Skip to main content
x

महाजन, नीलेश शांताराम

        रंगाबाद जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यातील उडणगाव येथे एका सुशिक्षित व सुसंस्कृत घराण्यात नीलेश शांताराम महाजन यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण औरंगाबाद व नांदेड येथे झाले. त्यांनी १९९६मध्ये नांदेड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स या विषयात बी.ई. पदवी घेतली. काही वर्षे त्यांनी संगणक क्षेत्रात संगणक अभियंता म्हणून काम केले, परंतु तेथे त्यांचे मन रमले नाही, त्यापेक्षा घरची शेती त्यांना अधिक अर्थपूर्ण व उत्पादक वाटली. शेतीला आवश्यक असणाऱ्या जास्तीत जास्त वस्तू या शेतीतच निर्माण करायच्या, सरकारी योजना व कर्जपुरवठा स्वस्तात मिळतो आहे म्हणून तो न घेता त्याची उत्पादकता विचारात घेऊनच त्या योजनांचा फायदा घ्यावयाचा, अल्प काळात अधिक उत्पन्न मिळवायच्या नादात भांडवल वाढवून अधिक कर्ज घ्यावयाचे नाही, हा विचार करून महाजन यांनी पिकांची निवड केली. त्यांनी वार्षिक उत्पादन खर्च कमी यावा, उत्पन्न दीर्घकाळ मिळत राहावे अशा रीतीने मशागत, पाणीव्यवस्था व पीक योजना आखल्या. त्यांची जमीन टेकडीच्या पायथ्याशी असल्यामुळे पावसाळ्यात ओढे व नाल्यांना जोरात पाणी येते हे लक्षात घेऊन महाजन यांनी पायथ्याशी शेततळी बांधली. त्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध झाले व आसपासच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. खात्रीचे उत्पन्न मिळण्यासाठी त्यांनी फळबागा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले. विक्रीसाठी त्यांना औरंगाबाद व जळगाव या बाजारपेठा उपलब्ध झाल्या. त्यांनी टप्प्याटप्प्याने १० हजार केशर आंब्याची लागवड घनपद्धतीने केलेली आहे. ते मुख्यत: सेंद्रिय खताचाच वापर करतात. त्यामुळे फळांचे आयुर्मान व स्वाद दीर्घकाळ टिकतो, असे त्यांचे मत आहे. त्यांनी सर्व फळपिकांमध्ये झाडांना पहिला बहर येईपर्यंत ऊस व कापूस ही आंतरपिके घेतली. ते सर्व पिकांसाठी सेंद्रिय खते व कीटकनाशके यांचा वापर करतात. शेतीतून सुशिक्षित माणूस बाहेर पडत आहे असा आजपर्यंतचा अनुभव आहे. नीलेश महाजन यांच्या रूपाने तरुण व सुशिक्षित वर्ग परत शेतीकडे वळत असल्याचे दिसते.

 - डॉ. निळकंठ गंगाधर बापट

महाजन, नीलेश शांताराम