Skip to main content
x

जोशी, अशोक महादेव

            शोक महादेव जोशी हे सुप्रसिद्ध कथालेखक व भारतीय संस्कृती कोशकार पं. महादेवशास्त्री जोशी आणि गोवा मुक्तिसंग्रामातील रणरागिणी सुधाताई जोशी यांचे सुपुत्र आहेत. गोव्यातील प्रियोळ या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण पुण्यातच गेले. शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूतन मराठी विद्यालय, मराठी शाळा, नूतन मराठी विद्यालय, प्रशालेमधून बिगरी ते मॅट्रिक आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून १९६२मध्ये बी.ए. असे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय पदवीसाठी निवडले होते.

            बालपणापासून साहित्यिक वातावरणात वाढल्यामुळे त्यांना लेखनाचा छंद लागला. पदवी परीक्षेनंतर इतरत्र नोकरी न करता त्यांनी घरच्या प्रकाशन व्यवसायात लक्ष घातले. त्यांनी १९६० ते १९७५पर्यंत हा व्यवसाय केला. शास्त्रीबुवांनी १९६२मध्ये धायरीला तीन एकर जमीन घेतली. लेखनाचा व्याप सांभाळत शास्त्रीबुवा आणि सुधाताईंनी शेती करायला सुरुवात केली.

            त्यांनी १९७५पासून स्वत:ला शेतकरी या नात्याने शेतीशी जोडून घेतले. त्यांना शेतीची कामे करताना अनेक अडचणी येत होत्या. शेतीबाबत सर्वांगीण माहिती देणारे एकही पुस्तक उपलब्ध नसल्याची जाणीव त्यांना झाली. इंग्रजी पुस्तकातील माहितीचा सामान्य शेतकर्‍यांना काही उपयोग होत नाही. वराहमिहिर, शारंगधर, कश्यप आदी भारतीय पूर्वसुरींनीही आपल्या ग्रंथांतून शेतीविषयक बरीच माहिती दिली आहे. वृक्षायुर्वेदमधील माहितीही विस्मयजनक आहे. जमिनीतील पाणी कसे शोधायचे, पावसाचे आडाखे कसे बांधायचे याची तपशीलवार माहिती वराहमिहिराने ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात दिली आहे. ही ग्रंथसंपदा संस्कृत भाषेत असल्याने सामान्य शेतकरी या ज्ञानापासून वंचितच होता. ज्ञानाचा हा खजिना एकत्रितपणे मराठी आणि इतर सर्व भारतीय भाषांत आला; तर ते अतिशय उपयुक्त ठरेल. हे काम कुणी तरी करण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच ते का करू नये, असा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला. शास्त्रीबुवांनी हा विचार उचलून धरला. भारतीय संस्कृतिकोशाचे काम घरातच झाले असल्याने हे काम सोपे नसल्याची जाणीव सर्वांनाच होती. शास्त्रीबुवांनी ‘कृषिज्ञानकोश’ हे कोशाचे नाव नक्की केले. शब्दकोश म्हणजे डिक्शनरी आणि ज्ञानकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया. ‘ज्ञान’ या शब्दात विज्ञान तर येतेच, परंतु ज्या गोष्टी विज्ञानात बसत नाहीत; त्यांचाही समावेश ज्ञानात होऊ शकतो. म्हणूनच शेतीसारख्या बहुव्याप्त विषयाच्या कोशाला कृषिकोश किंवा कृषिविज्ञानकोश असे न म्हणता कृषिज्ञानकोश म्हणावे, असे शास्त्रीबुवांनी सांगितले.

            आपला कोशवाङ्मयाचा वारसा आपला सुपुत्र चालवणार याचा अर्थातच शास्त्रीबुवांना अभिमान वाटला. भारतीय संस्कृती कोशमंडळातर्फेच कृषिज्ञानकोश प्रकाशित करायचे ठरले. त्या वेळेस  डॉ. रा.ना. दांडेकर कोशमंडळाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीत कृषिज्ञानकोशाचा भारतीय संस्कृती कोश मंडळाने स्वीकार केला. कृषिज्ञानकोशाचे काम १९९०पासून सुरू झाले. शेती हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून त्याची व्याप्तीही अफाट आहे. तसेच त्याचा इतिहासही फार प्राचीन आहे. या इतिहासापासून विविध पिके, जमिनींचे प्रकार, शेतीची साधने, पिकांवरील कीड व रोग, हवामान इ. अनेक विषयांचा या कोशात अंतर्भाव आहे. पिकांबरोबरच औषधी वनस्पतींची माहितीही या कोशात आहे. वनस्पतींची माहिती देताना त्यांच्या शास्त्रीय नावांसकट भारतीय, तसेच इतरही भाषांतील नावे, नावाचा शास्त्रीय अर्थ, वनस्पतींचे वानसवर्णन, त्यांतील रासायनिक घटक, किडी, रोग, आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथिक उपयोग, लागवड तसेच कापणी-काढणीचे तंत्र, मिळणारे उत्पादन, त्यांचा आढळ अशा क्रमाने माहिती दिली आहे. प्राणी व पक्षी यांच्या बाबतीतही अशीच माहिती दिली. कोशाचे ५ खंड प्रकाशित झाले आहेत आणि सहावा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. या प्रकल्पाला त्यांनी ‘बृहन्निघंटू’ नाव दिले. जोशी यांचे ‘गोष्टीरूप शिवदर्शन’- भाग १ ते १०, ‘सरमा बहाद्दूर (मुलांसाठी)’, ‘आयुर्वेदीय औषधी वनस्पतीमाला’ - १४ पुष्पे - कडुनिंब, एरंड, आले व सुंठ, ओवा, आवळा, अडुळसा, उंबर, अतिविष, आघाडा, आंबा, कमळ, करंज, ऊस (गूळ व खडीसाखर) कांदा इ. साहित्य प्रसिद्ध झाले आहे.

            अशोक जोशी यांना पुणे मराठी ग्रंथालयाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार (२००४), महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीपाद जोशी शास्त्रीय साहित्य पुरस्कार (२००६)आदी पुरस्कार मिळालेले आहेत.

- डॉ. शुभलक्ष्मी भालचंद्र जोशी

जोशी, अशोक महादेव