Skip to main content
x

घाटगे, एम. बी.

       म.बी. घाटगे हे बडोदा महाविद्यालयात शिकत असताना क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात. डॉ. बर्न्स यांना पुणे कृषी महाविद्यालयातील क्रीडा विभाग सक्षम करायचा असल्यामुळे त्यांनी घाटगे यांना प्रवेश घेण्याची मुदत संपून गेल्यावरही १९२४मध्ये प्रवेश दिला. खेळाबरोबरीनेच ते अभ्यासातही हुशार असल्यामुळे त्यांना पहिल्या वर्षी शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. महाविद्यालयात १९२५मध्ये प्रोव्हिन्शियल कृषीची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. कृषी महाविद्यालयाच्या इतिहासातला हा पहिलाच प्रयोग होता. त्या वेळेस विद्यार्थ्यांना कृषीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्याच वर्षी महाविद्यालयात कृषी अर्थशास्त्र, कापूस, ऊस, पॅडी, उद्यानविद्याशास्त्र, रोपपैदास, रोप-विकृतिशास्त्र, कृषी रसायनशास्त्र यांसारखे विषय सुरू झाले. तेव्हा घाटगे यांनी १९२७मध्ये कृषी अर्थशास्त्रात प्रावीण्य मिळवण्याचे ठरवले व ते मिळवले. त्यांनी याच महाविद्यालयात १९२७मध्ये डेमोनस्ट्रेटर म्हणून कामाला सुरुवात केली. १९३०-३३ या काळात माळशिरस (सोलापूर) भागातील शेतजमिनीवर होणार्‍या खर्चाचे, त्याचबरोबर निरनिराळ्या बाजारांचेही सर्वेक्षण इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर लेख डॉ. शहा यांच्याबरोबर प्रसिद्ध केले होते. याचबरोबर इतर संशोधनाचे कामही १९३६-३९ या काळातही सुरू होते, ते दुसरे महायुद्ध सुरू होईपर्यंत चालू होते. १९३६ ते १९४२ या काळात त्यांची कृषी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे ते मुंबई शहराचे मुख्य विपणन अधिकारी झाले. त्यानंतर ते मुंबई शहराचे सिव्हिल सप्लाइजचे प्रभारी संचालक म्हणून काम पाहू लागले. अन्न आणि कृषी विभागात त्यांची कृषी विपणन सल्लागार म्हणून नेमणूक झाली. अखेरीस त्यांना महाराष्ट्र कृषी संचालकाचे (१९६०-१९६७) पद मिळाले.

- संपादित

घाटगे, एम. बी.