इंदुलकर, राजन रघुनाथ
‘श्रमिक सहयोग’ या संस्थेचे संस्थापक असलेल्या राजन रघुनाथ इंदुलकर यांनी वंचितांच्या शिक्षणाचा प्रश्न हाती घेऊन कोकणातील आदिवासी वाड्यांवर तीस वर्षांपूर्वी काम करायला सुरुवात केली. ‘प्रयोगभूमी’ या वंचित घटकातील मुलांच्या प्रयोगशील शैक्षणिक उपक्रमात ते आजही काम करीत आहेत. कातकरी व धनगर समाजातील मुले - मुली या निवासी शाळेत शिकतात. राजन इंदुलकर यांनी १९७६ ते ७८ या काळात मुंबईतील समाजवादी चळवळीत तसेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात सहभाग घेतला. त्यांनी राष्ट्र सेवा दलाची रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी केली. त्यांनी ‘श्रमिक सहयोग’ ही संस्था स्थापन करून जंगलतोड, कोळसाभट्टी विरोधात काम केले. २००१ ते ०४ या काळात विकास सहयोग प्रतिष्ठान, महाराष्ट्र या संस्थेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले.
राजस्थान, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील प्रयोगशील शिक्षण, क्षेत्रीय विकास प्रक्रिया यांचा अभ्यास केला. उत्तरांचल, हिमाचल, नागालँड येथील वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणाच्या पद्धती विषयक टिपणे, शिक्षणातील प्रश्न यावर लेखन केले. अभ्यास टिपणे व पुस्तिका लिहून विविध समाजसेवी संस्थांना सादर केल्या. वनवासी बांधवांच्या वाड्यांवर जाऊन शिक्षण विषयक जागृतीचे काम करताना ‘श्रमिक सहयोग’च्या माध्यमातून शिक्षक कार्यकर्तेही तयार केले. अमेरिकेत राहाणाऱ्या भारतीयांतर्फे दिला जाणारा २००७ या वर्षीचा महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार तसेच भारतीय शिक्षण मंडळ, महाराष्ट्रतर्फे दिला जाणारा २००८ या वर्षीचा कर्मवीर भाऊराव पाटील स्मृती लेखन पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.