खेडेकर, सचिन श्रीकांत
मराठी रंगभूमीच्या तालमीतून तयार झालेल्या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला प्रगल्भतेच्या वळणावर आणून सोडले. मध्यमवयीन, घरंदाज पुरुषाला शोभेल असा चेहरा, विरळ होत जाणारे केस, कपाळावरचा लक्षात येण्याजोगा तीळ आणि चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य, या रूपात ‘सचिन खेडेकर’ यांनी साकारलेल्या मराठी चित्रपटातल्या मध्यमवयीन पुरुषांच्या सर्वच भूमिका यशस्वी ठरल्या.
मुंबईतल्या विलेपार्ले येथे सचिन श्रीकांत खेडेकर यांचा जन्म झाला. या जन्मभूमीनेच त्यांना अभिनय क्षेत्राची वाट दाखवली. सांस्कृतिकदृष्ट्या सजग असलेल्या या परिसरात खेडेकर वाढले ते साहित्य, कला, नाटक, संगीत यांचे बाळकडू घेऊनच.
विलेपार्लेमधील वेगवेगळ्या सेवाभावी संस्था, तसेच लोकमान्य सेवा संघाच्या वतीने होणाऱ्या नाट्यप्रयोगात खेडेकर प्रत्यक्ष सहभागी होऊ लागले. त्यांचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालय येथे झाले. त्यांनी थदुमल शहानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून पर्यावरण अभियांत्रिकीची पदविका संपादन केली. खेडेकरांना नाट्य अथवा चित्रपटसृष्टीत येण्यासाठी कोणतीच कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती.
सचिन खेडेकर पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले व सचिन व त्यांचा लहान भाऊ अशा दोन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आई मंदा खेडेकर यांच्यावर येऊन पडली. खेडेकर यांच्या आई ‘इंडियन एअरलाईन्स’मध्ये नोकरी करत होत्या. अभिनयासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात खेडेकर त्यांच्या आईने दिलेल्या पाठिंब्यामुळेच उभे राहू शकले.
एका विद्यार्थी शिबिरात ५ नोव्हेंबर या ‘रंगभूमी दिनाच्या’ निमित्ताने खेडेकरांनी ‘एकच प्याला’ या नाटकातील ‘रामलाल’ या पात्राची भूमिका साकारली. हा त्यांचा पहिला नाट्यप्रवेश होता आणि या भूमिकेपासून त्यांचा अभिनयक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. या प्रवासात त्यांचे गुरू ‘विनय आपटे’ यांनी खेडेकरांना वेळोवेळी साथ दिली. महाविद्यालयीन काळात त्यांचा अभिनयक्षेत्रातील प्रवास जोमाने सुरू झाला. विनय आपटे, सई परांजपे, वामन केंद्रे, महेश मांजरेकर अशा गुरुस्थानी असलेल्या दिग्गजांबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली.
‘अफलातून’ या विनय आपटे व विक्रम भागवत दिग्दर्शित नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवर आपला पहिला ठसा उमटवला. त्यानंतर ‘दुसरा सामना’, ‘मी राष्ट्रपती’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘आपसातल्या गोष्टी’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मौन रंग’ अशा मराठी नाटकांतून त्यांनी भूमिका साकारल्या. मराठी रंगभूमीसोबतच त्यांनी हिंदी व गुजराती रंगभूमीवरही तितक्याच सहजपणे काम केले. १९९७ मधील चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘डॉक्टर आप भी’ व १९९५ मधील निखिलेश शर्मा दिग्दर्शित ‘श्याम रंग’ ही त्यांची नाटके विशेष गाजली.
सचिन खेडेकरांनी सर्वप्रथम जनसामान्यांच्या मनात प्रवेश मिळवला तो १९८९ साली दूरदर्शनवर आलेल्या विनय आपटे दिग्दर्शित ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’ या मालिकेद्वारे. मराठी मालिकांप्रमाणेच ‘इम्तेहान’ आणि ‘सैलाब’, ‘थोडा है थोडे की जरुरत है’, ‘टीचर’ या त्यांच्या हिंदी मालिकाही विशेष लोकप्रिय ठरल्या. रवी राय हे ‘इम्तेहान’ या हिंदी मालिकेचे दिग्दर्शक खेडेकरांचे दूरदर्शन मालिका क्षेत्रातील गुरू ठरले. रंगभूमी, दूरचित्रवाणीचा छोटा पडदा व चित्रपटांच्या मोठ्या पडद्यावरही ते सारख्याच मोकळेपणाने व सहजतेने वावरले. विशेषत: दूरचित्रवाणीवरील त्यांचा अभिनय त्यांच्या उत्तम माध्यमसाक्षरतेची साक्ष देतो. म्हणूनच वेगवेगळ्या हिंदी व मराठी मालिकांद्वारे खेडेकरांचे मराठी प्रेक्षकांच्या मनातील स्थान अधिक पक्के झाले.
१९८८ मध्ये पद्मनाभ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘विधिलिखित’ या चित्रपटाद्वारे खेडेकरांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अस्तित्व’ (२०००), ‘चिमणी पाखरे’ (२००१), ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ (२००९), ‘शिक्षणाच्या आयचा घो’ (२०१०), ‘ताऱ्यांचे बेट’ (२०११), ‘लालबाग परळ’ (२०१०), ‘काकस्पर्श’ (२०१२), 'फक्त लढ म्हण' हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट. यांपैकी ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यातील ‘दिनकरराव’ या सामान्य मराठी माणसाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या या भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ला २०१० चा ‘मिफ्ता’ पुरस्कार मिळाला. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महेश मांजरेकर’ दिग्दर्शित ‘काकस्पर्श’ या चित्रपटातील खेडेकरांची ‘हरिभाऊ’ ही भूमिका विशेष लक्षात राहण्याजोगी आहे. परंपरा, प्रेम आणि सुधारक या तीन पातळ्यांवरून जाणारी ही भूमिका खेडेकरांनी सक्षमपणे साकारली.
मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या अनेक लहानमोठ्या साहाय्यकारी भूमिकांनी हिंदी चित्रपटसृष्टीलाही त्यांची दखल घेणे भाग पाडले. १९९७ मधील हसन मेहता यांनी दिग्दर्शित केलेला ‘जयते’, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पिताह’, संजय झा दिग्दर्शित ‘प्राण जाये पर शान ना जाये’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. ‘गुरू’, ‘कालचक‘, ‘यू मी और हम’, ‘सिंघम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या.
सचिन खेडेकरांचा अभिनय केवळ मराठी व हिंदी पुरताच मर्यादित राहिला नाही, तर तमिळ, मल्याळम, गुजराती, इंग्रजी अशा विविध भाषांतील चित्रपटांत पाहायला मिळतो. तमिळमधील ‘दैवा थिरूमंगल’, मल्याळममधील ‘पोलिस’, गुजरातीतील ‘पैसो मारो परमेश्वर’ व तसेच इंग्रजीतील ‘ए पॉकेटफुल ऑफ ड्रीम’ अशा त्यांच्या इतर भाषेतील चित्रपटांची नावे सांगता येतील. ‘क्रिश ३’ या हिंदी व ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या मराठी चित्रपटातही ते दिसले, तर ‘कोकणस्थ’मधील त्यांची भूमिकाही लक्षणीय ठरली.
‘नट’ हे चित्रपटाचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे माध्यम असते. नटाला दिग्दर्शकाच्या मनातील कल्पनांना पडद्यावर अभिनित करायचे असते. या ‘नटा’बद्दलच्या संकल्पना सुस्पष्ट असणारे सचिन खेडेकर हे एक जाणते कलाकार तर आहेतच, त्याचबरोबर सर्वच माध्यमांना सहजपणे आत्मसात करणारे ‘माध्यममित्र’ही आहेत.