जमदग्नी, बाळकृष्ण महादेव
वनस्पति-शरीरक्रियाशास्त्रातील जाणकार बाळकृष्ण महादेव जमदग्नी यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी येथे झाला. त्यांनी वनस्पति-शरीरक्रियाशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. कोकण व देशावरील महत्त्वाच्या पिकांच्या जाती निर्माण झाल्यावर त्या वितरित होण्यापर्यंत महत्त्वाचे योगदान देण्याचे श्रेय जमदग्नी यांना जाते. त्यांचे वडील कुरुंदवाड गावी शिक्षक होते. त्यांची आई गृहिणी होती. तिला संगीतात गती असल्याने ती कवने करत असे. त्यांचे हे गुण जमदग्नी यांनी घेतले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कुरुंदवाड येथे झाले. नरसोबावाडीच्या धार्मिक वातावरणाचा जमदग्नींवर मोठा प्रभाव पडला. शेती विषयात संशोधन करताना त्यांनी तांत्रिक विषयावर काव्य स्वरूपात महत्त्वाची माहिती तयार केली. शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी १९७२मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. तसेच १९७४मध्ये एम.एस्सी. (कृषी) ही पदवी वनस्पतिशास्त्रात प्राप्त केली. यानंतर निफाड (जि. नाशिक) येथे नोकरीस सुरुवात केली. त्यांची १९७६मध्ये नेमणूक बा.सा.को.कृ.वि.त दापोली येथे झाली. वनस्पतिशास्त्र हा विषय असला तरी शरीरक्रियाशास्त्रात प्रत्यक्ष संकर करून नवीन जात निर्माण करत नाहीत, परंतु एखाद्या वृक्षाचे अथवा रोपाचे वेगळेपण चटकन ओळखण्याची कला काहींना अवगत असते. या कलेमुळे डॉ. जमदग्नी यांची बा.सा.को.कृ.वि.त कोकमची ‘कोकण अमृत’, आंबा पिकामध्ये ‘रत्नागिरी हापूस’ या जाती विकसित करण्यासाठी मदत झाली. जमदग्नी यांना त्यांच्या कामाची प्रशंसा म्हणून दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.त पीएच.डी.साठी १९८३मध्ये पाठवण्यात आले. त्यांनी तिथे शरीरक्रियाशास्त्रात निरनिराळी नमुनारूपे अभ्यासून त्यातून उत्कृष्ट माहिती मिळवली.
जमदग्नी १९८८मध्ये दापोली येथे परत आले. नंतरच्या काळात त्यांनी पाण्याचा ताण निर्माण झाला असता त्याचा कसा सामना करायचा याचे संशोधन हाती घेतले. त्यांच्या कामाची पद्धत पाहून त्यांची म.फु.कृ.वि.त प्राध्यापक पदावर निवड झाली. तसेच कडधान्य प्रकल्पाचे प्रमुख म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. ते या पदावर निवृत्त होईपर्यंत काम करत होते. या काळात या योजनेतून विपुला ही तुरीची जात, तर हरभर्याच्या दिग्विजय, राजस, विहार, फुले जी ०५१७ या जाती प्रसारित झाल्या. या कामात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
वैयक्तिकरीत्या त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना आघारकर संशोधन संस्था, पुणे यांचा ‘डॉ. आर.बी. एकबोटे पुरस्कार’, बळीराजा कृषी प्रकाशन संस्थेचा ‘सामाजिक विकास पुरस्कार’ (१९९७) तसेच या संस्थेचा कडधान्याच्या जातीच्या निर्मितीबद्दल कै. अण्णासाहेब शिंदे कृषी संशोधन गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. राहुरी येथील कडधान्य प्रकल्पाला २००६मध्ये कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पल्स रीसर्च संस्थेतर्फे बेस्ट सेंटर परफॉरमन्स अॅवॉर्ड दिले.
डॉ. जमदग्नी हे २००७मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते सामाजिक कार्य करत आहेत. नोकरीत असताना त्यांनी कृषी तंत्रावर आधारित ५० पदे रचली आहेत. तसेच छंद म्हणून स्त्री-पुरुषांचे भगवद्गीतेचे मोफत पाठ घेऊन अनेकांकडून ती मुखोद्गत करून घेतली आहे. त्यांना संगीतात रस आहे. तसेच त्यांना २००२मध्ये हरभरा संशोधनासाठी इक्रिसॅट इंटरनॅशनल क्रॉप रीसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिक्स, हैद्राबाद या संस्थेने उत्कृष्ट सांघिक पुरस्कार दिला.