Skip to main content
x

पवार, दगडू मारुती

पवार, दया

     दया पवार यांचा जन्म धामणगाव ता. अकोले, जि. अहमदनगर येथे झाला. एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण अकोले- संगमनेर येथे झाले. पुढे नोकरीसाठी मुंबईत प्रयाण केले. मुंबईत आल्यावर कामाठीपुरा येथे त्यांचे वास्तव्य होते. तेथेच महाराष्ट्र बौद्ध साहित्य सभा, प्रगत साहित्य सभा यांच्याशी संबंध आला. या संस्थांच्या संबंधांमुळे १९६८पासून दलित साहित्य चळवळीत सहभाग घेऊ लागले. मुंबई-परळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम करत त्यांनी  पुढील शिक्षण घेतले व पश्चिम रेल्वेच्या कार्यालयात ऑडिटर म्हणून नियुक्ती झाली. १९९० साली भारत सरकारचा ‘पद्मश्री’ हा मानाचा पुरस्कार लाभला तर १९८८ ते १९९६ या काळात बालभारती पाठ्यपुस्तक समितीचे सभासद म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य नाट्य परीक्षण मंडळाचे अध्यक्षपद १९९३ साली लाभले. ‘कोंडवाडा’ कवितासंग्रह (१९७४), ‘बलुतं’ आत्मकथन (१९७८), ‘विटाळ’ कथासंग्रह (१९८३), ‘चावडी’ (१९८३), ‘कल्लपा यशवंत टाळे यांची दुर्मिळ डायरी’ (१९८५), ‘बलुतं एक वादळ’ (१९८७), ‘धम्मपद’ कवितासंग्रह (१९९१), ‘पासंग’ लेखसंग्रह (१९९५) ही पवारांची साहित्यसंपदा आहे. १९८२ साली फोर्ड फाउंडेशनची पाठ्यवृत्ती मिळाली. दया पवार यांच्या पहिल्याच ‘कोंडवाडा’ या कविता संग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर आलेल्या ‘बलुतं’ या आत्मकथनाचा गुजराती, हिंदी, जपानी, जर्मन, फ्रेंच आदी भाषांत अनुवाद झाला. ‘बलुतं’मुळे दया पवार यांचे नाव सर्वदूर पोहोचले. १९८४ साली फ्रँकफर्ट येथील साहित्य मेळाव्यात दया पवार सहभागी झाले. ‘बलुतं’ या आत्मकथनाच्या सहा आवृत्त्या आणि १९ पुनर्मुद्रणे प्रकाशित झाली. एन.एफ.डी.सी.च्या वतीने ‘बलुतं’वर ‘अत्याचार’ नावाचा चित्रपट तयार करण्यात आला. त्यास पटकथेचा प्रथम पुरस्कार मिळाला. मात्र तो प्रदर्शित झाला नाही. दया पवार यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ; महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे; एस.एन.डी.टी. विद्यापीठ, सिन्नर; पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र, उदयपूर; डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, इत्यादी संस्थांचे सदस्यत्व स्वीकारून कामे केली. 

दलित जीवनातील दाहक दुःख-भोगांचे शब्दांकन करताना पवार केवळ विद्रोहाची आक्रस्ताळी भूमिका घेत नाहीत. त्यांच्या लेखनातील व्यासंग, विश्लेषणपरता, चिंतनशीलता, परखडपणा, संवेदनशीलता हे गुण सर्वांना अंतर्मुख करतात. आपल्या साहित्य-निर्मितीच्या प्रक्रियेकडे गंभीरपणे पाहणारे दया पवार मनाच्या अवस्थेतून, बेचैनीतून लेखन करतात. कल्पकतेला, स्वप्नरंजनाला तिथे मुळीच वाव नसतो. म्हणूनच पवार यांचे लेखन कृतिशीलतेला प्रेरणा देणारे ठरते. आपल्या लेखनासंबंधी दया पवार लिहितात, ‘लेखन किंवा कविता लिहिण्यापूर्वी तशी कोणतीही भूमिका मनात नसते. एवढेच काय, अनुभवाला कोणता आकार येणार आहे, याची पुसटशी कल्पना नसते. एकमात्र खरे की एखादी घटना, एखादे वाक्य, किंवा दैनंदिन घटनांचा कार्यकारण भाव ह्यांतून लेखन सुचते. सतत बेचैन असणे, कोणत्याही भौतिक सुखात आनंद न घेता येणे, झुंडीत असूनही मनाने झुंडीबाहेर राहणे हा माझा स्थायिभाव. तसा व्यवहारात मी कमालीचा नॉर्मल, चीड-संताप चेहर्‍यावर उमटत नाही. आपण मुकाटपणे कसे जगतो, एवढे नेभळट कसे हाही प्रश्न पडला. व्यवस्थेत झालेला अपमानाचा बोध मन सतत बेचैन करणारा ठरतो.’

आपल्या लेखनाच्या वाटचालीविषयी दया पवारांनी लिहीले आहे, ‘१९६७ सालापासून त्याच्या आगेमागे असेल कदाचित, मनात अंकुरत होते. त्याला खतपाणी मिळून दलित साहित्याची महाराष्ट्रातील चळवळ, निग्रो साहित्य, वेगवेगळ्या साहित्यिक ग्रुपशी विचाराच्या पातळीवर संघर्ष, कलावादी मंडळींतील चर्चा, ह्या सर्वांचा उपयोग कोंडी फोडण्यासाठी होत होता. अलीकडे वाटू लागते की ‘कोंडमारा’ हा कवितासंग्रह लिहून झाला नसता, तर ‘बलुतं’ लिहिता आले असते की नाही ह्यांची शंका वाटते.’

दया पवार यांनी फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने निघालेल्या डॉ.आंबेडकर यांच्यावरील चरित्रपटाचे पटकथा-लेखन केले. त्याचप्रमाणे ए.एन.डी.सी.च्या वतीने तयार करण्यात आलेल्या डॉ.आंबेडकरांवरील चित्रपटाच्या पटकथा लेखकांपैकी एक लेखक म्हणून पवारांनी काम पाहिले.

- रवींद्र गोळे

पवार, दगडू मारुती