Skip to main content
x

जोशी, प्रभाकर शंकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र ‘भीमायनम्’ या नावाने संस्कृत महाकाव्याच्या स्वरूपात रेखाटणारे प्रा. प्रभाकर शंकर जोशी एक ख्यातकीर्त संस्कृत पंडित आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होते.

प्र.शं. जोशी सरांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात १९२४ साली झाला. इचलकरंजी आणि हैदराबाद येथे त्यांनी संस्कृत आणि उर्दू भाषांचे अध्ययन केले. संस्कृत भाषेचे पारंपरिक पद्धतीने अध्ययन करीत त्यांनी काव्यतीर्थ आणि काव्यकोविद यांसारख्या पदवी-परीक्षा उत्कृष्ट गुणांनी पार केल्या. संस्कृत व्याकरण शिकत असता त्यांनी व्याकरण विशारद ही पदवीदेखील प्राप्त केली.

दुसरीकडे आधुनिक पद्धतीने देखील त्यांचे शिक्षण चालू होतेच. उच्च माध्यमिक परीक्षा सर्वोत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होऊन त्यांनी जगन्नाथ शंकरशेठ आणि अकबर नवीस या शिष्यवृत्त्या प्राप्त केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात संस्कृत शिक्षक म्हणून कराची येथे नोकरी करणारे जोशी सर भारतास स्वातंंत्र्य मिळाल्यानंतर पुण्यात स्थायिक झाले. या काळात त्यांनी बी.ए., बी.टी., एम.ए. इत्यादी पदव्या मिळवल्या आणि नूतन मराठी विद्यालय (नू.म.वि.), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड आणि फर्गसन महाविद्यालय, पुणे इत्यादी शाळा-महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रसायनी येथील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये देखील सुमारे १५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. त्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या अनेक भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांनी पुढे संस्कृत तज्ज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

व्याकरण आणि साहित्य हे जोशी यांचे विशेष आवडीचे विषय होत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर संस्कृत कथासाहित्याचा मराठी अनुवाद केला. विविध पाठ्यपुस्तकांची निर्मिती आणि संपादन त्यांनी केले आहे. ‘सुभाषितरत्नकलश’ या नावाने गोळा केलेला संस्कृत सुभाषितांचा संग्रह आणि योगवासिष्ठाचा इंग्रजी अनुवाद हे त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य होय. निवृत्तीनंतरही त्यांचे लेखनकार्य अव्याहतपणे सुरूच राहिले. सरांचे शरीर एकीकडे थकत होते, अंधत्वदेखील आले होते; परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही स्वस्थ न राहता त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र संस्कृत भाषेमध्ये शब्दबद्ध करण्याची आपली मनीषा ‘भीमायनम्’ हे १५७७ श्‍लोकांचे आणि २१ सर्गांचे महाकाव्य रचून पूर्ण केली.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘कै. ल.वि. आगाशे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’, ‘श्रीमती इंदिरा बेहेरे पुरस्कार’, तसेच ‘लोकमान्य टिळक संस्कृत पुरस्कार’,  ज्ञान प्रबोधिनीचा पुरस्कार  देऊन जोशी यांचा गौरव करण्यात आला होता. शेवटच्या क्षणापर्यंत संस्कृतचा ध्यास उराशी बाळगणार्‍या प्रा. प्र.शं. जोशी यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.

डॉ. अंबरीश खरे

जोशी, प्रभाकर शंकर