कदम, वीरसेन आनंदराव
बाबा कदम यांचा जन्म अक्कलकोट येथे झाला. १९५२ मध्ये ते बी.ए झाले आणि १९५४ मध्ये पुणे विद्यापीठातून एल्एल.बी. झाले. १९५४ ते १९५८ या ४ वर्षांत त्यांनी फौजदारी कोर्टात वकिली केली. १९५९ पासून पोलीस प्रॉसिक्यूटर म्हणून ३१ वर्षे नोकरी केली.
वकिलीच्या व नोकरीच्या निमित्ताने आलेल्या अनुभवांतून ९१ कादंबर्या (सर्व सत्य घटनांवर आधारित) त्यांनी लिहिल्या . बहुतेक सर्व कादंबर्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून वाचकांचा उदंड प्रतिसादही कादंबर्यांना लाभला . शास्त्रीय संगीत ऐकणे, शिकार करणे आणि चित्रकला असे त्यांचे छंद होते . त्यांनी सुमारे ८०० उत्तम चित्रे काढली आहेत.
त्यांच्या काही गाजलेल्या कादंबर्यांत - ‘डोंगरची मैना’, ‘चौफेर’, ‘कॉकटेल सर्किट’, ‘सभा’, ‘बलिदान’, ‘स्टार विटनेस’, ‘जोहार’, ‘इस्टेट मॅनेजर’, ‘नजर कैद’, ‘निराधार’, ‘मानस कन्या’, ‘परमानंद’, ‘एक होती बेगम’, ‘बॉम्बे पोलीस’, ‘वाळवंटातील फूल’, ‘निष्पाप बळी’, ‘आमराई’, ‘मिनिस्टर’, ‘राजलक्ष्मी’, ‘बिनधास्त’, ‘निष्कलंक’, ‘ज्वालामुखी’ इत्यादींचा उल्लेख करावा लागेल.कदम यांनी वाचकांचे रंजन करणे हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांना गुन्हेगारी जगाचे जवळून दर्शन घडवले. वेगवान कथानक, वाचकांना खिळवून ठेवणारी शैली यांमुळे त्यांच्या कादंबर्या अत्यंत लोकप्रिय झाल्या.
आठ मराठी चित्रपटांचे पटकथा व संवादलेखन त्यांनी केले. ‘भालू’, ‘जोतिबाचा नवस’, ‘दगा’, ‘पाच नाजूक बोटं’, ‘देवाशपथ खरं सांगेन’, ‘प्रलय’, ‘उनाड मैना’, ‘सभा’ हे चित्रपट त्यांच्या कादंबर्यांवर आधारित आहेत. या व्यतिरिक्त ‘बूमरँग’ या कादंबरीवरून ‘कलंदर’ हे नाटक त्यांनी लिहिले. तेविसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामधे १९८५-१९८६ साली ‘देवाशपथ खरं सांगेन’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट कथेचे पारितोषिक त्यांना प्राप्त झाले.
करवीर भूषण पुरस्कार २०००, करवीर जीवन गौरव पुरस्कार २००३, पुण्याच्या पुलोत्सवात चित्रकर्मी पुरस्कार २००८, कोल्हापूरचा मृत्युंजय पुरस्कार २००५ हे त्यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार होत. औरंगाबाद येथील साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीला श्रोत्यांकडून त्यांना मन:पूर्वक प्रतिसाद मिळाला. या बहुप्रसव कादंबरीकाराला वाचकांचे उदंड प्रेम लाभले, तरी समीक्षकांनी मात्र त्यांच्या साहित्याची फारशी दखल घेतली नाही