Skip to main content
x

कलबुर्गी, मलेशाप्पा मडिवाळप्पा

डॉ . एम. एम. कलबुर्गी

     ‘‘विद्यार्थ्यांनी वेळेचा अपव्यव करू नये. एकदा गेलेली वेळ परत येत नाही, म्हणून आपल्या आवडीच्या विषयात निरंतर चिंतन मनन व संशोधन आणि लेखन करीत काळ सत्कारणी लावावा,’’ हे उद्गार आहेत प्रख्यात संशोधक डॉ. एम.एम. कलबुर्गी यांचे.

     महाराष्ट्रातील आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या कन्नड कोरीव लेखांचा सर्वांगीण परिचय करून देणारे म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. डॉ. कलबुर्गी यांना कोरीव लेखांमध्ये खूप आसक्ती आहे. पूर्वप्रसिद्ध अशा सुमारे २५,००० कोरीव लेखांचा अभ्यास करणार्‍या अपवादात्मक अभ्यासकांपैकी ते एक होत. अप्रकाशित ताम्र-शिलालेख वाचून प्रसिद्ध करणे, पूर्वप्रकाशित कोरीव लेखांचे पाठ परिष्करण करणे, त्यात आलेल्या कठीण शब्दांची अर्थनिश्चिती करणे, अपरिचित शब्दांचे अर्थ उलगडून दाखवणे आणि सखोल अभ्यास करून कर्नाटक-महाराष्ट्राच्या संस्कृतीवर नवा प्रकाश टाकणे, याचबरोबर स्थळनाम निश्चिती व स्थळ निश्चिती आदी बाबींवर भर देऊन त्यांनी इतिहास ज्ञानात वाढ केली आहे.

     डॉ. कलबुर्गी यांचे संशोधकीय व्यक्तिमत्त्व हे बहुमुखी आहे. कोरीव लेखांचा अभ्यास व संशोधन त्यांना प्रिय असले तरी ते हिमनगाचे एक टोक आहे, असे त्यांच्या एकंदर संशोधकीय कारकिर्दीकडे पाहिले असता दिसून येते. साहित्य, संस्कृती, लोकसाहित्य, इतिहास, कोरीव लेख, हस्तलिखित शास्त्र, ग्रंथ संपादन, वचन-वाङ्मय, छंद, व्याकरण इ. क्षेत्रांत त्यांनी अपार संशोधन कार्य करून ठेवले आहे. ज्याप्रमाणे थोर कवीला ‘महाकवी’ म्हणतात, तद्वतच थोर संशोधकास ‘समग्र संशोधक’ म्हणतात. त्या दृष्टीने डॉ. कलबुर्गी हे समग्र संशोधक ठरतात.

    डॉ. एम.एम. कलबुर्गी म्हणजेच मल्लेशप्पा मडिवाळप्पा कलबुर्गी यांचा जन्म त्यांच्या आजोळी,  यरगल्ल, ता. सिंदगी, जि. विजापूर येथे झाला. त्यांचे मूळ गाव गुब्बेवाड, ता. सिंदगी, जि. विजापूर होय. मडिवाळप्पा व गंगम्मा हे त्यांचे जन्मदाते होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण यरगल्ल येथे, तर माध्यमिक शिक्षण सिंदगी येथे झाले. त्यांनी इ.स. १९६० मध्ये विजय महाविद्यालय, विजापूर येथून बी.ए.ची पदवी घेतली. पुढे त्यांनी कर्नाटक विश्वविद्यालयातून इ.स. १९६२ मध्ये त्यांचे पदव्युत्तर एम.ए. पूर्ण केले. कन्नड व कला विभागात प्रथम आल्याने त्यांना जय चामराज वडेयर पारितोषिक प्राप्त झाले. त्यांच्या शैक्षणिक जीवनावर डॉ. आर.सी. हिरेमठांचा दाट प्रभाव होता.

    एम.ए. झाल्यावर धारवाड येथील कर्नाटक महाविद्यालयात ते अध्यापकाची सेवा करू लागले. दरम्यान त्यांनी कर्नाटक विश्वविद्यालयातून इ.स. १९६८ मध्ये पीएच.डी. मिळवली. त्यांचा विषय होता, ‘कविराजमार्ग परिसराचे कन्नड साहित्य’. पुढे हा प्रबंध कर्नाटक विश्वविद्यालयानेच प्रकाशित केला.

    इ.स. १९६६ ते १९७१ दरम्यान कर्नाटक विश्वविद्यालयात कन्नड अध्ययन पीठात अध्यापक, इ.स. १९७१ ते १९८० दरम्यान प्रपाठक , इ.स. १९८०मध्ये बसवेश्वरपीठाचे प्रोफेसर, इ.स. १९८८ मध्ये शिक्षणोत्तर कार्यासाठी पदत्याग, मार्च १९९८मध्ये कन्नड अध्ययन पीठाचे प्रोफेसर आणि त्याच वर्षी हंपी येथील कन्नड विश्वविद्यालयाचे कुलपती म्हणून नियुक्ती व तीन वर्षांनंतर सेवामुक्ती, असा एकंदर डॉ. कलबुर्गी यांचा अध्यापनाचा सेवाकाळ आहे.

    सेवाकाळामध्येच त्यांनी अनेक संघ-संस्थांच्या व मठादींच्या कार्यांमध्येही सक्रिय भाग घेतला. एके काळी प्रसिद्ध असलेला धारवाडचा विद्यावर्धक संघ केवळ नामशेष झालेला असताना, त्यास पुन्हा उभारी देऊन त्यांनी त्याचे पुनरुज्जीवन केले व त्यास सक्रिय केले. प्रकाशने सुरू करण्यास चालनाही दिली.

    मठ-मंदिरे केवळ मतीय प्रसारासाठीच असावेत असे धोरण कायम ठेवताना, त्यांचे सांस्कृतिक संस्थेत रूपांतर व्हावे म्हणून मठाधीशांची मने वळवून त्यांच्याकडून त्यांनी भरीव कामे करून घेतली. त्यानुसार बेळगाव येथील श्री नागनूर रुद्राक्षी मठाच्या आश्रयाने ‘वीरशैव अध्ययन अकादमी’द्वारे मान्यताप्राप्त पीएच.डी. प्रबंध प्रकाशित करून आधुनिक साहित्याला विशेष देणगी दिली आहे. गदग येथील तोंटदार्य मठामार्फत वीरशैव अध्ययन संस्था अस्तित्वात आणून अनेक ग्रंथमालांची सुरुवात करून शेकडो ग्रंथ प्रसिद्ध करण्यास ते कारणीभूत ठरले. असे आणखीनही काही मठांमधील उपक्रम सांगता येतील.

    हंपी येथील कन्नड विश्वविद्यालयाचे कुलपती असताना त्यांनी नव्याने अनेक विभाग उभे केले. त्यांपैकी विश्व कन्नड विभाग, द्रविड संस्कृती विभाग, महिला अध्ययन विभाग हे होत.

    कोरीव लेखांवर जशी त्यांची प्रीती आहे, त्याचप्रमाणे हस्तलिखितांचा शोधसंग्रह व प्रकाशनकार्यातही त्यांची कामगिरी भरीव आहे. कर्नाटक विश्वविद्यालयातील कन्नड अध्ययन पीठातील कन्नड हस्तलिखितांचा संग्रह डॉ. कलबुर्गी यांच्यामुळे वृद्धिंगत झाला आहे. त्यांतील महत्त्वाच्या व निवडक ग्रंथांचे त्यांनी संपादन व प्रकाशन केले. समग्र हस्तलिखितांची सूचीही प्रसिद्ध केली. केवळ याच कामासाठी म्हणजे हस्तलिखितांच्या शोधासाठी ऑक्स्फर्ड, केंब्रिज व लंडन विश्वविद्यालयांना भेटी दिल्या.

    बसवेश्वर पीठामध्ये डिप्लोमा इन बसव स्टडीज, वीरशैव ग्रंथालय, विशेषोपन्यासमाले, प्रचारोपन्यासमाले या चार विभागांत क्रमबद्धतेने ग्रंथ प्रकाशनांस चालना दिली.

    डॉ. कलबुर्गी यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा आणखी एक विषय म्हणजे लोकसाहित्य, जानपद साहित्य. कर्नाटक विश्वविद्यालयाच्या जानपद संमेलनाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. ‘जानपद साहित्य दर्शन’ या ग्रंथमालेचे ते संस्थापक होते. हंपी कन्नड विश्वविद्यालयामध्ये देशी संमेलनाची स्थापना करून त्यांनी जानपद वस्तुसंग्रहालयाची सुरुवात केली. कुलपतींच्या तीन वर्षांच्या कालावधीत डॉ. कलबुर्गी यांनी ३०० ग्रंथांच्या प्रकाशनांची पूर्वव्यवस्थाही करून ठेवली.

    कोरीव लेखांच्या संशोधनाने आणि अभ्यासाने डॉ. कलबुर्गी यांनी काही महत्त्वपूर्ण बाबी उजेडात आणलेल्या आहेत. कुर्कियाळ (आंध्र प्रदेश) येथे सापडलेल्या कन्नड महाकवी पंप यांचा बंधू जीनवल्लभ यांच्या शिलालेखाचे पुनर्वाचन करून अर्थबदल सुचवला व तो विद्वानांत मान्य झाला. कोरीव लेखांच्या आधारे त्यांनी नागचंद्र यांनी निर्माण केलेल्या मल्लिनाथ बसदीचा शोध घेऊन त्याची स्थलनिश्चिती केली. ही बसदी म्हणजे विजापूर येथील करिमुद्दिन मशीद हे त्यांनी सिद्ध केले.

     कोरीव लेखांमधून अपरिचित व व्यवहारातून लुप्त झालेले अनेक शब्द येतात. त्यांची अर्थनिश्चिती करून लेखाचा योग्य व शुद्ध अर्थ लावणे महाकठीण काम असते. कलबुर्गी यांनी अशा अनेक कठीण शब्दांचे योग्य अर्थ लावून कोरीव लेखांना बोलके केले आहे.

    डॉ. कलबुर्गी यांची ग्रंथसंपदा विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे. ‘मार्ग’ या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक लेखांचे सहा खंड प्रकाशित झाले आहेत. त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथांची संख्या सुमारे ४५ आहे : चार शास्त्रीय ग्रंथ, दोन लोकसाहित्य, एक कवितासंग्रह, एक नाटक, कर्नाटक सरकारच्या ‘समग्र वचन साहित्य’चे ते प्रमुख संपादक होते. त्याचे पंधरा खंड प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या नावावर उणे-अधिक एकंदर सुमारे ७०-८० ग्रंथ आहेत.

    डॉ. कलबुर्गी हे अनेक सन्मानांनी व गौरवांनी आणि पुरस्कारांनी नावाजले गेले आहेत. यू.जी.सी.कडून ते राष्ट्रीय प्राध्यापक म्हणनू सन्मानित झाले. त्यांनी बर्‍याच संस्थांचे व परिषदांचे अध्यक्षपद भूषवले. त्यांपैकी काही असे आहेत : ऑल इंडिया प्लेस नेम्स सोसायटी, तंजावर अधिवेशन (१९९७), अखिल भारत शरण साहित्य संमेलन, धर्मस्थळ साहित्य संमेलन, कर्नाटक इतिहास अकादमी इ.

   डॉ. कलबुर्गी यांच्यावर पुरस्कारांचा व सन्मानांचा अगदी वर्षावच झाला आहे. त्यांच्या सहा पुस्तकांना राज्य साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. एकास विशेष सन्मान मिळाला आहे. राज्योत्सव प्रशस्ती, राज्यजानपद व यक्षगान अकादमी विशेष प्रशस्ती, पंप प्रशस्ती, विश्वमानव प्रशस्ती, वर्धमान प्रशस्ती, केंद्र साहित्य अकादमी प्रशस्ती, नृपतुंग प्रशस्ती इत्यादी अनेक सन्मान व प्रशस्ती पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

  ‘संशोधन म्हणजे स्वल्पविराम-अर्धविरामाकडून पूर्णविरामाकडे प्रवास करणारे कार्य होय आणि क्रमही होय,’ असे ‘कन्नड संशोधनशास्त्र’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. कलबुर्गी म्हणतात.

आनंद नागप्पा कुंभार

कलबुर्गी, मलेशाप्पा मडिवाळप्पा