Skip to main content
x

चौधरी, धनाजी रावजी

नाजी रावजी चौधरी यांना इतिहासात मानाचे स्थान आहे. कारण अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन फैजपूर येथे घडविण्यात धनाजी नानांचा हात होता. खिरोदा हे धनाजी नानांचे गाव. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात या गावची महती देशपातळीवर जाऊन पोचली. महात्मा गांधीजींकडून प्रेरणा घेऊन धनाजी नानांनी राष्ट्रीय कार्य करणारा एक आश्रम खिरोद्याला सुरु केला. खादी, रंगकाम व चर्मोद्योग यांचे प्रशिक्षणाचे काम सुरु केले. ते वर्ष होते १९३१. स्वराज्य आश्रमाने अनेक स्वाभिमानी, देशाभिमानी तरुण निर्माण केले.

१९३२ च्या चळवळीत हा आश्रम सरकारने जप्त केला. १९३२ च्या असहकार चळवळीत खिरोदा गावातील  ७५ स्त्रीपुरुष कारागृहामध्ये गेले. धनाजी नाना व त्यांच्या सहकार्‍यांच्या आग्रहाने २७ ते २९ डिसेंबर १९३६ या काळात फैजपूरला काँग्रेसचे अधिवेशन झाले.

१९३६ ला स्वराज्य आश्रमाचे रुपांतर राष्ट्रीय शाळेत झाले. तसेच राष्ट्रभाषा प्रचार समितीची स्थापना त्याच वर्षी झाली. राष्ट्रीय शाळेमध्ये गांधीप्रणित नई तालीम पद्धतीचे शिक्षण दिले जाई. कताई, विणाई, चर्मोद्योग, हातकागद, तेलघाणी, राष्ट्रभाषा प्रचार असे कार्य या शाळेतून चाले.

१९४२ च्या चळवळीने भारत छोडोसंपूर्ण देशात जोर पकडला. या शाळेतही कार्यक्रम झाला. धनाजी नानांना अटक झाली. त्याचबरोबर शाळेतील २५ मुलांनाही कारागृहामध्ये डांबले, त्यात धनाजी नानांचे पुत्र मधुकरराव चौधरी ही होते.

धनाजी नानांनी आदिवासी भागासाठी जी सर्वोदय योजना देशभर सुरू झाली होती त्यात सहभाग घेतला. २५ गावांचे सर्वेक्षण केले. सातपुड्याच्या आदिवासींच्या घराघरात जाऊन परिस्थिती समजून घेतली, माहिती गोळा केली व आकडेवारी मिळविली.

१) वन्य पशूंचा उपद्रव रोखणे २) स्त्रियांना कामाच्या प्रचंड ओढ्यातून मुक्त करण्यासाठी पीठ गिरण्या सुरु करणे ३) प्रत्येक गावासाठी पाणी पुरवठा योजना राबविणे हे कार्यक्रम त्यात राबविण्यात आले. शोषणाविरुद्ध, आर्थिक सामाजिक विषमतेविरुद्ध सतत ते संघर्ष करीत राहिले. त्यामुळे शोषणकर्ते, सावकार, ठेकेदार यांचा स्वार्थ दुखावला गेला.  भाडोत्री आदिवासींच्या करवी २९ डिसेंबर १९५२ रोजी रात्री त्यांच्या राहत्या घरी त्यांची हत्या करण्यात आली.  धनाजी नानांनी खिरोद्याला आश्रम सुरू केला.  त्यातून राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यास प्रेरणा लाभली. खिरोद्यात पुढे जनता शिक्षण मंडळ सुरू झाले. साने गुरुजी विद्या प्रबोधिनीचे बी.एड. महाविद्यालय यांनी महाराष्ट्राला गुणवंत शिक्षक, चित्रकार, शिल्पकार, समाजसुधारक अनेक शिक्षणप्रेमी मंडळी दिली. त्यामुळेच धनाजी नानांची स्मृती म्हणून फैजपूरच्या संस्थेने कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय हे धनाजी नानांच्या नावे प्रसिद्ध केले.

 - म. ल. नानकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].