Skip to main content
x

हरिदास, नानाभाई

     नानाभाई हरिदास यांचा जन्म सुरत येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण मुंबईत एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. ते प्रारंभी मुंबईच्या जुन्या ‘सुप्रीम कोर्ट’ या न्यायालयात सहायक भाषांतरकार म्हणून काम करीत.

      नानाभाई हरिदास हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले कायम भारतीय न्यायाधीश होत. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना १८६२ मध्ये झाली. परंतु भारतीय व्यक्तीची कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यास १८८४ साल उजाडावे लागले. न्या.नानाभाई हरिदास यांच्याआधी फक्त जनार्दन वासुदेवजी यांना काही काळ हंगामी न्यायाधीश (अ‍ॅक्टिंग जज्) म्हणून नेमण्यात आले होते. ते कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीश होते. अर्थात अनेक ब्रिटिश वकिलांना व आय.सी.एस. अधिकार्‍यांनाही हंगामी न्यायाधीश म्हणून नेमले जात असे. कामाचे मान पाहून अशा नेमणुका करण्याची तेव्हा प्रथा होती, असे दिसते. ही प्रथा स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत चालू होती. तोपर्यंत जनार्दन वासुदेवजी धरून एकूण अठरा भारतीयांना वेळोवेळी हंगामी न्यायाधीश म्हणून कमी-अधिक अवधीसाठी नेमण्यात आले. त्यांत एम.पी खारेघाट, बालकराम असे आय.सी.एस. अधिकारी आणि सर चिमणलाल सेटलवाड, सर जमशेदजी कांगा व सर दिनशा मुल्ला यांच्यासारखे प्रख्यात वकील होते.

      उच्च न्यायालय स्थापन होण्याआधी अस्तित्वात असलेल्या ‘सदर दिवाणी अदालत’ या न्यायालयात नानाभाई हरिदास १८५७ मध्ये वकिली करू लागले. हे दिवाणी अपील न्यायालय होते. उच्च न्यायालय स्थापन झाल्यावर नानाभाई हरिदास यांना अपील शाखेत वकील म्हणून प्रवेश मिळाला. काही काळानंतर त्यांना सरकारी वकील म्हणून नेमण्यात आले. त्याच वेळी ते ‘लॉ स्कूल’मध्ये प्राध्यापकही होते. या ‘लॉ स्कूल’चेच पुढे आजच्या शासकीय विधि महाविद्यालयात रूपांतर झाले.

     प्रथम १८७३ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे तात्पुरते न्यायाधीश म्हणून नेमणूक मिळाली. नंतर वेगवेगळ्या कालावधीसाठी त्यांना एकूण नऊ वेळा अशी नेमणूक मिळाली. ती मिळाली की न्यायासनावर बसून न्यायदान करावयाचे, नेमणुकीची मुदत संपली की न्यायासनावरून पायउतार होऊन त्याच्यासमोर वकिली आणि ‘लॉ स्कूल’मध्ये अध्यापन करावयाचे, पुन्हा नेमणूक मिळाली की पुन्हा न्यायासनावर... असा त्यांचा शिरस्ता अकरा वर्षे चालू होता! हा एक विक्रमच समजला पाहिजे. अखेर १८८४ मध्ये कायम न्यायाधीश म्हणून हरिदास यांची नियुक्ती झाली. कायम न्यायाधीश म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. जून १८८९ मध्ये त्यांचे निधन झाले; त्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर न्या.काशिनाथ त्रिंबक तेलंग यांची नियुक्ती झाली. न्या.नानाभाई हरिदासांचे हिंदू कायद्यावर प्रभुत्व होते. ब्रिटिश राज्यात हिंदू कायद्याची तत्त्वे न्यायालयांकरवी प्रस्थापित होण्याची जी दीर्घ परंपरा आहे, तिची सुरुवात न्या.नानाभाईंच्या आरंभीच्या काही निकालांनी झाली, असे म्हणता येईल.

      - शरच्चंद्र पानसेे

हरिदास, नानाभाई