Skip to main content
x

तेंडूलकर, प्रिया विजय

     नाटक, सिनेमा, मॉडेलिंग, पंचतारांकित हॉटेलमधील नोकरी, लेखन, दूरदर्शन माध्यमातील कार्यक्रम अशा अनेकविध माध्यमांतून स्वत:ला आजमावत स्वत:ची जागा निर्माण केली ती प्रिया विजय तेंडुलकर यांनी.

     प्रिया विजय तेंडुलकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. ज्येष्ठ नाटककार आणि पटकथाकार विजय तेंडुलकर आणि निर्मला तेंडुलकर यांची मुलगी प्रिया; सुषमा, तनुजा आणि राजा या आपल्या भावंडांसमवेत एका मध्यमवर्गीय कुटुंबात आनंदी आणि समाधानी होती.

      जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स या कलामहाविद्यालयात पदविकेचे शिक्षण घेत असताना अमृता शेरगील आणि सॉमरसेट अशा ज्येष्ठ कलाकारांचा आदर्श त्यांनी समोर ठेवला होता. पण प्रत्यक्ष अभ्यासामधील मेहनत लक्षात आल्यानंतर, त्याच विचारात असताना एकदा साडीच्या एका जाहिरातीकरता मॉडेल म्हणून त्यांना अचानक विचारणा झाली आणि तेव्हापासून जाहिरातक्षेत्रात त्यांना हळूहळू संधी मिळत गेल्या. याच सुमाराला ‘मुखपृष्ठावरील चेहरा’ म्हणूनही त्यांना प्रसिद्धी मिळाली. फेमिना, ब्यूटिफुल ईव्हज वीकली, धर्मयुग अशा प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या मासिकांच्या मुखपृष्ठावर प्रिया तेंडुलकर यांचे फोटो जवळजवळ  एकाच वेळी छापून आले.

      प्रिया तेंडुलकर यांनी १९६९ साली गिरीश कर्नाड यांच्या ‘हयवदन’ या नाटकामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी या नाटकात कल्पना लाझमींबरोबर एका बाहुलीची भूमिका केली. ‘पिग्मॅलियन’, ‘अँजी’, ‘कन्यादान’, ‘सखाराम बाइंडर’, ‘कमला’ अशा काही नाटकांमधूनही प्रिया तेंडुलकर यांनी भूमिका केल्या. अशा हौशी आणि व्यावसायिक नाटकांबरोबरच हिंदी आणि मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी निरनिराळ्या भूमिका केल्या. ‘अंकुर’ या १९७२ साली प्रदर्शित झालेल्या श्याम बेनेगल यांच्या पहिल्या वास्तवदर्शी चित्रपटात त्यांनी अनंत नाग यांच्या सोशिक पत्नीची भूमिका साकारली. रंगभूमी, जाहिरात क्षेत्र, दूरदर्शन या माध्यमांमध्ये हिंदी भाषिक कलाकारांबरोबर आणि कलाकृतींशी त्यांनी सहजपणे जुळवून घेतले.

      अशोक सराफ, रवींद्र महाजनी, महेश कोठारे या सहकलाकारांबरोबर ‘गोंधळात गोंधळ’ (१९८४), ‘मुंबईचा फौजदार’ (१९८५) अशा काही मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केले. याशिवाय ‘मिनचिना ओटा’ या कानडी चित्रपटात अनंत नाग यांना तुल्यबळ अशी महत्त्वपूर्ण भूमिका केली. ‘पूजा ना फूल’ या गुजराती चित्रपटामधली नायिकेची त्यांची भूमिकाही नावाजली गेली.

       १९८५ साली बासू चॅटर्जी यांनी दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या ‘रजनी’ या साप्ताहिक मालिकेमध्ये प्रिया यांना संधी दिली. या मालिकेच्या अफाट लोकप्रियतेमुळे प्रिया तेंडुलकर हे नाव तेव्हा चर्चेत राहिले. ‘रजनी’ या भूमिकेमुळे त्यांना स्वतंत्र अशी ओळख मिळाली. याच मालिकेतील सहकलाकार करण राजदान यांची प्रत्यक्ष जीवनातही ‘जोडीदार’ म्हणून साथ मिळाली. १९८८ साली ‘करण राजदान’ यांच्याशी त्यांनी विवाह केला. पण अवघ्या सात वर्षांच्या सहजीवनानंतर काही मतभेदानंतर १९९५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

       रजनी मालिकेनंतर गुलजार यांच्या ‘स्वयंसिद्धा’ या स्त्रीवादी मालिकेतही प्रिया तेंडुलकर यांनी काम केले. ‘महानगर’, ‘हक्के-बक्के’, ‘किस्से मियाँ बिवी के’ अशा काही मालिकांमधील अभिनयासाठीही प्रिया यांचे नाव घेतले जाते.

      प्रिया यांनी कथालेखनाद्वारे आणि वर्तमानपत्रातील सदरलेखनाद्वारे वारशाने मिळालेली लेखनकलाही जोपासली. १९९६ साली ‘असंही’ हा निवडक सदरलेखनाचा संग्रह प्रकाशित झाला. २००० सालापर्यंत त्यांचे ‘जन्मलेल्या प्रत्येकासाठी’, ‘ज्याचा त्याचा प्रश्‍न’ आणि ‘जावे तिच्या वंशा’ हे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले. या कथासंग्रहातून माणसांच्या आयुष्याकडे, विशेषत: स्त्रियांच्या आयुष्याकडे पाहाण्याचा स्वतंत्र आणि व्यापक दृष्टिकोन दिसतो. कधी संवेदनशील, कधी उपहासात्मक तर कधी चिंतनशील लेखन करणारी मनस्वी लेखिका म्हणून प्रिया तेंडुलकर यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. सुरुवातीच्या काळात स्वत:चा मार्ग शोधत असताना हवाईसुंदरी म्हणून केलेल्या नोकरीने, तसेच रिसेप्शनिस्ट म्हणून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केलेल्या नोकरीने त्यांना अनुभवसमृद्ध केले. जगाची ओळख करून देणारे स्वानुभव त्यांनी ‘पंचतारांकित’ या चरित्रवजा पुस्तकात अतिशय सहजसोप्या व ओघवत्या शैलीत मांडले आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या प्रिया तेंडुलकर यांच्या लिखाणाचा ठसा कथालेखनातही उमटला आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाच्या पुरवणीमध्ये ‘फर्स्ट पर्सन’ या शीर्षकाने जुलै २००० ते मार्च २००१ या काळात त्यांनी सदर लिहिले. हे सदरलेखनही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले.

     खाजगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित झालेल्या ‘प्रिया तेंडुलकर टॉक शो’ आणि त्यानंतर ‘जिम्मेदार कौन’ या चर्चात्मक कार्यक्रमाने त्यांना बरीच मान्यता मिळाली. त्यांनी राजकारणाशी आणि समाजकारणाशी संबंधित चालू घडामोडींवर आधारित या कार्यक्रमाची अभ्यासपूर्वक आखणी केली. अतिशय नाजूक तसेच ज्वलंत प्रश्‍नांवरही चर्चा घडवून आणण्यातही त्यांचे कसब होते. विषयाशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांना, मान्यवरांना सहभागी करून कार्यक्रमाचे सादरीकरण वरवरचे नाही, तर संशोधनपूर्ण केले. अत्यंत धीटपणे, परखडपणे, आत्मविश्‍वासाने केलेल्या सादरीकरणाने हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. त्याचे साठपेक्षा जास्त भाग प्रसारित झाले. या कार्यक्रमाने काही वेळा त्या वादाच्या भोवऱ्यातही अडकल्या, पण तरीही नेटाने त्यांनी आपले काम सुरू ठेवले.

     आयुष्याची शेवटची काही वर्षे प्रिया तेंडुलकर यांना कर्करोगाने ग्रासले होते. वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी रात्री झोपेतच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एका गुणी अभिनेत्रीने, लेखिकेने अल्पायुष्यातच कलाजगताचा निरोप घेतला.

- नेहा वैशंपायन

तेंडूलकर, प्रिया विजय