Skip to main content
x

मंत्री, आशा मदन

          शा मदन मंत्री म्हणजे पूर्वाश्रमीच्या आशा दत्तात्रेय परळकर यांचा जन्म मुंबई येथील परळ येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण परळ येथेच झाले. त्यांनी १९६३मध्ये मुंबई येथील विद्यापीठातून पशुवैद्यकशास्त्राची पदवी प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने मिळवली. यानंतर १९६८मध्ये विकृतिशास्त्र आणि प्राणि-शरीरक्रियाविज्ञान व जीव-रसायनशास्त्र हे विषय घेऊन एम.व्ही.एस्सी. पदवीसुद्धा प्रथम वर्गात प्रथम येऊन प्राप्त केली.

          आशा परळकर या प्रथमतः मुंबई येथील पशुवैद्यक महाविद्यालय बाह्यरुग्ण विभागात कार्यरत होत्या. त्यांनी स्टडीज ऑन द लेव्हल्स ऑफ ल्युटेनायझिंग हार्मोन इन डोमेस्टिक फाऊल या विषयावर संशोधन करून मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी १९७९मध्ये प्राप्त केली. पशुवैद्यकशास्त्रातील ही पदवी संपादन करणार्‍याही आशा मंत्री पहिल्याच महाराष्ट्रीय महिला ठरल्या. दिल्ली येथील भा.कृ.अ.प.तर्फे १९७६-७९ या काळात कत्तलखान्यातील जनावरांच्या शरीरातील टाकाऊ पदार्थांची उपयुक्तता (प्रोजेक्ट ऑन युटिलायझेशन ऑफ स्लॉटर हाऊस वेस्ट) हा प्रकल्प चालू होता. या योजनेच्या मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातील केंद्रात प्रमुख संशोधक म्हणून काम करत असताना त्यांनी देवनार कत्तलखान्यात मारल्या जाणाऱ्या जनावरांच्या शरीरातील टाकाऊ भागांचा उपयोग करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू केले. या संशोधनासाठी ‘इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रीसर्च’ या संस्थेने अनुदान दिले होते. त्यासाठी देवनार कत्तलखान्यातून म्हशींचे फुफ्फुस आणि स्वादुपिंड हे दोन भाग आणावे लागत. त्यावर क्रिया-प्रक्रिया करून भाभा अणुशक्ती केंद्राकडे पाठवले जात असत. म्हशीच्या फुफ्फुसापासून हेपॅरिन हे औषध तयार करण्याचे प्रयत्न चालू होते. या औषधामुळे माणसाच्या रक्तात गुठळ्या होत नाहीत. म्हशीच्या स्वादुपिंडापासून बनवले जाणारे इन्सुलिन हे मधुमेहाच्या रोग्यांना अत्यावश्यक असते. ही दोन्ही औषधे परदेशातून मागवली जात. आशा मंत्री यांच्या तीन वर्षांच्या अविरत संशोधनानंतर ही दोन्ही औषधे सिद्ध होऊन ती माणसांवर उपचार करण्याजोगी असतात, असा निष्कर्ष भाभा अणुशक्ती केंद्राने आपल्या अहवालात दिला. (इतर देशांमध्ये ही औषधे तयार करण्यासाठी शेळ्या, मेंढ्या, डुकरे व गाई यांच्या ग्रंथींचा वापर केला जातो.) ही औषधे भारतास मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागत होती, परंतु आशा मंत्री यांनी केलेल्या संशोधनामुळे ही आयात कमी झाली. या संशोधनाबद्दल भा.कृ.अ.प.,नवी दिल्ली या संस्थेतर्फे १८ एप्रिल १९८१रोजी मंत्री यांना सुवर्णपदक देऊन गौरवले. बा.सा.को.कृ.वि.च्या पशुवैद्यक संस्थेतर्फे त्यांना ३० डिसेंबर १९८९मध्ये उत्तम पशुवैद्यकीय संशोधक पुरस्कार दिला.

          - डॉ. व्ही. एल. देवपूरकर

मंत्री, आशा मदन