Skip to main content
x

तर्खडकर, दादोबा पांडुरंग

      वसई जवळचे तर्खड हे मूळ वसतिस्थान सोडून आजोबा रोजगारासाठी मुंबईत आले. शेतवळीत (हल्लीच्या खेतवाडीत) दादोबांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग व आईचे नाव यशोदाबाई होते. वडिलांनीच त्यांना घरी शिकवण्यास आरंभ केला.

 १८२२ मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दादोबा इंग्रजी शिकू लागले. जर्विस साहेबांच्या हाताखालील एक-दोन पंडित व रामचंद्रशास्त्री

 जानवेकरांनी मिळून प्रश्‍नोत्तर रूपाने एक लहानसे मराठी व्याकरण रचले होते. त्या व्याकरणाच्या प्रती लिहून त्यावरून मुले व्याकरण शिकत. बापूशास्त्री शुक्ल  यांनी शाळेतील  मुलांकडून अनेक ग्रंथ वाचून घेतले. ते मोठ्या प्रेमाने शिकवीत. मला स्वभाषेविषयी इतकी गोडी लागली यास मुख्य कारण आमच्या तीर्थरूपांची दिनचर्या व दुसरे हे बापूशाशास्त्री असे दादोबांनी नमूद करून ठेवले आहे.

१८२८ साली जगन्नाथ पांडुरंग यांची एकुलती एक कन्या कृष्णाबाई यांच्याशी दादोबांचा विवाह झाला. दादोबा पांडुरंग यांनी संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे सखोल अध्ययन केले होते. मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून त्यांनी  १८३६ मध्ये त्यांनी मराठी व्याकरण लिहिले.

मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे समाजसुधारक असा लौकिक त्यांनी मिळवला. मराठी भाषेचे पाणिनीअशी कीर्ती त्यांनी संपादन केली.  १८४०-४१ मध्ये नेटिव एज्युकेशन सोसायटीच्या जागी सरकारने बोर्ड ऑफ एज्युकेशन स्थापन केले. त्यात सहा एतद्देशीय व सहा युरोपियन असावेत असा नियम होता. जगन्नाथ शंकरशेट, फ्रामजी कावसजी, जमशेटजी जीजीभाई इत्यादी एतद्देशीय महानुभाव मंडळात होते. एलफिन्स्टन संस्थेमध्ये इंग्रजीचे सहकारी शिक्षक म्हणून काम केल्यावर दादोबा सुरतेत स्थापन झालेल्या इंग्लिश शाळेत कार्यकारी शिक्षक म्हणून दरमहा दीडशे रुपये वेतनावर नियुक्त झाले. ते गुजरातीचे रोमन लिपित आणि गुजरातीचे इंग्रजीत भाषांतराचे कामही करून देत. पुढे मुंबईच्या शाळेत त्यांची नेमणूक जून १८४६ मध्ये झाली आणि त्यांना क्रमाने बढत्या मिळत गेल्या.

दादोबांनी सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी ही पदे भूषविली. सेवानिवृत्तीनंतर अल्पकाळ त्यांनी ओरिएंटल ट्रान्सलेटर या हुद्द्यावर काम केले.

इंग्रजी अमदानीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहे. प्रांजळ, साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या या ग्रंथात तत्कालीन धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय स्थितीचे प्रतिबिंब पडले आहे. अभ्यासकांच्या दृष्टीने ते मोलाचे आहे, शिवाय वेगवेगळ्या चळवळींशी निगडित दादोबांचे व्यक्तिमत्त्वही वाचकाला त्यात दिसून येते. दादोबांनी विविध प्रकारचे लेखन केले. मराठी भाषेचे व्याकरण (अनेक आवृत्त्या), लघु व्याकरण (१८५०), केकावली - यशोदा पांडुरंगी टीकेसह (१८३५) याची प्रस्तावना इंग्रजी व मराठी भाषांमध्ये आहे.

महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाची पूरणिका (१८८१) परमहंसिक ब्रह्मधर्म (१८००), शिशुबोध (१८८४ मध्ये प्रकाशित), धर्मविवेचन, विधवाश्रुमार्जन (१८५७), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०); स्वीडन बॉर्ग यांच्या ग्रंथावर लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग’ (१८७८) या ग्रंथाची युरोपात प्रशंसा झाली होती. मानव धर्म सभाआणि परमहंस सभाया धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. या खेरीज मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इत्यादी संस्थांच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असे. मध्य प्रदेशातील जावरा येथे शिक्षक म्हणून कामगिरीवर असताना दादोबांनी भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड हिमतीने मोडून काढले. त्यांच्या या मोलाच्या कार्याबद्दल सरकारने दादोबांना रावबहाद्दूर ही पदवी बहाल केली होती. मुंबईमध्ये दादोबांचे निधन झाले.

- वि. ग. जोशी

संदर्भ :
१. जोशी, लक्ष्मणशास्त्री; ‘मराठी विश्वकोश’ , खंड ७;  महाराष्ट्रराज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई; १९७६. २.+ मराठी वाङ्मय सेवक द्वितीय खंड ;  १९३८           खानोलकर, गं . दे., संपादक; ३. प्रियोळकर  अ. का.संपादक  ‘दादोबा पांडुरंग’  ,

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].