Skip to main content
x

जाधव, रावसाहेब गणपत

रावसाहेब जाधवांचे घराणे ऐतिहासिक असून ते सातारा जिल्ह्यातील काशीळ इथले आहे. जाधवांचे वडील गणपतराव बडोदा संस्थानात फडणीस होते. रावसाहेब यांचा जन्म बडोदा येथे झाला. त्यांचा बालपणीचा काळ पुण्यात गेला. १९४९ साली ते मॅट्रिक झाले. त्याच वर्षी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेतल्या जात असलेल्या ‘साहित्य विशारद’ या परीक्षेत ते महाराष्ट्रात पहिले आले. लगेचच त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात नोकरी लागली. स्वारगेट (पुणे), संगमनेर, नाशिक या ठिकाणी त्यांनी सुमारे दहा वर्षे काम केले. याच काळात त्यांनी बाहेरून मराठी विषयात एम. ए. केले (१९५८). पुण्याच्या वास्तव्यातच ते साहित्याकडे आकर्षित झाले होते. साप्ताहिक स्वराज्यमध्ये आईवर लिहिलेली ‘न बिघडणारे यंत्र’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘प्रसाद’, ‘सह्याद्री’, ‘यशवंत’, ‘हंस’, ‘वाङ्मयशोभा’, ‘छंद’ इत्यादी मासिकांतून त्यांच्या कथा प्रारंभीच्या काळात प्रसिद्ध होत गेल्या. एकांकिका, कविता व दीर्घकविताही त्यांनी लिहिल्या. एक नाटकही त्यांनी लिहिले होते; पण ते प्रसिद्ध झाले नाही.

नंतर विदर्भ महाविद्यालय अमरावती, एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबई आणि मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे १९७० पर्यंत त्यांनी सुमारे दहा वर्षे मराठीचे अध्यापन केले. १९७० ते १९९० ही वीस वर्षे महाराष्ट्र शासनाच्या वाई येथील ‘मराठी विश्वकोशा’च्या मानव्य विद्या विभागाचे विभाग संपादक म्हणून त्यांनी काम केले. पुढे ‘मराठी विश्वकोश मंडळा’चे अध्यक्ष आणि प्रमुख संपादक म्हणून त्यांनी २०००-२००१ या काळात जबाबदारी स्वीकारून कोशाचे काम बरेच पुढे नेले. निवृत्तीनंतर पुण्यात आल्यावर त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे काम केले. दरम्यान प्राध्यापकी आणि विश्वकोश संपादन चालू असताना त्यांच्यातील सर्जनशील लेखक मागे पडला आणि जवळपास अर्धशतक त्यांनी मराठी वाङ्मय विश्वाला समीक्षक हीच ओळख आहे. समीक्षेकडे वळण्याचे कारण सांगताना ते म्हणतात, ‘....आमच्या अंतर्बाह्य वाङ्मयीन गोवणुकीचा तो कालखंड होता. या साहित्याचे तर्कसंगत विश्लेषण करणे गरजेचे होते. या साहित्याशी समरस होऊन त्याची समीक्षा करू लागलो. ....आमचे भाग्य असेे की, साहित्याच्या बहरलेल्या कालखंडात आम्ही उभे होतो. साहित्यकृती स्वान्तः सुखाय समजून घेतली, त्याचीच समीक्षा झाली.’

‘वियोगब्रह्म’ (१९९५) या कवितासंग्रहात पत्नीच्या निधनानंतर मनाच्या भावाकूल, विषण्ण अवस्थेत लिहिलेल्या कविता आहेत. यामधून संवेदनशील असे वेगळेच जाधव दिसतात. ‘मावळतीच्या कविता’ मध्येही (१९६६) चिंतनशीलतेने जीवनानुभवाकडे पाहणारे कविमन प्रकटले आहे.

सर्वक्षेत्रीय समीक्षा-

त्यांच्या समीक्षेला साहित्यातील कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. आत्तापर्यंत पस्तीसच्या पुढे त्यांचे समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध झाले असून त्यात संत साहित्यापासून मराठी कथा, कविता, कादंबरी, नाटक, निबंध इत्यादी सर्व प्रकारांच्या बरोबरच चित्रपट समीक्षेचाही अंतर्भाव आहे. ‘आनंदाचा डोह’ मधून (१९७३) त्यांनी संत तुकारामांच्या अभंगांची वस्तुनिष्ठ आणि कालसापेक्ष समीक्षा केली आहे. ‘निळी पहाट’ (१९७८), ‘निळी क्षितिजे’ (१९८२) यांमधून त्यांनी साठोत्तरी दलित साहित्याचा साक्षेपी वेध घेतला आहे. ‘निळे पाणी’मध्ये वामन चोरघडे, पु. भा. भावे, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, पु.शि.रेगे, शंकर पाटील, बाबूराव बागूल इत्यादी भिन्न प्रकृतीच्या परंतु वाचकप्रिय कथाकारांच्या कथांची मर्मग्राही समीक्षा केली आहे. ‘पंचवटी’ (१९८५), ‘अश्वत्थाची सळसळ’ (१९८५), ‘सांस्कृतिक मूल्यवेध’ (१९९२), ‘आधुनिक मराठी कवयित्रींची कविता’ (१९९६), ‘प्र.के.अत्रे साहित्यदृष्टी व साहित्यविचार’ (१९९७), ‘आगळीवेगळी नाट्यरूपे’ (१९९८), ‘वागर्थ’ (२०००), ‘वासंतिक पर्व’ (२००९), ‘निवडक समीक्षा’ ही त्यांची समीक्षेतील आणखी काही पुस्तके. जाधवांची समीक्षा उपहासगर्भ नाही. ती साक्षेपी, समतोल, आस्वादक आणि प्रेरकही आहे.

२००४ साली औरंगाबाद येथे झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. त्या वेळच्या जवळपास छप्पन्न छापील पृष्ठांच्या अध्यक्षीय भाषणातील विचारांचे सर्वदूर स्वागत झाले. ‘अध्यक्षीय तत्त्वचिंतन’, ‘ज्ञानोपासकाचा समाजधर्म’ अशा शीर्षकांचे अग्रलेख मान्यवर मराठी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. या भाषणात त्यांनी मराठी वाङ्मयाचा आणि भाषेचा समग्र आढावा घेतला. ते म्हणतात, ‘मराठी ही ज्ञानभाषा म्हणून ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासूनच हळूहळू घडत आली आहे आणि घडतही राहणार आहे. आपल्या समाजातील ज्ञानोपासनेचे निकोप पर्यावरण निर्माण करीत राहणे यासाठी इष्ट ठरते. प्रा.जाधव यांच्यावर ‘संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव’ हा सुमारे ४०० पेक्षा जास्त पृष्ठांचा समग्र ग्रंथ (२००४) सिद्ध झाला असून ते वैशिष्ट्य आहे. ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड’, ७ (२००९) आणि ‘निवडक साधना’, खंड ८ (२००७) याचे ते संपादक आहेत.

२०१३ साली जाधव यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित  करण्यात आले. 

२०१६ साली त्यांचे निधन झाले. 

- मधू नेने

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].