Skip to main content
x

तळवलकर, शरद गणेश

     पु.ल. देशपांडे यांनी शरद तळवलकरांच्या अभिनयाचे मार्मिक वर्णन करून ठेवले आहे. ते म्हणतात, “अभिनयातील सहजता हा दुर्मीळ गुण शरदमध्ये आहे. आपलं बोलणं विनोदी करायला त्याला कसलीही युक्ती वापरावी लागत नाही. नाटककाराने लिहिलेला संवाद पुरेसा हशा पिकवणारा नाही, या समजुतीने काही विनोदी नट आपली विनोदबुद्धी वापरतात, नको त्या ठिकाणी नको इतके अंगविक्षेप करतात. हशा पिकवण्यासाठी शरदला यापैकी कशाचीच गरज भासली नाही.”

     शरद गणेश तळवलकर यांचा जन्म नगर जिल्ह्यातील बोधेगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमधून झाले. शाळेत असताना ते शिक्षकांच्या नकला हुबेहूब करायचे. १९३५ साली ‘रणदुंदुभी’ नाटकात शिशुपालाची भूमिका करणारा कलाकार ऐन वेळी अडला आणि शरद तळवलकरांनी आपल्या अभिजात कलागुणांनी त्या भूमिकेत कमालीचा रंग भरला. तेव्हापासून दर वर्षी स्नेहसंमेलनाच्या नाटकात त्यांच्यासाठी आग्रह धरला जाऊ लागला. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्या पाहण्यात त्यातील एक भूमिका आली आणि त्यांच्या ‘नाट्य विकास’ संस्थेत त्यांनी तळवलकरांना निमंत्रण दिले. नाटकात कामे करणे ही त्या काळात फारशी समाजमान्य गोष्ट नव्हती. वडिलांनी नाटक कंपनीत जाण्यास विरोध केल्यानंतर नाटकाच्या वेडापायी शरद तळवलकरांनी घर सोडले.

     अभिनयाबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी तळवलकर कोल्हापूरला मा. विनायक यांच्या ‘हंस पिक्चर्स’मध्ये बाबूराव पेंढारकरांना भेटले. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आधी शिक्षण पूर्ण करायचे ठरवून जोडीला अकाऊंटंटची नोकरी पत्करली. महाविद्यालयाच्या नाटकांतूनही त्यांच्या भूमिका प्रेक्षकप्रिय झाल्या. व्यावसायिक नाटकांतून भादव्या, फाल्गुनराव, कामण्णा, तळीराम, धैर्यधर अशा भूमिका शरद तळवलकर करू लागले. १९५२ साली गाजलेल्या ‘पेडगावचे शहाणे’ आणि ‘लाखाची गोष्ट’ या राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटांत त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. तसेच, दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटात लक्षात राहण्याजोगी भूमिका मिळाली.

     १९५५ साली आलेल्या ‘करायला गेलो एक’ या तुफान विनोदी फार्सने शरद तळवलकरांचे नाव महाराष्ट्रभर केले. तेथून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू झाली. अभिनयाच्या वेडापायी त्यांनी पुणे विद्यापीठातील नोकरीही सोडली. पुढे राजा गोसावी यांच्याबरोबर ‘अवघाची संसार’, ‘दोन घडीचा डाव’ आणि ‘याला जीवन ऐसे नाव’ हे त्यांचे चित्रपट गाजले. ‘रंगल्या रात्री अशा’ (१९६२) या चित्रपटात शरद तळवलकरांना आव्हानात्मक भूमिका मिळाली. ‘बायको माहेरी जाते’ या चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिकाही गाजली. अत्यंत सहज आणि उत्स्फूर्त अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

     शरद तळवलकरांनी १९५१ साली कारवारला व्यावसायिक रंगभूमीवर ‘संशयकल्लोळ’मधील सुभानराव सर्वप्रथम केला. मग ‘खडाष्टक’मधील कर्कशराव, ‘लग्नाची बेडी’मधील गोकर्ण, अवधूत या व्यक्तिरेखा केल्या. ‘अपराध मीच केला’मधील गोके मास्तर, ‘दिवा जळू दे सारी रात’मधील पोस्ट मास्तर, या व्यक्तिरेखांबरोबरच ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘घरोघरी हीच बोंब’, ‘आप्पाजींची सेक्रेटरी’ या नाटकांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या.

     ‘मुंबईचा जावई’ (१९७०), ‘धाकटी मेहुणी’, ‘आली अंगावर’, ‘नवरे सगळे गाढव’ (१९८२), ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘गडबड घोटाळा’ आदी चित्रपटांतील त्यांच्या विनोदी भूमिका गाजल्या. ‘धूमधडाका’मध्ये शरद तळवलकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगवलेला चित्रपटाची कथा सांगण्याचा प्रसंग तर कोण विसरेल? ‘एकटी’, ‘लेक चालली सासरला’, ‘अष्टविनायक’, ‘कैवारी’ या चित्रपटांतील चरित्र भूमिकाही त्यांनी अजरामर केल्या. ‘मी रंगवलेले म्हातारे’ आणि ‘गुदगुल्या’ या त्यांच्या पुस्तकांना राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला.

     असा हा चतुरस्र कलावंत अखेरपर्यंत रंगभूमीवर कार्यरत राहिला. ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘सखी शेजारिणी’ आदी नाटकांचे प्रयोग सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. विनोदाच्या आणि सहजसुंदर अभिनयाच्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला.

- अभिजित पेंढारकर

तळवलकर, शरद गणेश