Skip to main content
x

मेस्त्री, रवींद्र बाबूराव

             वींद्र बाबूराव मेस्त्री हे कोल्हापुरात जन्मलेले चित्रकार व शिल्पकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. प्रख्यात चित्रकार, शिल्पकार, मूकपट तसेच बोलपटांचे दिग्दर्शक अशी बहुआयामी ओळख असलेल्या कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे ते चिरंजीव असल्याने बालपणापासूनच चित्र आणि शिल्पनिर्मितीच्या बरोबरीने त्यांच्या अन्य कलाविषयक जाणिवाही विकसित झाल्या.

रवींद्र मेस्त्रींच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्यापीठ हायस्कूल व न्यू हायस्कूल, कोल्हापूर येथे झाले. आपल्या मुलाने उच्चविद्याविभूषित व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत असे. म्हणून बाबूराव पेंटरांनी रवींद्र यांना पुणे येथील शिवाजी प्रिपरेटरी स्कूलमध्ये दाखल केले; परंतु त्या प्रकारच्या अभ्यासात ते रमले नाहीत. शेवटी कलेबद्दलची बालपणापासूनची आवड लक्षात घेऊन बाबूराव पेंटरांनी त्यांना मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षण घेण्यासाठी पाठविले.

मेस्त्री १९४८ ते १९५० या काळात जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत होते. अडूरकर, धोपेश्‍वरकर, भोंसुले, पळशीकर अशा दिग्गजांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. याशिवाय जे.जे.मध्ये शिकत असताना ते प्रसिद्ध चित्रकार एस.एल. हळदणकर यांच्याकडे जलरंगाचे धडे घेत होते. बाबूराव सडवेलकर हे त्यांचे वर्गमित्र होते. मेस्त्री यांना व्यक्तिचित्रणात खूप रस होता. या काळात त्यांनी शरीरशास्त्राचा अभ्यास केला व त्यांच्या पुढील आयुष्यात व्यक्तिचित्रण व शिल्पकलानिर्मिती करताना त्याचा उपयोग झाला.

याच दरम्यान मुंबईच्या कलाजगतात नवकलेचे प्रवाह सुरू झाले होते. या सर्व प्रवाहांचा मेस्त्रींनी डोळसपणे अभ्यास केला. परंतु त्या पद्धतीचे काम त्यांनी केले नाही. नवकलेत काम करणार्‍या चित्रकारांची कामे त्यांना आवडायची. ती पाहण्यात त्यांना आनंद वाटायचा, पण ते स्वतः मात्र त्यापासून अलिप्त राहिले.

कलेचे शिक्षण पूर्ण करून देशभरात फिरायचे आणि एक समृद्ध अनुभव घेऊन मुंबईत स्थायिक व्हायचे असे रवींद्र मेस्त्रींचे स्वप्न होते. मात्र कलेचे शिक्षण पूर्ण होण्याच्या आधी त्यांच्या वडिलांना महात्मा गांधींच्या पूर्णाकृती शिल्पाचे प्रतिष्ठेचे काम मिळाले आणि त्यांना मदत करण्यासाठी जे.जे. मधले शिक्षण सोडून रवींद्र मेस्त्रींना कोल्हापूरला जावे लागले.

वडिलांना त्यांच्या कामात मदत करत असताना आपसूकच शिल्पकलेचेही धडे त्यांना मिळत गेले. महात्मा गांधींच्या शिल्पाचे काम सुरू असतानाच बाबूराव पेंटरांचे १९५४ मध्ये निधन झाले. त्यानंतर ते अपूर्ण काम रवींद्र मेस्त्रींनी तरुणवयात पूर्ण केले. यानंतर आपले भाग्य आजमाविण्यासाठी ते पुन्हा मुंबईला गेले. १९५६ मध्ये परीक्षेस बाहेरून बसून त्यांनी ‘जी.डी आर्ट’ पदविका संपादन केली.

वडिलांच्या निधनानंतर घरातील कर्ते म्हणून रवींद्र मेस्त्री यांच्यावर मोठ्या कुटुंबाची जबाबदारी आल्यामुळे पुन्हा कोल्हापूरला परतावे लागले. जे.जे. मध्ये चित्रकलेचे शिक्षण घेतल्यामुळे व व्यक्तिचित्रणाचा चांगला अभ्यास असल्यामुळे अर्थार्जनासाठी त्यांनी व्यावसायिक व्यक्तिचित्रणाची कामे सुरू केली. व्यावसायिक व्यक्तिचित्रे करताना त्या कलाकृतीला अभिजात कलाकृतींचा दर्जा कसा येईल यावर त्यांचे लक्ष असे. त्यांनी १९५२ पासून ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘मौज’ अशा अनेक मासिकांसाठी मुखपृष्ठे रंगविली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व स्नेही पातूरकर यांच्या आग्रहाखातर रवींद्र मेस्त्रींनी डॉ. हेडगेवार व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर जलरंगांत अनेक चित्रे रंगवली. पातूरकरांनी त्यांची गावोगावी, शाळांमध्ये प्रदर्शने भरवली. अशा व्यावसायिक कामाबरोबरच मेस्त्री यांनी प्रत्यक्ष मॉडेलवरूनही चित्रे रंगविली. या कलाकृतींचा बाज काही वेगळाच आहे. तैलरंग हे त्यांचे आवडते माध्यम; परंतु त्यांनी जलरंगांतूनही काही व्यक्तिचित्रे या काळात रंगविली. कलावंत म्हणून चित्र-तंत्रामध्ये न अडकता ते आशयघन कसे होईल, याकडे त्यांचा कटाक्ष असे.

व्यक्तिचित्रणात समोरील मॉडेलशी फक्त साम्य असून चालत नाही, तर चित्रकार व समोरील व्यक्ती यांचे नाते त्यात दिसावे असे ते म्हणत.

कुंचल्याचे मोजकेच, पण अत्यंत सूचक फटकारे मारण्यात मेस्त्रींचा हातखंडा होता. भासमान वास्तव चित्रामध्ये आणण्याच्या पद्धतीने ते चित्रण करत असत. हे करताना इंप्रेशनिस्ट शैलीला जवळची भासावी अशी त्यांची चित्रणशैली होती; पण इम्पॅस्टो पद्धतीचे रंगलेपन मात्र त्यांनी केले नाही. आपले चित्र आपल्याच शैलीत असावे याची ते आटोकाट काळजी घेत असत, म्हणूनच त्यांनी कोणाचेही थेट अनुकरण करायचे टाळले. सुरुवातीच्या काळातही बाबूराव पेंटर यांच्या कलाशैलीचे अनुकरण न करता त्यांनी स्वतःला घडविले. तैलरंगातल्या व्यक्तिचित्रणात त्यांनी स्वतःचा ठसा जसा उमटवला, तशीच पुढील काळात शिल्पनिर्मितीमध्येही आपली मोहर उमटवली.

रवींद्र मेस्त्रींना अनेक कलाप्रदर्शनांतून पुरस्कार प्राप्त झाले. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनांत त्यांना तीन वेळा व्यक्तिचित्रणाचा पुरस्कार मिळाला. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १९५५-५६ मधील कलाप्रदर्शनात ‘शशी’ या व्यक्तिचित्रास रौप्यपदक देऊन ते सर्वोत्तम व्यक्तिचित्र म्हणून गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात १९६२ साली ‘कुमुद’ या त्यांच्या व्यक्तिचित्रास प्रथम पुरस्कार मिळाला. जे. कृष्णमूर्ती आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानाचाही त्यांचा अभ्यास होता. कलानिर्मितीचा आनंद कलावंताने घ्यावा व ती पूर्ण होताच तिच्यापासून अलिप्त व्हावे, त्या चित्रात गुंतू नये. चित्रामध्ये गुंतणे नवनिर्मितीला बाधक ठरते, असे त्यांचे ठाम मत होते.

मेस्त्रींनी १९५४ ते १९७० या काळात कोल्हापुरातील कलानिकेतन या कलाशिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम केले. त्यांची शिकविण्याची पद्धत वेगळी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कामांमध्ये मोकळेपणा व स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती निर्माण झाली. एक उत्तम शिक्षक, चित्रकार, शिल्पकार असलेले मेस्त्री कामातील चुका दाखविताना कोणालाही दुखावत नसत. त्यांच्याजवळ हा दुर्मीळ गुण होता.

मेस्त्रींची अनेक व्यावसायिक व्यक्तिचित्रे महत्त्वाच्या ठिकाणी विराजमान असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर : असेंब्ली हॉल, मुंबई (१९६४), लोकमान्य टिळक : असेंब्ली हॉल, मुंबई (१९८५), छत्रपती शिवाजी महाराज - अफझलखान भेट : बिद्री साखर कारखाना, कोल्हापूर (१९७९), छत्रपती शाहू महाराज : बिद्री साखर कारखाना, कोल्हापूर (१९७९), छत्रपती शाहू महाराज : शाहू स्मारक भवन, कोल्हापूर अशी त्यांची अनेक चित्रे प्रसिद्ध आहेत. यांपैकी शाहू महाराजांच्या चित्राला महाराष्ट्र राज्य शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे.

मित्रांच्या आग्रहाखातर रवींद्र मेस्त्रींनी १९७० च्या दरम्यान शिल्पनिर्मितीची सुरुवात केली. कुस्तीतील विजयी खेळाडूंचे शिल्प ही त्यांची पहिली स्वतंत्र शिल्पनिर्मिती असावी. सध्या हे शिल्प कोल्हापूर येथील जुना राजवाडा चौकात विराजमान झालेले आहे. याशिवाय बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनारूढ स्मारकशिल्प (१९७४), दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन लढणार्‍या बाजीप्रभू देशपांडे यांचे शिल्प पन्हाळा, कोल्हापूर (१९७७), महाराणी ताराबाई यांचे अश्‍वारूढ २१ फूट उंचीचे शिल्प (१९८१), सहकारमहर्षी विखे पाटील यांचे प्रवरानगर येथील दोन पुतळे, वसंतदादा पाटील यांचा मुंबई असेंब्ली हॉलसमोरील पुतळा व कराड आणि सातारा येथील यशवंतराव चव्हाण यांचे पूर्णाकृती स्मारकशिल्प ही त्यांची गाजलेली शिल्पे होत. त्यांनी अनेक अर्धपुतळ्यांची निर्मितीही केली असून त्यांच्या सर्वच शिल्पांत शरीरशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास व प्रतिभा यांचा एकसंघ आविष्कार दिसतो.

कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर विराजमान झालेल्या छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या स्मारकशिल्पात संपूर्ण शिल्पाचा तोल अश्वांच्या मागच्या दोन पायांवर लीलया साधला आहे. अशी अभियांत्रिकी करामत निष्णात व प्रतिभावान कलावंतच करू शकतो. कल्पकता व सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ येथे दिसतो. वीरश्री, मर्दुमकी आणि आवेश यांचा आविष्कार पन्हाळा किल्ल्यावरील बाजीप्रभूंच्या शिल्पातील आकृतिबंधातून व्यक्त होतो. या दोनही शिल्पांचा पोत, त्यांचा आविर्भाव (पोझ), आणि भव्यता त्या व्यक्तिमत्त्वांचे नेमके आणि प्रभावी दर्शन घडवितात.

व्यावसायिक चित्रनिर्मिती व शिल्पनिर्मिती यांमध्ये गुंतल्यामुळे स्वतःसाठी कलानिर्मिती करता आली नाही याची त्यांना खंत होती व ती ते व्यक्तही करीत. पैशांकडे पाहून त्यांनी काम केले नाही. म्हणूनच वडिलांच्या मृत्यूनंतर खूप कामे करूनही मोठे कुटुंब व घर चालवण्यासाठी आवश्यक असणारे अर्थार्जन होणेही कठीण होत असे. म्हणूनच त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

मेस्त्री यांचे चित्रसमीक्षणात्मक भाष्य त्यांच्याच शब्दांत ऐकणे ही कोल्हापुरातील तरुण कलावंतांना एक पर्वणी असे. ते उत्तम मेकॅनिक होते. दुर्बीण, घड्याळ, रायफल, कॅमेरा यांसारख्या गोष्टी ते सहज दुरुस्त करीत असत. त्यांना शिकारीचाही नाद होता. ते उत्तम गाडी चालवत. ते नेहमी इतरांचे चांगले गुण दाखवीत व अवगुणांवर पांघरूण घालीत. त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्याविषयीचा आदर आणखी दुणावत असे. त्यांनी‘दवात भिजली धरती’, ‘तो राजहंस एक’, ‘जिथे गवताला भाले फुटतात’ या नाटकांचे नेपथ्यही केले.

प्रसिद्धिपराङ्मुख असलेल्या रवींद्र मेस्त्री यांचे अल्पशा आजाराने कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कलाकृतींचे पहिले प्रदर्शन नेहरू सेंटरतर्फे १९९७ मध्ये भरविण्यात आले. ‘रवींद्र मेस्त्री : एक कलंदर कलावंत’ हे शीर्षक असलेले त्यांचे चरित्र संजीव मगदुम यांनी लिहिले असून २००७ मध्ये ते प्रकाशित झाले.

- श्रीराम खाडिलकर

मेस्त्री, रवींद्र बाबूराव