Skip to main content
x

शेरीकर, आदिनाथ तातोबा

       दिनाथ तातोबा शेरीकर यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून १९७५मध्ये पशुवैद्यकीय पदवी आणि १९७७मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी १९८६मध्ये बा.सा.को.कृ.वि.तून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांची १९७९मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी १९८१ ते २००० या काळात निरनिराळ्या पदांवर काम केले व ते महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या उपकुलगुरू या पदावर ते २०००-२००७ या काळात कार्यरत होते.

       डॉ.शेरीकर हे मांस आणि मांसापासून मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे गुणवत्ता निकष निश्‍चितीकरणासाठी सुरू करावयाच्या पश्‍चिम विभागीय संदर्भ प्रयोगशाळेच्या स्थापन प्रक्रियेचे प्रकल्प समन्वयक होते. पशूंच्या कत्तलीनंतर शास्त्रीय पद्धतीने शरीराची धुलाई करणे आणि रासायनिक मलिनता (अवशेष) दूर करून मांस साठवून ठेवणे याबाबत भा.कृ.अ.सं.ची साठवणक्षमता व कार्यक्षमता कालावधी वाढवण्याची योजना डॉ. शेरीकर यांच्या देखरेखीखाली यशस्विरीतीने राबवण्यात आली. ते मांस आणि मांसनिर्मित पदार्थांतील सूक्ष्म जिवाणूंसंबंधी निकष निश्‍चित करण्याविषयीच्या भा.कृ.अ.सं.च्या योजनेचे प्रमुख अन्वेषक होते. त्यांनी या संस्थेने साहाय्य केलेली ‘मांसाची वर्गवारी आणि चाचण्यांवरून मांस कोणत्या प्राण्याचे आहे हे ठरवणे’ ही योजना यशस्वी करून चाचण्या विकसित केल्या. केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने मान्यता दिलेली व निर्यातवाढीसाठी सुचवलेली ‘एकट्या किरणोत्सर्जनाने आणि किरणोत्सर्जनाबरोबर रासायनिक द्रव्यांचा वापर करून त्यांचा सूक्ष्म जीवांवर (जिवाणू व विषाणू) होणारे परिणाम आणि त्यामुळे मांसाच्या गुणवत्तेवर होणारे परिणाम’ ही योजना राबवली आणि यशस्वी करून दाखवली.

       डॉ. शेरीकर हे म्हैसवर्गीय प्राण्यांच्या स्वादुपिंड आणि फुफ्फुसे यापासून अनुक्रमे इन्सुलिन व हिपॅरीन वेगळे करणे ही योजना यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाचे सदस्य होते. त्यांनी पशूंच्या शरीराची कत्तलीनंतर स्वच्छता करण्यासाठी भारतीय बनावटीचे फवारायंत्र विकसित केले. त्यांनी मांसामधील भेसळ (अन्य पशूचे मांस मिसळणे) आणि पशूंचा प्रकार ओळखणे यासाठी जलद क्षेत्रीय चाचणी विकसित केली. तसेच मंडल परीक्षा तंत्र विकसित करून जलद क्षेत्रीय परीक्षेसाठी निकष निश्‍चित केले. त्यांनी दूध, मांस आणि सागरी अन्न (प्रामुख्याने मासळी) यातील जिवाणू प्रतिबंधक औषधे, कीडनाशके, अंतरस्राव यांचे अवशेष (अनुशेष) ओळखण्याचे व ते मोजण्याचे तंत्र विकसित केले आणि त्यांची नियमावली तयार केली. त्यांनी दूध व सागरी अन्न यामधील प्रबळ धातू ओळखण्याविषयक निकष ठरवले व नियमावली तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम यशस्वी केले.

       डॉ. शेरीकर यांनी २००१मध्ये संशोधनविषयक सल्लागार समितीचे अध्यक्ष, २००३-०६ या वर्षांत भारतीय पशुवैद्यकीय अनुसंधान संस्थेच्या संशोधन सल्लागार समितीचे अध्यक्ष, २००३-०६मध्ये भारतीय पशुवैद्यकीय परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य, २००३-०६ या काळात भारतीय पशुवैद्यकीय अनुसंधान संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य, इतर अनेक राष्ट्रीय स्तरावरील समित्यांवर सदस्य म्हणून कार्य केले.

       डॉ. शेरीकर ‘मांसाविषयीच्या संशोधनातील प्रगती’ या पुस्तकाचे सहसंपादक आणि ‘पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्यशास्त्रातील मूलतत्त्वे’ या पुस्तकाच्या संपादकीय मंडळाचे अध्यक्ष होते व त्यांनी या पुस्तकातील पाच प्रकरणांचे लेखन व सहलेखन केले. डॉ. शेरीकर यांना १९७९-८० या वर्षी भा.कृ.अ.सं.चे संशोधक गट द्वैवार्षिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांना १९८०मध्ये अल्फा लाव्हल चर्चासत्र स्पर्धा पारितोषिक, १९९१मध्ये वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पारितोषिक आणि २००७मध्ये उत्कृष्ट दूरदृष्टी पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांना राष्ट्रीय पशुवैद्यकीय शास्त्र प्रबोधिनी आणि पशुवैद्यकीय संशोधन संघटनेने सन्माननीय सदस्यत्व प्रदान करण्यात आले.

- संपादित

शेरीकर, आदिनाथ तातोबा