Skip to main content
x

हिदायतुल्ला, मोहम्मद

     मोहम्मद हिदायतुल्ला यांचा जन्म त्यावेळच्या मध्यप्रांतात एका खानदानी व सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील खानबहादुर हफीझ मोहम्मद विलायतुल्ला तत्कालीन मध्यप्रांत व वर्‍हाडात सरकारी नोकरीत विविध पदांवर होते. १९२८ मध्ये ते भंडारा येथून उपायुक्त (आताचे जिल्हाधिकारी) व जिल्हा दंडाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला व ते मध्य प्रांत, वर्‍हाडातील राखीव मुस्लिम मतदारसंघातून तेव्हाच्या केंद्रीय विधानसभेवर निवडून गेले. ते फारसी व उर्दूत कविताही करीत असत.

     वडिलांच्या वारंवार बदल्या होत असल्याने हिदायतुल्ला यांचे शालेय शिक्षण नागपूर, सिहोर, अकोला, छिंदवाडा, रायपूर, अशा विविध ठिकाणी झाले. १९२२ मध्ये ते रायपूरला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. छत्तीसगढ विभागात पहिले आल्याने त्यांना फिलिप शिष्यवृत्ती मिळाली. पुढील शिक्षणासाठी त्यांनी नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयात प्रवेश घेतला. (त्याआधीच्या दोन वर्षांत, म्हणजे अनुक्रमे १९२० व १९२१ मध्ये हिदायतुल्लांचे मोठे भाऊ अहमदुल्ला आणि सर्वांत थोरले भाऊ इक्रामुल्ला यांनीही मॉरिस महाविद्यालयातच प्रवेश घेतला होता.) १९२६ मध्ये ते नागपूर विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये इंग्लिश ट्रायपॉस व लॉ ट्रायपॉससाठी आणि लंडनच्या लिंकन्स इन्मध्ये बॅरिस्टरच्या परीक्षेसाठी असा एकत्रित अभ्यास करून ते १९३० मध्ये बॅरिस्टर होऊन स्वदेशी परतले. लगेचच त्यांनी नागपूर येथे वकिली सुरू केली.

      १९३० ते १९३६ पर्यंत हिदायतुल्लांनी नागपूरच्या तेव्हाच्या न्याय आयुक्तांच्या न्यायालयात (ज्युडिशियल कमिशनर्स कोर्ट) वकिली केली. १९३६ मध्ये नागपूर उच्च न्यायालय स्थापन झाले. हिदायतुल्ला प्रथमपासूनच त्या न्यायालयातील यशस्वी वकील म्हणून ओळखले जाऊ लागले. १९४२-४३ मध्ये त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. नंतर १९४३ ते १९४६ या काळात ते मध्य प्रांत व वर्‍हाडचे अ‍ॅडव्होकेट-जनरल होते. दरम्यान १९३५ ते १९४३ एवढा काळ त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या कायदा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम केले. याशिवाय नागपूर नगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासाचेही ते काही काळ सदस्य होते.

     १९४६ मध्ये नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून हिदायतुल्लांची नियुक्ती झाली. १९५४ मध्ये ते त्याच उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. नोव्हेंबर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या मध्य प्रदेश राज्यासाठी वेगळे उच्च न्यायालय जबलपूर येथे स्थापन झाले. त्याचे पहिले सरन्यायाधीश म्हणून हिदायतुल्ला यांची नियुक्ती झाली. त्या पदावर ते नोव्हेंबर १९५८ पर्यंत होते. नागपूर व जबलपूर येथील आपल्या वास्तव्यात हिदायतुल्ला यांनी नागपूर, सागर व विक्रम (उज्जैन) या विद्यापीठांत, त्याचप्रमाणे अलीगढ मुस्लीम विद्यापीठातही वेगवेगळी महत्त्वाची पदे भूषविली.

      विशेषत: नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी व शैक्षणिक मंडळांचे ते एकोणीस वर्षे (१९३४ ते १९५३) सदस्य होते, तर कायदा विद्याशाखेचे चार वर्षे (१९४९ ते १९५३) अधिष्ठाता होते. या काळात त्यांनी मध्य प्रदेश भारत स्काऊट व गाइडचे मुख्य आयुक्त म्हणून (१९५० ते १९५३) तर भारत स्काउट व गाइडच्या राष्ट्रीय मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही (१९५० ते १९५२) काम पाहिले.

      १डिसेंबर१९५८ रोजी न्या.हिदायतुल्ला यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. नऊ वर्षांनंतर २५ फेब्रुवारी १९६८ रोजी ते भारताचे सरन्यायाधीश झाले. सर्वोच न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना बारा वर्षांची दीर्घ कारकीर्द लाभली. त्यातील सुमारे तीन वर्षे ते सरन्यायाधीश होते. या काळात सर्वोच्च न्यायालयापुढे अनेक महत्त्वाचे खटले आले व त्यामध्ये न्यायालयाने दिलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरले. त्यापैकी सज्जनसिंह, गोलकनाथ आणि माजी संस्थानिकांची मान्यता व तनखे या संबंधीचा खटला आणि ‘पाँडेचरी येथील श्रीअरविंदांचा विश्वस्त न्यास हा ‘धार्मिक’ आहे की नाही’ या प्रश्नाबद्दलचा खटला हे विशेष उल्लेखनीय होत.

      यातील पहिल्या दोन खटल्यांच्या वेळी हिदायतुल्ला न्यायाधीश होते तर तिसर्‍याच्या वेळी सरन्यायाधीश होते. या तिन्ही खटल्यांत हिदायतुल्ला यांनी स्वत:ची विचारप्रवर्तक वेगळी निकालपत्रे लिहिली. यातील शेवटच्या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यावर लगेचच म्हणजे १६ डिसेंबर १९७० रोजी हिदायतुल्ला सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. सरन्यायाधीश  असताना ते ‘इंडियन लॉ इन्स्टिट्यूट’, ‘इंटरनॅशनल लॉ असोसिएशन’ची भारतीय शाखा व ‘इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ’ या संस्थांचे अध्यक्ष होते.

      हिदायतुल्ला सरन्यायाधीश झाल्यानंतर काही दिवसांतच सर्वोच्च न्यायालयात एक अकल्पित आणि अभूतपूर्व प्रसंग घडला. सरन्यायाधीशांच्या न्यायालयात त्यांच्यासह तीन न्यायाधीशांसमोर एक खटला चालू असताना एका माणसाने न्यायाधीशांवर खुनी हल्ला केला. सरन्यायाधीश हिदायतुल्ला यांनी प्रसंगावधान राखून हल्लेखोराशी मुकाबला केल्याने प्राणहानी झाली नाही. फक्त न्या.ग्रोव्हर यांच्या डोक्याला जखम झाली. नंतर जेव्हा त्या हल्लेखोरांवर खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली फौजदारी खटला झाला, तेव्हा सरन्यायाधीशांसह तिन्ही न्यायाधीशांनी सत्र न्यायालयात साक्ष दिली.

      १९७४ मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार होण्याबद्दल हिदायतुल्ला यांना विचारले गेले होते, पण त्यांनी उमेदवार होण्यास नकार दिला. त्यानंतरच्या १९७७ च्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळीही त्यांच्या नावाची थोडीफार चर्चा झाली, पण तो योग आला नाही. पुढे ऑगस्ट १९७९ मध्ये हिदायतुल्ला यांची उपराष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड झाली. पूर्ण पाच वर्षे, म्हणजे ऑगस्ट १९८४ पर्यंत ते उपराष्ट्रपती होते. उपराष्ट्रपती या नात्याने ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष होते. या दरम्यान १९८२ मध्ये ते इंडियन रेडक्रॉस सोसायटीचेही अध्यक्ष होते.

      न्या.हिदायतुल्ला यांच्या नावावर योगायोगाने एक आगळा विक्रम नोंदला गेलेला आहे. तो असा की तेरा वर्षांच्या अंतराने त्यांना दोन वेळा हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहावे लागले. मात्र त्या दोन प्रसंगी ते स्वत: वेगवेगळ्या पदांवर होते. मे १९६९ मध्ये तेव्हाचे राष्ट्रपती डॉ.झाकिर हुसेन यांच्या अकस्मात निधनानंतर आधी उपराष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी हे हंगामी राष्ट्रपती झाले. परंतु त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. त्यावेळी संसदेने तातडीने एक कायदा करून अशी तरतूद केली की अशा परिस्थितीत भारताच्या सरन्यायाधीशांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहावे. त्यानुसार जुलै-ऑगस्ट १९६९ मध्ये सरन्यायाधीश हिदायतुल्ला यांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. दुसर्‍या वेळी ऑक्टोबर १९८२ मध्ये राष्ट्रपती झैलसिंह यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपराष्ट्रपती हिदायतुल्लांनी पुन्हा हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले.

      हिदायतुल्ला हे केवळ कायद्यात रमणारे रूक्ष वकील किंवा न्यायाधीश नव्हते. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी, उमदे व प्रसन्न होते. इंग्रजीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते आणि इंग्रजी साहित्याचा, विशेषत: शेक्सपिअरच्या नाटकांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. उर्दू कविता किंवा शायरीचीही त्यांना आवड होती. आजही त्यांची निकालपत्रे, पुस्तके वा भाषणे वाचताना या सर्व गोष्टींचा प्रत्यय येतो. राज्यसभेचे अध्यक्षपदी कामकाज चालविताना त्यांच्या हजरजबाबीपणाचा व विनोदबुद्धीचा प्रत्यय येई.

      न्या.हिदायतुल्ला यांनी अनेक पुस्तके लिहिली. ‘डेमॉक्रसी इन इंडिया अँड द ज्युडिशिअल प्रोसेस’, ‘ज्युडिशिअल मेथड्स’, ‘यू.एस.ए.अँडइंडिया’ व ‘द फिफ्थ अँड सिक्स्थ शेड्युल्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’ ही त्यांपैकी प्रमुख होत. त्यांनी देशात व परदेशात वेळोवेळी दिलेल्या भाषणांचे व संकीर्ण लेखांचे संग्रह ‘ए जजेस् मिसलेनि’ या शीर्षकाने चार खंडांमध्ये प्रसिद्ध झाले. याशिवाय मुस्लीम कायद्यावरील ‘मुल्लाज् मोमेडिअन लॉ’ या प्रमाणभूत ग्रंथाच्या अनेक आवृत्त्यांचे त्यांनी अत्यंत साक्षेपाने संपादन केले. १९८० मध्ये प्रकाशित झालेले ‘माय ओन बॉस्वेल’ हे त्यांचे आत्मचरित्र हे अत्यंत वाचनीय असून हे लेखन संयत, संतुलित व डौलदार लेखनाचा वास्तुपाठ आहे.

- शरच्चंद्र पानसे

संदर्भ
१.      हिदायतुल्ला, मोहम्मद; “माय ओन बॉस्वेल” (आत्मचरित्र); आर्नल्ड हाइनमन; १९८०.
हिदायतुल्ला, मोहम्मद