Skip to main content
x

केतकर, गोदावरी वासुदेव

    ‘भारतीय नाट्यशास्त्र’ या मौलिक प्रबंधाच्या लेखिका गोदावरी वासुदेव केतकर यांचे शालेय व उच्च शिक्षण महर्षी कर्वे यांच्या हिंगणे येथील महिलाश्रमाच्या शाळेत व विद्यापीठात झाले.  ‘गृहीतागमा’ (बी.ए. सदृश) झाल्यावर या संस्थेशी निगडित असलेले संस्कृत पंडित ह.रा. दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर प्रबंध लिहून त्यांनी ‘प्रदेयागमा’ (एम.ए. सदृश) पदवी संपादली. सातारा कन्याशाळेत व कानपूरला एका शाळेत त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले. कानपूरला गेल्यानंतर थोड्या महिन्यांत ग्वाल्हेरच्या राजकन्येची शिक्षिका म्हणून गोदावरी केतकर यांची नेमणूक झाली. राजकन्येच्या विवाहानंतर अगदी थोड्याच दिवसांत ग्वाल्हेरच्या महाराणी कन्याशाळेच्या त्या प्रधान अध्यापिका झाल्या. त्या शाळेची गोदावरीबाईंनी १९५५ पर्यंत २१ वर्षे सेवा केली.

गोदावरीबाईंच्या संशोधनात्मक प्रबंधात नाट्यशास्त्रावरचा आदिग्रंथ भरतमुनी कृत नाट्यशास्त्र यातील महत्त्वाच्या सूत्रांचे विवरण झाले आहे. ‘भारतीय नाट्यशास्त्र’ या नावाने तो १९२८ साली त्यांच्या वडिलांनी छापून प्रकाशित केला. १९६३ साली ‘भरतमुनीचे नाट्यशास्त्र’ अशी त्याची दुसरी आवृत्ती निघाली. त्याला लिहिलेल्या प्रास्ताविकात मधल्या काळात नाट्यशास्त्राविषयी पुनर्विचार झाला, त्याचा जागरूकतेने आढावा घेतला आहे. ग्रंथाच्या अकरा प्रकरणांतून भरताच्या समग्र नाट्यविचाराची कल्पना देणारे विषय विस्ताराने चर्चिले आहेत. आवश्यक तेथे संस्कृत-मराठी नाटकांतील उदाहरणे दिली आहेत. स्वतंत्रपणे, विश्लेेषक दृष्टीने, तरीही सोप्या, सरळ भाषेत घेतलेला परामर्श म्हणून या ग्रंथाचे महत्त्व आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा हा पहिला मराठी अवतार आहे. या विषयावरचा एक उत्कृष्ट संदर्भग्रंथ म्हणून मराठी आणि संस्कृत भाषेच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे.

डॉ. गौरी माहुलीकर

केतकर, गोदावरी वासुदेव