दुग्ध व्यवसाय संघटनेसह देश पातळीवरील परोपजीविशास्त्रज्ञ संघटनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भा.कृ.अ.प., नवी दिल्लीतर्फे त्यांना पुरस्कार निवड, शिष्यवृत्ती निवड, पदभरती परीक्षक यांसह अनेक शैक्षणिक उपक्रमांत तज्ज्ञ म्हणून मानाचे स्थान लाभले. त्यांच्या कार्याची दखल म्हणून अनेक गौरव, सन्मान, स्मृतिचिन्हे आणि सुवर्णपदके त्यांना देण्यात आली. भोपाळ येथे विभागीय पशुप्रदर्शन आयोजनासाठी रौप्यपदक, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी म्हणून निवड, उदगीर येथे राष्ट्रीय पशुप्रदर्शनी आयोजनासाठी केंद्रीय कृषी व अन्न मंत्रालयातर्फे रौप्यपदक ही ठळक सन्मानचिन्हे डॉ. गफूर यांना मिळाली आहेत. मुंबईच्या वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानचा पशुपालन व दुग्धव्यवसाय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. तसेच १९७२च्या दुष्काळात उत्कृष्ट कार्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान केला.

            सेवानिवृत्तीनंतर संशोधन कार्याला प्रोत्साहित करण्यासाठी गफूर यांना भा.कृ.अ.प.तर्फे दोन वर्षे सन्माननीय संशोधकत्व प्रदान करून संशोधन योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली. डॉ. गफूर यांचे ८७ संशोधन लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त मासिकात प्रकाशित झाले असून त्यांनी ४२ पीएच.डी. प्रबंध परीक्षक म्हणून काटेकोरपणे तपासले. राष्ट्रीय पशुवैद्यक प्रबोधिनीची गौरववृत्ती लाभलेले डॉ. गफूर पशू प्रक्षेत्रावर आवडीने जात. त्यांना फूलबाग जोपासण्याचा मनस्वी छंद होता.

- डॉ. नितीन मार्कंडेय

गफूर, मोहम्मद अब्दुल