कापसे, भगवान मारोत
समुद्रमार्गे आंबा निर्यात करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या भगवान मारोतराव कापसे यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे झाला. त्यांचे बालपण अत्यंत आडबाजूच्या व शिक्षण सुविधेपासून वंचित अशा गावी गेले. त्यामुळे पुढे शालेय शिक्षण मामाच्या गावी झाले. आधीपासून शेतीमध्ये नाव कमवायचे हीच इच्छा असल्यामुळे त्यांनी १९७४ साली बी.एस्सी.(कृषी) ही पदवी प्रथम श्रेणीतील विशेष मानांकनासह प्राप्त केली आणि १९७६मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी उद्यानविद्या हा विषय घेऊन प्रथम श्रेणीत विशेष मानांकनासह प्राप्त केली. त्यांनी १९९३मध्ये ‘आंबा काढणीनंतरचे तंत्रज्ञान’ या विषयावर पीएच.डी. मिळवली.
संशोधनात्मक कार्य करून शेती उत्पादित मालाला उत्तम बाजारपेठ मिळवून द्यायची, हे एकच लक्ष्य ठरवून त्यांनी १९७७ ते १९९६ या काळात म.कृ.वि.मध्ये कार्य केले आणि वरिष्ठ संशोधक साहाय्यक, साहाय्यक प्राध्यापक या पदांची धुरा सांभाळली. ते १९९६ ते २००० या काळात राष्ट्रीय काढणीपश्चात तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था येथे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी या पदावर असताना गटशेतीचे महत्त्व, त्यापासून मिळणारे फायदे, उत्तम बाजारपेठांमध्ये विक्री, एकत्रित कामामुळे होणारी खर्चामधील कपात, कीड नियंत्रण इ.बाबत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या. तसेच त्यांनी कांदा साठवणूक, केळीचे उत्पादन व काढणीपश्चात संस्कार आणि विक्री/निर्यातीचे व्यवस्थापन याबाबत खेडोपाडी जाऊन कार्यशाळा घेतल्या आणि समुद्रमार्गे आंबा निर्यातीचे तंत्रज्ञान विकसित करून परदेशी बाजारपेठा काबीज करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. पुढे त्यांनी २००१ ते २००५ या काळात मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर येथे अध्यापन आणि संशोधक म्हणून कार्य केले. नंतर ते २००५पासून प्रभारी अधिकारी फळ संशोधन केंद्र हिमायत बाग-औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.
कापसे यांनी मराठवाड्यामध्ये ‘निर्यातक्षम केसर आंबा’ लागवडीसाठी औरंगाबाद व जालना या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सातत्याने शिक्षण देऊन लागवड क्षेत्र वाढवले. त्यांनी जिरडगाव येथे गटशेतीच्या माध्यमातून १००० एकरांवर केसर आंबा लागवड, ७०० एकरांवर मोसंबी लागवड, २०० एकरांवर आवळा लागवड व २० एकरांवर चिक्कू लागवड करण्यात यश संपादन केले. त्यांनी अमेरिका व युरोप या देशांच्या बाजारपेठांमध्ये समुद्रमार्गे आंबा निर्यातीचे तंत्रज्ञान व कार्यप्रणाली निश्चित केली. तसेच त्यांनी डाळिंब व भेंडी आणि इतर भाजीपाला निर्यातीसाठीचे काढणीपश्चात तंत्रज्ञान, स्ट्रॉबेरी फळाचा टिकाऊपणा वाढवण्याचे, साठवणूक व विक्री व्यवस्थापन विकसित केले. कोयीद्वारे तयार झालेल्या झाडावरच कलम बांधण्याचे सुधारित तंत्रज्ञान विकसित केले.
डॉ.कापसे यांनी राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा व परिषदांमध्ये ४० संशोधनात्मक लेखांचे सादरीकरण केले. त्यांनी १९९६मध्ये परदेशी अभ्यासदौऱ्यांच्या निमित्ताने इस्राएलमध्ये ‘आंबा संशोधन परिषदे’मध्ये व्याख्यान दिले. त्यांनी २००६मध्ये सनसिटी-दक्षिण आफ्रिका येथे आंतरराष्ट्रीय आंबा परिसंवादामध्ये संशोधनात्मक लेखाचे वाचन केले. त्यांना २००६मध्ये दुबई येथे फळे व भाजीपाला आयातीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेषज्ञ म्हणून आमंत्रित केले होते. डॉ.कापसे यांचे ५२ संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत. सुमारे १५० लेख वृत्तपत्रे व कृषी मासिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे ‘आंबा निर्यात’ हे पुस्तक २००५मध्ये प्रकाशित झाले. डॉ.कापसे यांना १९७९ साली उत्कृष्ट संशोधनात्मक लेखासाठी ‘एन.एन. मोहन स्मृती पारितोषिक’ मिळाले; तसेच २००५मध्ये राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर यांच्यातर्फे देण्यात येणारा ग्रामीण विकासामधील कृषीतंत्रज्ञानाच्या प्रसारासाठीचा पुरस्कार प्राप्त झाला.