कानिटकर, भालचंद्र रामचंद्र
भालचंद्र रामचंद्र कानिटकर यांचा जन्म लिंबागणेश जि. बीड येथे झाला. त्यांच्या आई सीताबाई गृहिणी होत्या. त्यांचे वडील शेतकरी होते. निजामी राजवटीतील जहागिरी संपल्यामुळे (स्वातंत्र्योत्तर) वडील रामचंद्र उदरनिर्वाहासाठी छोटेमोठे व्यवसाय करत. ते करत असताना स्वतंत्र व्यापार करण्याचे त्यांना सुप्त आकर्षण निर्माण झाले. भालचंद्र कानिटकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीड जिल्ह्यातील धोंडीपुरा शाळेत झाले, तर शालान्त शिक्षण त्यांनी शासकीय बहुविध प्रशाळा औरंगाबाद येथून घेतले. काही अपरिहार्य कारणामुळे त्यांचे शिक्षण खंडित झाल्यानंतर त्यांनी काही काळ लिंबागणेश येथील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. तसेच वडिलांना व्यवसायात मदत केली.
सन १९६१मध्ये पदवी शिक्षणासाठी कानिटकर यांनी कृषी महाविद्यालय अकोला येथे प्रवेश घेतला. महाविद्यालयात असताना ते क्रिकेटच्या संघात खेळत होते. तसेच त्यांनी महाविद्यालयात नाटकातूनही कामे केली. तसेच रुपायतन खासगी संस्थेमध्ये ही कामे केली. महाविद्यालयाच्या दुसर्या वर्षी त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवली व त्यात ते जिंकले. त्यांना बी.एस्सी.(कृषी)ची पदवी मिळाली. नागपूर कृषी महाविद्यालय येथून १९६७मध्ये एम.एस्सी. (कृषी) विकृतिशास्त्र विषयात प्रथम श्रेणी प्रथम क्रमांक मिळाला. परीक्षा संपताच त्यांना कृषी खात्यात तालुका बीजगुणन केंद्र हिंगोली, जि.परभणी येथे पर्यवेक्षक म्हणून नोकरी मिळाली. ती नाकारून त्यांनी आय.सी.आय या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये विक्री प्रतिनिधी म्हणून विदर्भ खानदेश विभागासाठी १९६८मध्ये नेमणूक स्वीकारली. कानिटकर यांची १९७१मध्ये पुणे येथे बदली होऊन त्यांना महाराष्ट्र व गोवा या प्रांतांची संपूर्ण विपणनाची जबाबदारी मिळाली. काही काळ उत्तर कर्नाटक हा भागही व्यवस्थापनात होता. ते नोकरीत असताना आय.एम.आर.डी.,पुणे येथे एम.डी.बी.ए.केले. कंपनीने त्यांना आय.आय.एम. अहमदाबाद येथे मॅनेजमेंट प्रोग्राम उन अॅग्रिकल्चर या प्रशिक्षणास पाठवले. १९९८मध्ये त्यांना 'इंपिरियल सायन्स कॉलेज लंडन' येथे पेस्टिसाइड अॅप्लिकेशन टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणास पाठवले . नोकरीत असताना त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ३१ मार्च २००१ रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी ५ वर्षे स्थानिक कंपनीमध्ये सल्लागार म्हणून काम केले.
सध्या कानिटकर पुणे येेथे राहत असून, तेथे ते विपणन व तांत्रिक सल्लागार म्हणून काम करत आहेत. तसेच सेंद्रिय शेती चळवळीशी सक्रियरीत्या जोडले आहेत. शिवतीर्थनगर येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघात कार्यरत आहेत.
- संपादित