Skip to main content
x

जोशी, रामचंद्र भिकाजी

     हैद्राबादच्या एका सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या रामचंद्र भिकाजी जोशी यांचे बालपण व सुरुवातीचे शिक्षण तेथेच झाले. बाळबोध आणि संस्कृतसोबत उर्दूचे ‘कित्ते’ गिरवल्यामुळे या दोन्ही भाषांच्या प्रवृत्ती त्यांच्या व्यक्तित्वात एकजीव झाल्या. उर्दू व हिंदी साहित्याचे वाचन त्यांनी सतत चालू ठेवले. ‘उर्दूतील साहित्य व साहित्यिक यांच्याविषयी माहिती व लेख हवा असल्यास जोशींची हमखास आठवण येत असे व तेही मागणी पुरी करीत,’ असे गोविंदराव तळवलकरांनी ‘पुष्पांजली’ खंड २मध्ये नमूद करून ठेवले आहे. जोशींचे नंतरचे शिक्षण इंदूरला झाले. नोकरीनिमित्त काही वर्षे दिल्लीला आकाशवाणीवर त्यांनी वृत्तनिवेदकाचे काम केले. मराठी, उर्दू यांबरोबरच इंग्रजी भाषेच्या साहित्यावर त्यांचे अत्यंत प्रेम होते. प्रवासाची आवड असल्याने त्यांचे मन कायम ताजेतवाने राहिले.

‘लग्नाच्या वेळी भाऊंजवळ एक बी.ए.ची पदवी सोडली, तर दुसरे काही नव्हते. आईवडील नव्हते, घरदार नव्हते, आरोग्य नव्हते, नोकरी जेमतेमच होती. लेखक म्हणून नाव होते असेही नाही,’ असे सांगून त्यांची एकुलती एक कन्या नीलिमा भावे म्हणतात, ‘आम्ही कोकणस्थ होतो पण नावापुरतेच. म्हणजे घरात पूजा-अर्चा, देव, व्रतवैकल्ये... काहीच नव्हते. ताई (आई) तेव्हादेखील पाचवारी पातळे नेसायची, मंगळसूत्र घालीत नसे. भाऊंचा एकेरी उल्लेख करायची.’ जोशी कुटुंब दादरच्या पोर्तुगीज चर्चजवळच्या, विजेचे दिवेही नसलेल्या, भाज्यांचे वाफे असलेल्या, विहिरीवर मोटा चालणार्‍या भागातील वेलणकर चाळीतल्या शेवटच्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत २५ वर्षे राहिले. समुद्रावरचा वारा थेट घरात यायचा. त्या वार्‍याच्या मार्गात आरामखुर्चीत बसून जोशी यांचे लेखन झाले.

इंग्रजी विषयाचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. जोशींच्या साहित्यात प्रमाणबद्धता, शिष्टता, संयम, अभिरुची व अलिप्तता आढळते. त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध इंग्रजी व्यासंगात असावा. संस्कृत, उर्दू व इंग्रजी या तिन्ही भाषांचे संस्कार त्यांच्या लेखनावर झाले. ‘या तिन्ही भाषांच्या उत्तम संस्कारांतून एक विशिष्ट तोल जोशी यांच्या शैलीला, जीवनविषयक दृष्टीला आणि व्यक्तित्वालाही लाभला आहे,’ असे मत प्रा.रमेश तेंडुलकरांनी व्यक्त केले आहे.

जोशींच्या पत्नी सुधाबाईही साहित्याचा मनापासून आस्वाद घेणार्‍या व घरे बदलणार्‍या, आवडीने प्रवास करणार्‍या लेखिका होत्या. ‘सुधाबाईंची मनापासूनची इच्छा भाऊंनी भरपूर लिहावे, भरीव लिहावे, नाव मिळवावे आणि तो आनंद आपण उपभोगावा अशी असायची’ असे त्यांची कन्या म्हणते. सुधाबाईंच्या निधनानंतर (२९ सप्टेंबर १९९१) भाऊंना आलेल्या सांत्वनपर पत्रांतून ‘जुन्या पिढीतले एक आधुनिक विचारांचे सुसंस्कृत दांपत्य हीच ओळख आधोरेखित झाली.

साहित्याची आवड असली, तरी साहित्य संस्थांतील अधिकारपदे अडवून बसण्याची हौस जोशींना कधीच नव्हती. साहित्यविषयक मेळाव्यांत मात्र ते हमखास असत. ‘त्यांच्या प्रवासवर्णनात गैरवाजवी तपशील नाही, आणि उगाच आणलेली भावुकताही नाही. काका कालेलकरांची प्रवासवर्णने जोशींना आवडत.’ असे तळवलकरांनी नमूद करून म्हटले आहे, ‘मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण प्रवासवर्णनांत जोशी यांच्या प्रवासवर्णनांचा समावेश होतो. अनेक ठिकाणांच्या इतिहासाची जोड त्यांच्या प्रवासविषयक लेखांत असल्यामुळे वर्तमानाबरोबर भूतकाळाची माहिती होते आणि वर्तमानाचा संदर्भ समजतो... चिंतनशीलतेची जोड या प्रवासवर्णनाला मिळालेली होती.’ महाडच्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदावर असताना जोशींनी निष्ठेने काम केले. ग्रामीण भागातील महाविद्यालयांच्या प्रश्नांविषयी त्यांचा दृष्टिकोन सहानुभूतीचा होता. अभिजात, सुसंस्कृत आणि चोखंदळ सौंदर्यदृष्टी असलेल्या जोशींच्या बोलण्यात अगत्य व कळकळ, पसंतीत, नापसंतीत तशीच स्पष्टता असे. प्रा. रमेश तेंडुलकरांच्या अभिप्रायाप्रमाणे ‘एखाद्या व्यक्तीच्या सुखदुःखात रमण्यापेक्षा एखादे स्थळ, तेथील समाज, तेथील निसर्ग आणि संस्कृती यांनी माणसांच्या मनात भरलेले विविध रंग न्याहाळणार्‍या जोशींची लेखणी अधिक समरस होते... ‘अनोळखी वाटा’मध्ये आघाडीच्या उर्दू कथाकारांबरोबर उर्दू कथालेखिकांच्या साहित्याचाही परिचय करून दिला आहे.’

‘काचेचे कवच’ (१९४९) व ‘झम्मन’ (१९५७) हे त्यांचे कथासंग्रह; ‘वाताहत’ (१९४८) ही कादंबरी; ‘मजल दरमजल’ (१९६१), ‘वाटचाल’ (१९७०), ‘उथव’ (१९७८), ‘घाट शिळेवरी उभी’ (१९८४) ही त्यांची इतर पुस्तके प्रसिद्ध आहेत.

- वि. ग. जोशी

जोशी, रामचंद्र भिकाजी