Skip to main content
x

घाटे, निरंजन सिंहेंद्र

     काशवाणीच्या विविध केंद्रांवर कार्यक्रम अधिकारी आणि केंद्रप्रमुख आणि अनेक मराठी मासिकांचे संपादक म्हणून निरंजन घाटे परिचित आहेत. १५० पुस्तके, ३०० विज्ञानकथा आणि ३००० वैज्ञानिक लेख असे निरंजन घाटे यांचे विपुल प्रमाणात लेखन आहे.

     मराठी भाषेतून विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी निरंजन घाटे यांनी सातत्याने ४० वर्षे लेखन केलेले आहे. त्यांनी आघाडीवरील विज्ञान-तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती विविध नियतकालिकांमधून आणि वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्यांमार्फत मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अग्रगण्य वैज्ञानिक शोधनिबंधांमधील इंग्रजी भाषा ही विशिष्ट क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकाची माहिती आणि संदर्भासाठी योजलेली असते. त्यातील जटिल कल्पना अवजड शब्दांमध्ये व्यक्त झालेल्या असतात. घाटे यांनी मराठी वाचकांसाठी वैज्ञानिक संकल्पनांमधील क्लिष्ट आशय सोप्या आणि सुबोध मराठी भाषेत प्रकट करण्यासाठी लेख व विज्ञानकथाही लिहिल्या. त्यांनी २००९ सालापर्यंत लिहिलेल्या १५० पुस्तकांपैकी अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे पुनर्मुद्रण करावे लागले किंवा आवृत्त्या काढाव्या लागल्या. देशी आणि परदेशी शास्रज्ञांची चरित्रे, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांची अनन्यसाधारण व्यक्तिमत्वे, त्यांच्या वैज्ञानिक कामगिऱ्या त्यांनी उलगडून दाखविल्या आहेत. पर्यावरण, उत्क्रांती यांसंबंधीचे लेखन करून त्यांनी जनजागृतीचे कार्यही केलेले आहे.

     निरंजन घाटे यांनी भूशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठाची एम.एस्सी. पदवी १९६८ साली मिळवली. त्यानंतर त्याच विभागात त्यांनी सतत ९ वर्षे प्रयोगदर्शक आणि व्याख्याता म्हणून कार्य केले.

     १९७७ साली त्यांना कार्यक्रम अधिकारी म्हणून नागपूर, जळगाव आणि सांगली आकाशवाणीच्या केंद्रांवर काम करण्याची संधी मिळाली. नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची १९८२ साली मराठी कार्यक्रम प्रमुखपदी निवड झाली. तेथे त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. त्यांची सांगली आकाशवाणीच्या केंद्रप्रमुख पदावर नेमणूक करण्यात आली. आकाशवाणीचे पदाधिकारी  म्हणून घाटे यांनी ६००पेक्षा अधिक उत्तम कार्यक्रम श्रोत्यांसाठी सादर केले. त्यांमध्ये रूपके, एकांकिका, संवाद आणि विज्ञानविषयक भाषणांचा समावेश होता. १९८३ नंतर पुण्याच्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालयामध्ये घाटे यांनी प्रारंभी उपसंचालक आणि नंतर संचालक म्हणून कार्य केले. 

     पंधरा वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी पूर्ण वेळ लेखनासाठी द्यायचे ठरवले. तथापि पुढील काही वर्षे त्यांनी अनेक मराठी मासिकांसाठी संपादकाची भूमिका बजावली. घाटे यांनी ‘सृष्टिज्ञान’ (१९८३-९३), ‘बुवा’, ‘पैंजण’ (१९८६-९२), ‘अद्भुत कादंबरी’, ‘ज्ञानविकास’ (१९८६-९२), ‘किर्लोस्कर’ (१९९३-९४), ‘विज्ञानयुग’ या मासिकांच्या संपादक मंडळावर उत्साहाने काम केले. पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, मराठी साहित्य परिषद आणि महात्मा फुले वस्तू संग्रहालय यांचे ते आजीव सदस्य आहेत.

     त्यांनी सतत नावीन्याचा ध्यास बाळगल्याचे दिसून येते. त्यांच्या विज्ञान लेखनासाठी आवश्यक असणारी विशाल ग्रंथसंपदा त्यांनी मेहनतीने उभारलेली आहे. विज्ञान लेखनाप्रमाणे ते युद्धकथा, साहसकथा, हेरकथा आणि बालकुमार वाङ्मयनिर्मितीमध्ये रमतात. सभा, संमेलने, सत्कार अशा गोष्टींपासून घाटे अलिप्त असतात, परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमात भाग घेऊन त्यांनी भाषणातून सडेतोडपणे आपली आग्रही, आणि व्यवहारी मते मांडली आहेत. घाटे यांच्या ‘ज्ञानदीप’, ‘ऊर्जाविश्व’, ‘वसुंधरा’, ‘अंटार्क्टिका’, ‘आकाशगंगा’, ‘शोधवेडे शास्त्रज्ञ’, ‘जीवनचक्र’, ‘आत्मवेध’, ‘आधुनिक युद्धसाधने’, ‘स्पेसजॅक’, अशा अनेक उत्तम पुस्तकांना वाचकांची पसंती आणि विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या पुस्तकांना आठ वेळा राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांमध्ये यदुनाथ थत्ते, रेव्हरंड ना.वा. टिळक, पंजाबराव देशमुख, वि.म. गोगटे, गो.रा. परांजपे, र.द. आंबेकर यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचा विशेष उल्लेख करायला पाहिजे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९८५  साली त्यांना उत्कृष्ट विज्ञान प्रसारक म्हणून मानपत्र मिळाले.  

     त्यांना मिळालेले इतर काही सन्मान : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ (पुणे मराठी ग्रंथालय, १९९२), ‘मो.वा. चिपळोणकर पुरस्कार’ (इंडियन फिजिक्स असोसिएशन, १९९७). घाटे यांच्या विज्ञानकथांना अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळालेली आहेत. उदाहरणार्थ : ‘नवयुग कथास्पर्धा’ (१९७१,७२,७३), ‘विरंगुळा कथा स्पर्धा’ (१९७४), ‘मराठी विज्ञान परिषद, विज्ञानकथा स्पर्धा’ (१९७१,७२,७४). घाटे पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागामध्ये अध्यापन करीत असताना, त्यांच्या संशोधनावर आधारित असलेले नऊ शोधनिबंध त्यांनी भूशास्त्राशी संबंधित नियतकालिकात प्रकाशित केलेले आहेत.

     निरंजन घाटे यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात असताना क्रिकेटच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांचे प्रावीण्य दाखवले होते. पुण्यातील सदू शिंदे लीग क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांनी १९६६ ते १९७३ या काळात चार वेळा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मानपत्रेसुद्धा मिळवली आहेत.

     त्यांनी लिहिलेल्या वसुंधरा, एकविसावं शतक आणि नवे शतक या पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची निवडक पुस्तके पुढीलप्रमाणे - 'वाचत सुटलो त्याची गोष्ट', 'आपल्या पूर्वजांचे विज्ञान', 'असे घडले सहस्रक', 'असे शास्त्रज्ञ असे संशोधन', 'जिज्ञासापूर्ती', 'ज्याचं करावं भलं', 'पर्यावरण प्रदूषण', 'वसुंधरा', 'वेध पर्यावरणाचा'.

डॉ. अनिल लचके

घाटे, निरंजन सिंहेंद्र