कदम, श्यामराव सखाराम
श्यामराव सखाराम कदम यांचा जन्म मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील तळणी येथे झाला. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी नसताना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. शिक्षणासाठी ते रोज लिंबगावाहून नांदेडला ये-जा करत. त्यांनी दहावीनंतरचे शिक्षण हैद्राबादला घेतले. एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वकिली सुरू केली. परंतु या व्यवसायात त्यांचे मन रमले नाही. तेव्हा ते समाजकारणाकडे आकर्षित झाले व त्यांनी ग्रामीण भागातील बहुजन समाजातील गरीब होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.
श्यामराव कदम यांनी निझाम सरकार विरुद्धच्या लढ्यात हिरिरीने भाग घेतला. ते १९५२ च्या आसपास पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून राजकारणात सक्रिय झाले. प्रारंभी त्यांनी शेतकी कामगार पक्षाकडून निवडणूक लढविली. परंतु झालेल्या पराभवाने खचून न जाता, त्यांनी जनसेवेचे अखंड व्रत स्वीकारले. १९५४ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हा त्यांनी शंकरराव चव्हाण यांच्यासोबत काम केले व समाजोपयोगी प्रकल्प उभे केले, शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. १९५८ मध्ये महाराष्ट्र शासनाने सहकार चळवळीत लोक प्रतिनिधीचा सहभाग घेण्याचे धोरण स्वीकारले. त्या वेळी श्यामराव कदम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यांनी बँकेला शिस्त लावली आणि बँकेच्या कारभारात पारदर्शकता आणली. परिणामी बँकेचा ‘आदर्श बँक’ म्हणून गौरव झाला.
कदम यांनी १९६० मध्ये नांदेड जिल्हा खरेदी-विक्री संघाची स्थापना केली. त्याचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. ते आय.एफ.सी.आय. संस्थेचेही सदस्य होते. त्यांनी सहकार क्षेत्रात अनेक उद्योग उभारले. तसेच सुतगिरण्या, स्पन पाईप, सहकारी साखर कारखाना, दुग्ध प्रकल्प, तालुका खरेदी विक्री संघ, पतपेढ्या, शैक्षणिक संस्था, विविध सहकारी संस्था, मंडळे स्थापन करून ग्रामीण भागाचा कायापालट केला. मराठवाडा खादी ग्रामोद्योग; मराठवाडा कुष्ठरोग निवारण केंद्र-नंदनवन; नेरली कुष्ठधाम; कलंबर सहकारी साखर कारखाना; ऑईल मिल-कोंडलवाडी; नांदेड जिल्हा फळे-भाजीपाला सेवा संघ; कलामंदिर जनता संघ; श्री जिजामाता धर्मशाळा; शारदा भुवन संस्थेअंतर्गत यशवंत महाविद्यालय; महात्मा फुले कन्याशाळा; यशवंत मुलांचे वसतिगृह; इंदिरा गांधी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण संस्था; गायन-वादन संस्था इत्यादी संस्थांचे ते संस्थापक होते. ते मराठवाडा कृषी विद्यापीठ-परभणी, पंजाबराव कृषी विद्यापीठ-अकोला, राहुरी कृषी विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आदीचे सदस्य होते. त्यांनी प्रवरा साखर कारखाना व शिखर बँकेचे संचालकपदही सांभाळले. शिखर बँकेचे ते दोन वेळा अध्यक्षही झाले.
कदम यांची १९६० मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत वर्णी लागली. तथापि त्यांनी १९६२ मध्ये पंचायत राज स्थापन होताच विधान परिषदेचा त्याग केला व ते नांदेड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले व सलग १० वर्षे अध्यक्ष राहिले. त्यांनी जिल्हा परिषदेस महाराष्ट्र शासनाचे ‘आदर्श जिल्हा परिषद’ म्हणून बक्षीस मिळवून दिले. त्यांनी मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला. त्यांचा हा कलंबर कारखाना एक आदर्श कारखाना म्हणून प्रसिद्धीस आला. केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1962 साली नांदेड येथे श्यामराव कदम यांना ‘सहकारमहर्षी’ हा किताब बहाल केला. सहकारासह इतर विविध क्षेत्रांतील त्यांच्या व्यापक कार्यामुळे २६ जानेवारी १९६७ रोजी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना ‘पद्मश्री’ हा पुरस्कार देण्यात आला. १९७६ साली शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सहकार, ऊर्जा व प्रसिद्धी विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. शेवटच्या क्षणापर्यंत श्यामराव कदम हे समाजकार्याशी निगडित होते.
- हंसराज वैद्य