Skip to main content
x

खेडगीकर, भीमराव भवानराव

बेथूजी गुरूजी

     भीमराव भवानराव खेडगीकर हे स्वामी रामानंद तीर्थ यांचे बंधू होत. भगवान श्रीकृष्णाने भीमाला बेथू असे संबोधल्याचा उल्लेख ज्ञानेश्‍वरीत आहे. आपल्या भावाची प्रकृती भीमासारखी धडधाकट आहे, त्याचे नावही भीमराव आहे, म्हणून स्वामीजी रामानंद तीर्थ यांनी खेडगीकर यांचे नाव ‘बेथुजी’ ठेवले. ते स्वामी रामानंद तीर्थ यांचे धाकटे बंधु होत. त्यांचा जन्म विजपूर जिल्ह्यातील सिंदगी या गावी  झाला. त्यांच्या वडिलांचे नांव भवानराव व आईचे नाव यशोदा.

     बेथूजींच्या बालपणीच प्रथम त्यांच्या आईचे नंतर वडिलांचे निधन झाले. त्यामुळे यांचे पुढील शिक्षण त्यांचे काका रामभाऊ खेडगीकर यांनी केले. बेथूजींनीही आपल्या शिक्षणाचा फारसा भार काकांवर पडू दिला नाही. खाजगी शिकवण्या करत ते हैदराबादच्या निजाम महाविद्यालयामधून बी.ए. (ऑनर्स) व एम.ए.(इंग्रजी) झाले. अनेक हालअपेष्टा सोसून शिक्षण पूर्ण केल्यामुळे बेथूजींच्या मनात गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांविषयी आत्मीयता निर्माण झाली. पुढील आयुष्यात त्यांनी शेकडो गरीब आणि गरजू विद्याथांर्ंना वेळोवेळी मदत केली. कुणाचेही शिक्षण कधीही अडू दिले नाही.

     मोमिनाबादच्या (अंबेजोगाईच्या) योगेश्‍वरी नूतन विद्यालयात ते शिक्षक म्हणून इ.स.१९३६ मध्ये रुजू झाले.  स्वामीजींच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय शिक्षणाचे कार्य तनमनधनाने करू लागले. शाळेसाठी मुले जमा करण्यापासून सगळी कामे ते निष्ठेने करत. ‘तुमचे रामलक्ष्मण आमच्या शाळेेसाठी द्या’, या शब्दात ते पालकांकडे मुलांची मागणी करत. बेथूजींचा विवाह सुलोचनाबाई यांच्याशी १९४० मध्ये झाला.  लग्न झाले त्यावेळी बेथुजी योगेश्‍वरी शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांनी हे पद १९७२ पर्यंत सेवाभावी वृत्तीने सांभाळले. निवृत्त झाल्यावरही त्यांची शाळा सुटली नाही. स्वतःच्या मुलामुलींच्या विकासापेक्षा शाळेतल्या मुलामुलींचा विकास हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. इंग्रजी हा त्यांच्या अध्यापनाचा आवडीचा विषय.

     त्यांचा ध्येयवाद  स्वामी रामानंद तीर्थांच्या आचारांनी आणि विचारांनी भरलेला असायचा. हैदराबाद संस्थान निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होईपर्यंत हैदराबाद मुक्तिसंग्राम हा या ध्येयवादाचा श्‍वास होता. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीनंतर स्वतंत्र भारताचा विकास हा या ध्येयवादाचा श्‍वास ठरला.

     वर्गात धीरगंभीर असणारे बेथूजी गुरूजी सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यातही रमायचे. आपला विद्यार्थी ललित कलांमध्येही पुढे जावा. खेळांचे मैदानही त्याने गाजवावे असा त्यांचा कटाक्ष असायचा.  १९७७ ते १९८० या काळात  योगेश्‍वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद सांभाळत त्यांनी संस्थेचा विकास साधला. याच काळात नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. त्यांचा अध्यक्षपदाचा कालावधी म्हणजेच उच्च पातळीवरचा काटेकोरपणा, नियमितपणा, वक्तशीरपणा, राष्ट्रीयत्व या मूल्यांचा करडा आणि गतिमान कालावधी ठरला. आपल्या कार्याचा ध्यास त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही.

     आपल्या कार्यातून बंधूभावाचे मूल्य कसे रुजवावे याचा कृतिशील आणि प्रेरणादायी वस्तुपाठ बेथुजींच्या जीवनात पाहायला मिळतो.

- प्राचार्य डॉ. संतोष मोतीराम मुळावकर

खेडगीकर, भीमराव भवानराव