कशाळकर, उल्हास नागेश
उल्हास नागेश कशाळकर यांचा जन्म विदर्भातील पांढरकवडा या तालुक्याच्या गावी झाला. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते. छोट्याशा गावात वकिली करता करता त्यांनी गाण्याचा छंद जोपासला. उल्हास हे त्यांचे सर्वांत धाकटे चिरंजीव. अत्यंत कोवळ्या वयातच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. पाचव्या वर्षीच वीस वेगवेगळे राग ओळखून दाखवण्याबद्दल त्यांचे फार कौतुक झाले.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये संगीत विषय घेऊन त्यांनी एम.ए. या पदवी परीक्षेत सुवर्णपदक पटकावले. त्या वेळी खर्डेनवीस, राजाभाऊ कोगजे या गायकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यानंतर त्यांना केंद्र शासनाची शिष्यवृत्ती मिळाली. त्या अंतर्गत त्यांना सुप्रसिद्ध गायक नट पं. राम मराठे यांच्याकडे तालीम मिळाली.
याच काळात त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. गजाननराव जोशी यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केले. नंतर काही वर्षे रत्नागिरी, पुणे आणि मुंबई आकाशवाणीवर अधिकारी म्हणून त्यांनी नोकरी केली. पण गाण्याच्या व्यवसायाला वेळ मिळत नसल्यामुळे त्यांनी आकाशवाणीची नोकरी सोडली व संगीत हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले. त्यानंतर कोलकाता येथील संगीत रिसर्च अकॅडमीमध्ये ते गुरू म्हणून रुजू झाले. भारतातील सर्व नावाजलेल्या संगीत परिषदांमध्ये आपली कला अत्यंत प्रभावीपणे सादर करून त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
गुरू म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक नामवंत शिष्य तयार केले. त्यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना २००८ साली ‘संगीत नाटक अकॅडमी’चा पुरस्कार मिळाला, २०१० मध्ये भारत सरकारने संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. २०१७ साली मध्य प्रदेश सरकारचा ‘तानसेन पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला आहे. याव्यतिरिक्त ‘आदर्श गुरू’, ‘कलागौरव’ असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.
त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या अनेक ध्वनीचकत्या व ध्वनीमुद्रिका बाजारात उपलब्ध आहेत. ग्वाल्हेर गायकीबरोबरच आग्रा आणि जयपूर गायकीचा त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे.