Skip to main content
x

दुभाषी, पद्माकर रामचंद्र

           भारतीय प्रशासकीय सेवेतील एक नामवंत प्रशासक अधिकारी, विद्वान शिक्षणतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक व लेखक पद्माकर रामचंद्र तथा पी.आर. दुभाषी आजही सहकार, शिक्षण व अर्थशास्त्रीय विषयावर लेखन करीत आहेत. पुण्यातील राष्ट्रीय स्तरावरची अधिकाऱ्यांना शिक्षण  प्रशिक्षण देणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय व प्रबंध संस्थानचे ते संस्थापक व पहिले संचालक आहेत.

भारतीय प्रशासकीय सेवेतील एक ज्येष्ठ अधिकारी असताना भारत सरकारच्या ध्येयधोरणाला त्यांनी विशेष चालना दिली आहे. भारत सरकारने २०१० मध्ये त्यांना पद्मभूषणहा मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

डॉ. पी.आर. दुभाषी तत्कालीन महाराष्ट्र, गुजरात, व कर्नाटक प्रदेशासाठी असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या एम.ए.परीक्षेत प्रथम आले, कृषि व ग्रामीण विकासात स्वातंत्र्यानंतरचे कार्यया विषयामध्ये त्यांनी पीएच.डी. मिळविली. मुंबई विद्यापीठाचा डॉक्टर ऑफ लिटरेचरहा बहुमान त्यांना नियोजनासंबंधीची मूलभूत व्यवस्था-चौकटया विषयावरील प्रबंधासाठी मिळाला. तो ग्रंथ भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्था यांनी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने) प्रकाशित केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या परीक्षेतही ते सर्वप्रथम आले आहेत. त्या विद्यापीठाने त्यांना वित्तीय आणि सामाजिक प्रशासन’ (इकॉनॉमिक अँड सोशल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन)या विषयासाठी पदव्युत्तर पदविका दिली.

डॉ. पद्माकर दुभाषी हे भारतातील केंद्रीय प्रशासकीय (आय.ए.एस.) स्पर्धा परीक्षेत उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. भारत सरकारने त्यांच्यावर सोपविलेल्या विविध जबाबदार्‍या त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी त्यांचा गौरव केला आहे.

देशातील सहकार क्षेत्रातील एका मोठ्या खत- कारखान्याच्या उभारणीत त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. कृषक भारतीया सहकारी संस्थेचे ते पहिले अध्यक्ष झाले. या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना योग्य व दर्जेदार खतांचा पुरवठा व्हावा आणि शेती उत्पादन वाढावे या योजनेचा त्यांनी पाठपुरावा केला. ग्रामीण भारताचा त्यांचा डोळस अभ्यास आहे. अनेक घटकराज्यांमध्ये समूह विकास आणि सहकार प्रशिक्षण यांच्या संस्था भक्कम पायावर उभारण्यात त्यांचा मुख्य वाटा आहे. मसुरीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंटचे ते संचालक होते. पुण्यात रिर्झव्ह बँकेने वित्तीय शेतकी महाविद्यालय सुरू केल्यावर त्याचे पहिले प्राचार्यपद त्यांनी भूषविले. त्या महाविद्यालयामार्फत भारतातील (वित्तीय/ बँकिंग) क्षेत्रातील अनेक अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करून बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा हेतू त्यांनी पूर्णत्वास नेला. कोणत्याही संस्थेचा विकास हा शिक्षण, प्रशिक्षण आणि नियोजनाशिवाय होऊ शकत नाही यावर त्यांचा कटाक्ष आहे.

कर्नाटकच्या मलप्रभाघटप्रभाया प्रकल्पांचे प्रशासक असताना त्यांनी कमांड एरिया डेव्हलपमेंटसाठी पाणीपुरवठ्याची पुरेपूर क्षमता यावी म्हणून अनेकमुखी कार्यक्रमांची रचना केली. बेळगावचे आयुक्त असताना डॉ. दुभाषींनी मराठी व कानडी लोकांमध्ये समन्वयाची चांगली भूमिका पार पाडली. बेळगाव शहराला चांगला आकार यावा आणि या शहराचे वैभव वाढावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. कर्नाटक सरकारचे मुख्य सचिव या नात्याने राज्याच्या कार्याला त्यांनी गती दिली. कर्नाटक सरकारच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध योजना आखून त्या त्यांनी राबविल्या. रस्ते, पूल, धरणे, शहरांचे सुशोभीकरण, बागा, यांचे विस्तारीकरण केले.

१९८० च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आसाममध्ये कृषी अर्थरचनेचा विकास करायची निकड भासली, तेव्हा त्यांनी डॉ. दुभाषींसारख्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्यास विशेष प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. पुढे राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनीही त्यांच्यावर अनेक जबाबदार्‍या टाकल्या. भारत सरकारच्या शेती, सहकार व पंचायतराज या खात्याचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सरकारच्या ध्येयधोरणाची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे कशी राबविली जाईल याबाबत ते दक्ष असत. भारतातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना अधिक गतिमान करण्यासाठी त्यांनी सरकारच्या ध्येयधोरणानुसारच प्रशिक्षणाची योजना आखून तशी व्यवस्था केली. अधिकारी अधिक द्रष्टा व्हावा व त्याच्या कामात गती यावी, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.

भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त होऊन आज ३७ वर्षे झाली तरी अनेक सार्वजनिक संस्थांना त्यांचे थेट मार्गदर्शन लाभत आहे. केंद्र सरकारच्या अनेक तज्ज्ञ समित्यांचे नेतृत्व त्यांच्याकडे येत असतेच. गोवा विद्यापीठाच्या उभारणीत त्याचा सिंहाचा वाटा आहे.  येथे पाच वर्षे कुलगुरू म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. अभ्यासक्रम, शैक्षणिक दर्जा यांमध्ये त्यांनी आधुनिकपणा आणला. ज्ञान, विज्ञान यांमध्ये विद्यार्थ्यांत पारंगतता यावी व आपले विद्यार्थी जागतिक क्षेत्रात पुढे यावेत अशा प्रकारचे शिक्षण विद्यापीठातून दिले जावे यासाठी गोवा विद्यापीठात नवे धोरण आखले आणि भारतात या विद्यापीठाला त्यांनी नवा दर्जा प्राप्त करून दिला.

 डॉ. पद्माकर रामचंद्र दुभाषी असे एक चतुरस्र, अनुभवी, विद्वानमान्य शिक्षणतज्ज्ञ; शेती, सहकार, अर्थनियोजन व कलात्मक प्रशासक अधिकारी म्हणून सार्‍या भारतभर ज्ञात आहेत. सध्या ते भारतीय विद्या भवन, पुणे केंद्राचे अध्यक्षपद भूषवीत आहेत.

- जयराम देसाई

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].