रेगे, रघुनाथ दत्तात्रय
रघुनाथ दत्तात्रय रेगे यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आरोंदा येथे व माध्यमिक शिक्षण कळसूलवार हायस्कूल, सावंतवाडी येथे झाले. मॅट्रिक नंतर ते मुंबईस महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झाले. त्यांनी अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए. व रसायनशास्त्र घेऊन मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. व एम.एस्सी. पदवी मिळवली. त्यानंतर बंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे २ वर्षे राहून त्या संस्थेची असोसिएट ही पदवी मिळवली. त्यांनी हे सर्व शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून केले व आणखी एक शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले. जगप्रसिद्ध रोथॅमस्टेड संशोधन केंद्रात त्यांनी डॉ. सर जॉन रसेल यांच्या मार्गदर्शनाखाली सेल्युलोजयुक्त पदार्थांचे जिवाणू (बुरशी) मार्फत, जीव-रासायनिक विघटन या विषयावर संशोधन करून लंडन विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. भारतात परतल्यावर त्यांना सिंधमध्ये सक्कर धरण येथे पहिली नेमणूक मिळाली. १९३१मध्ये ऊस संशोधन केंद्रावर पाडेगाव, जिल्हा पुणे येथे रुजू झाले व पुढील सरकारी नोकरीचा १९५३पर्यंतचा कार्यकाळ बहुतांश पाडेगाव येथेच व्यतीत झाला.
दुष्काळावर सिंचनाचा उपाय म्हणून १८८२मध्ये मुठा कालवे व १८८५मध्ये नीरा कालवे सुरू करण्यात आले, पण लवकरच जमिनी क्षारपिडीत होत व पाण्याच्या बारमाही वापरासाठी निवडलेले ऊस पीक तोट्यात जात आहे अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. मांजरी येथे १८९२पासून ऊस संशोधन केंद्र सुरू झाले व १९११मध्ये ऊस लागवडीची मांजरी पद्धत विकसित झाली; पण तत्कालीन पुंड्यासारख्या जाती खतामुळे लोळत व उत्पादनवाढ होत नव्हती. म्हणून आय.सी.ए.आर.ने उसाच्या संशोधनासाठी एक खास योजना मंजूर केली. डॉ. रेगे यांनी १९३२-४४ या काळात ऊस पीक शरीरक्रियाशास्त्रज्ञ या नात्याने एक स्वयंपूर्ण संशोधन केंद्र पाडेगाव येथे विकसित केले व ऊस पिकाचा पायाभूत व सांगोपांग अभ्यास केला. दख्खन पाटबंधारे क्षेत्रातील जमिनीचा मृदाशास्त्रज्ञ डॉ. जे.के. बसू यांनी अभ्यास केला. डॉ. रेगे यांनी वेधशाळा स्थापन करून तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश इ. हवामान घटकांचा ऊस पीक उगवणे, फुटवे, वाढ, उसातील शर्करा, पक्वता इ. शरीरक्रियांवर परिणाम सखोल तपासले व येथील हवामानास योग्य अशी लागवड पद्धत सुचवली.
रेगे यांनी उसाखालील जमिनींच्या प्रकारानुसार मुळांची वाढ, खत कोठे, किती व केव्हा घ्यावे, दिलेल्या खताचा ऊस पिकाकडून उपयोग वा निचऱ्यातून ऱ्हास, तसेच ऊस पिकाला पाणी किती लागते याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला व पडलेला पाऊस धरून ११५ एकर इंच पाणी १२ महिन्यांच्या पिकाला पुरेसे आहे असे सिद्ध केले. पीक पोषणासाठी उसाला एकरी ३०० पौंड, ऑक्टोबर लागणी पिकास ३७५ पौंड व आडसाली उसास ४५० पौंड नत्र पुरेसा असतो असे सिद्ध केले. निरींद्रिय व सेंद्रिय नत्राचे १:२ प्रमाण असावे असे सुचवले. सेंद्रिय नत्रासाठी भुईमूग, करडई इ. पेंडी वापरल्या जात, पण पेंड न मिळाल्यास नुसते रासायनिक नत्रखत वापरू नये व त्यासोबत एकरी १० टन शेणखत अथवा कंपोस्ट वापरणे आवश्यक आहे असे निश्चित प्रतिपादन त्यांनी अभ्यासाद्वारे केलेले आहे.
उत्तरोत्तर पेंडींची उपलब्धता कमी झाल्याने नत्रासोबत स्फुरद व पालाश देणे आवश्यक असल्याचे त्यांना आढळून आले. पाडेगाव केंद्र सुरू होण्यापूर्वी पुंड्या व इतर फुले येणाऱ्या व खताला प्रतिसाद न देणाऱ्या जातींवर प्रयोग केले गेले. नंतर कोईमतूर व हेन्नाळ (म्हैसूर) येथून नवीन सुधारित जाती येऊ लागल्या व त्यांची महाराष्ट्रासाठी योग्यतेची पडताळणी पाडेगाव केंद्रात सुरू करण्यात आली. त्यातून उपयुक्त सिद्ध झालेली सी.ओ. ४१९ ही जात डॉ. रेगे यांनी शिफारस केली व ती बरीच वर्षे दख्खन पाटबंधारे क्षेत्रात टिकून राहिली. त्यांचे वैशिष्ट्य असे की, आपल्या संशोधनाचे निष्कर्ष ते साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करून तपासून घेत. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखाने व ऊस शेतकऱ्यांना पाडेगाव केंद्राच्या संशोधनाचा ऊस लागवडीत प्रत्यक्ष उपयोग व फायदा जाणवे व त्यामुळे त्यांनी केलेल्या छोट्या व मोठ्या शिफारशी शंका न घेता सर्वत्र कार्यान्वित होत. या केंद्रामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्रातील ऊस लागवड व साखर कारखाने अग्रस्थानी राहिले व महाराष्ट्राचे नाव प्रकाशमान झाले.
१९४१मध्ये ब्रिटिश सरकारने डॉ. रेगे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रावबहादूर ही पदवी सन्मानाने बहाल केली. १९४४-४८ दरम्यान कृषि-उपसंचालक या पदावर व नंतर १९५३मध्ये निवृत्त होईपर्यंत ऊस-विशेषज्ञ या पदावर रेगे कार्यरत राहिले. ऊस उत्पादनवाढ ही चळवळ व्हावी यासाठी ऊस उत्पादनाच्या स्पर्धा त्यांनी सुरू केल्या. १९३१ पूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या ऊस पिकास शास्त्रीय बैठक देऊन व संशोधन करून ते संशोधन शेतकऱ्याला पोचवून ऊस पिकास महाराष्ट्रात भक्कम पायावर उभे केले.
आज महाराष्ट्रातील ऊस पिकाला आलेल्या उर्जितावस्थेस डॉ. रेगे यांचे पायाभूत योगदान निश्चितपणे महत्त्वाचे होय. १९५३ साली निवृत्त झाल्यावर पॅरी कंपनी (मद्रास) येथे ते सल्लागार म्हणून व ईस्टर्न शिपिंग कॉर्पोरेशनच्या वालचंद कारखान्यात १९६३पर्यंत कार्यरत राहिले. ते पुणे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पदव्युत्तर मार्गदर्शक होते व पाडेगावला संशोधन करून एम.एस्सी. (कृषी) प्राप्त करणारे त्यांचे अनेक विद्यार्थी होते. अनेक संशोधनपर लेख, अहवाल त्यांनी लिहिले आहेत व आजही ऊस पिकास संशोधन करणाऱ्यास त्यांच्या संशोधनाची दखल घ्यावी लागते.