Skip to main content
x

कवडी, प्रभाशंकर

           प्रभाशंकर कवडी १९४७ साली सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी.डी. आर्ट (कमर्शिअल) डिप्लोमाच्या परीक्षेत पहिल्या वर्गात, दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ते १९५२ पर्यंत आधी फेलो आणि नंतर अधिव्याख्याता म्हणून या आर्ट स्कूलमध्येच काम करत होेते. जे. वॉल्टर थॉम्प्सन या विख्यात जाहिरातसंस्थेत त्यांनी ‘कथाचित्रकार’ म्हणून सात-आठ वर्षे काम केले. पण कथाचित्रकार म्हणून त्यांचे खरे नाव झाले ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’त रुजू झाल्यानंतर. ‘इलस्ट्रेटेड वीकली’ व अन्य प्रकाशनांतून कथांना व लेखांना त्यांनी समर्पक अशी चित्रे काढली. त्यासाठी त्यांनी विविध शैलींचा कल्पकतेने वापर केला.

           कवडी यांना साहित्याची उत्तम जाण होती. त्यामुळे साहित्यकृतीचा आशय ते चित्रांमध्ये नेमका पकडत. ‘टाइम्स’मधील चाळीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय भाषांमधल्या कथांसाठी अनेक कथाचित्रे काढली. पंजाबी, तामीळ, मल्याळम, हिंदी, मराठी अशा बहुभाषिक कथांच्या इंग्रजी अनुवादांसाठी चित्रे काढताना कवडी यांनी त्या कथेचा भाषिक पोत, सांस्कृतिक पर्यावरण चित्राच्या तपशिलांमधून आणि शैलीतून साकारण्याचा प्रयत्न केला. कवडी यांनी स्वतःही ललित स्वरूपाचे लेखन केले असल्यामुळे लेखकाच्या भूमिकेशी एकरूप होणे त्यांना सहजसाध्य झाले होते.

           कथाचित्राचा प्राथमिक उद्देश वाचकाला कथेकडे आकृष्ट करणे आणि कथेच्या आशयाला पूरक अशी वातावरणनिर्मिती करणे हा असतो. चांगले कथाचित्र वाचकाला साहित्याप्रमाणेच पुनःप्रत्ययाचा आनंद देते; कारण ते आपल्यापरीने मानवी जीवनाचे दर्शन घडवीत असते. कथाचित्रकाराला कथाविषयाचे, लेखकाच्या शैलीचे जसे भान ठेवावे लागते, तसेच मुद्रणतंत्राच्या मर्यादांची जाणीव ठेवावी लागते. कथाचित्राची शैली, वास्तववादी, उपहासात्मक की गूढतेचे वातावरण असणारी ठेवायची; रेषा वापरायच्या की काळ्या-पांढर्‍या रंगांच्या छटा वापरायच्या; रंग वापरायचे झाल्यास ते कसे आणि कोणते वापरायचे, अशा अनेक गोष्टींचा विचार कथाचित्रकाराला करावा लागतो. कवडी यांनी स्क्रेपरबोर्ड, वॉश ड्रॉइंग, व्यंगचित्रण अशा विविध तंत्र आणि शैलींचा वापर केला, तरीही त्यांची शैली यथार्थदर्शी राहिली. तपशिलांमधून वातावरणनिर्मिती, चित्रांच्या मांडणीतला परिप्रेक्ष्याचा कथनात्मक वापर आणि पात्रांचे स्वभाववैशिष्ट्यांसह केलेले व्यक्तिचित्रण ही त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये सांगता येतील.

           अमेरिकेतील चित्रकार नॉर्मन रॉकवेल यांची चित्रे ज्याप्रमाणे विशिष्ट कालखंडातील अमेरिकन कुटुंबसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात, त्याप्रमाणेच प्रभाशंकर कवडी यांची देशी वाण असलेली चित्रे स्वातंत्र्योत्तर काळातील संक्रमणावस्थेतल्या बहुभाषिक भारतीय संस्कृतीचे प्रातिनिधिक चित्रण करतात. मराठी वाचकांना कवडी यांचा परिचय तुलनेने उशिरा आणि मुख्यतः दिवाळी अंकांमधल्या चित्रांतून झाला; पण कवडी यांचे कथाचित्रांमधील योगदान हे भारतीय पातळीवरचे आहे असे म्हणता येईल.

- दीपक घारे, रंजन जोशी

कवडी, प्रभाशंकर