Skip to main content
x

कपूर, संतप्रसाद

           संतप्रसाद कपूर यांचा जन्म आग्रा शहरातील एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण आग्रा येथे झाले. त्यांनी पीएच.डी.ची पदवी इंग्लंडमध्ये मिळवली. येथे डॉ. बी.एन. उप्पल यांच्या आधिपत्याखाली पुण्याच्या कृषी महाविद्यालयात, सुरू झालेल्या बटाटा विषाणु-रोग प्रकल्पात १९३८ साली विषाणु-रोगशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली. तसेच १९५६ ते १९७२ या काळात ते आय.ए. आर.आय., नवी दिल्ली व पुणे येथे विषाणुरोग संशोधन क्षेत्रीय केंद्रामध्येही कार्यरत होते. त्यांचे संशोधन कार्य प्रयोगशाळेत असून, लिंबूवर्गीय पिके, केळी, पपई, केपगुजबेरी, बीट, मिरची, वांगी, भेंडी, लाल भोपळा इत्यादी भाजीपालावर्गीय पिके तसेच, भुईमूग व इतर कडधान्य पिके, मसालावर्गीय पिके-वेलदोडा, कापूस व ताग, शोभिवंत फुले, ऊस याबाबत होते. तसेच त्यांनी विषाणुरोगाची लक्षणे, प्रसार व नियंत्रण यावरही प्रदीर्घ संशोधन केलेले आहे.

           लिंबूवर्गीय पिकांवरील विषाणुरोगाची लक्षणे, या विषाणूचे सौम्य प्रकाराने उग्र प्रकारावर मात करता येते असे संशोधन करून आणि विषाणूंच्या तीन प्रकारचा अभ्यास करून जिवाणूसारखा ग्रीनिंग रोग, त्याची लक्षणे, त्याचा प्रसार सिलाकिड व कलमाने होतो, असे त्यांनी नमूद केले आहे. या रोगाचे नियंत्रण बी-पी १०१ या औषधाने होऊ शकते, असे त्यांनी संशोधनाच्या आधारे  सिद्ध केले. एक्झोकॉल्टीस या व्हिराईड रोगाचा प्रसार तसेच, ट्रिस्ट्रेजा विषाणुरोग ओळखण्यासाठी कागदी लिंबू व ग्रीनिंग रोग ओळखण्यासाठी काकडी हे पीक उत्तम असल्याचे त्यांनी सिद्ध केले. केळीवरील क्लोरोसीस विषाणुरोग हा वांगी, तंबाखू, टोमॅटो या पिकांवर असतो हे प्रथम त्यांनीच दर्शवले.

           तसेच केळीचा पर्णगुच्छ रोग हा कंदामुळे वाढतो व तो रोग चवळी, डबलबीन, सोयाबीन या पिकांवर होत असल्याचेही  संशोधनात आढळून आले. कापसावरील लांब पानाचा स्टेनोसिस रोग हा कलमाद्वारे होतो आणि अमेरिकन जाती या रोगापासून मुक्त असल्याचे संतप्रसाद कपूर यांनी सिद्ध केले. उसाच्या ग्रासीशुट कांड्यापासून हा रोग ज्वारी पिकावर प्रसारित होतो. उसाच्या कांड्या ५२ डिग्री सेंटिग्रेट पाण्यामध्ये एक तास ठेवल्यास रोगावर नियंत्रण होत असल्याचे संशोधन करण्यात ते यशस्वी झालेले आहेत. त्यांनी १९६८मध्ये ज्येष्ठ विषाणु-विकृतिशास्त्रज्ञ व १९६४ ते १९७२पर्यंत पुणे प्रक्षेत्राचे कार्यकारी अधिकारी म्हणून  काम केले. त्यांनी भारतातील महत्त्वाच्या संत्रा पिकाच्या क्षेत्रात विषाणुरोगाच्या संदर्भात पाहणी केली. त्यांचे ५०च्यावर संशोधन लेख प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच त्यांनी आय.सी.ए.आर.साठी विषाणुरोग, लक्षणे व प्रसार, उपाय यावर दोन पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन सभा, परिषदा यांमध्ये भाग घेतला होता. संतप्रसाद कपूर यांनी निवृत्त शास्त्रज्ञ म्हणून १९७३ ते १९७७पर्यंत लिंबूवर्गीय पिकांमधील विषाणुरोगावर संशोधन कार्य चालू ठेवले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी मिळाली.

- त्र्यंबक सखाराम मराठे

कपूर, संतप्रसाद