Skip to main content
x

मुजुमदार, गंगाधर नारायण

मुजुमदार, आबासाहेब

संगीताचे जाणकार रसिक म्हणून महाराष्ट्राच्या सांगीतिक जीवनात भर घालणारे सरदार आबासाहेब तथा गंगाधर नारायण मुजुमदार हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. मुजुमदार घराणे हे शहाजीराजे भोसल्यांच्या काळापासून पुणे-सुपे प्रांतातील जहागीरदार होते. गंगाधर मुजुमदारांचा जन्म भावनगर येथे झाला व त्यांचे वडील पांडुरंग नारायण प्रभुणे हे भावनगर संस्थानात मुलकी अधिकारी होते. वयाच्या सहाव्या वर्षी गंगाधरला प्रभुण्यांकडून नारायण मुजुमदारांच्या घराण्यात दत्तक दिले गेले. ते १९०४ साली मॅट्रिक झाल्यावर काही काळ डेक्कन महाविद्यालयामध्येही शिकले, मात्र पुढे घराण्यातील जबाबदारीमुळे त्यांनी महाविद्यालय सोडले.

त्यांचे एक मामा काशिनाथपंत पोहरे हे गायक व बीनकार होते, तर दुसरे मामा बळवंतराव पोहरे हे कोल्हापूरला दरबार गायक होते. त्यांचे दत्तक घरातील मामा सरदार चंद्रचूड हेही शौक म्हणून सतार व गायन शिकलेले होते. या मामांकडून त्यांना संगीताचे बाळकडू मिळाले. सतार या वाद्याची त्यांना विशेष रुची होती व जुन्या काळातील बीनकार अण्णासाहेब घारपुरे व अन्यही सतारवादकांची सुमारे चौदा पुस्तके त्यांनी अभ्यासली, रहिमत खाँ सतारिये यांचे वादन त्यांनी जवळून पाहिले आणि ते सतार वाजवू लागले.

महाविद्यालयीन वयात त्यांनी केलेल्या संस्कृत कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. संस्कृत, फारसी, इंग्रजी अशा अनेक भाषांचा व्यासंग असणारे आबासाहेब मुजुमदार एक इतिहास संशोधक म्हणूनही नावाजले होते. भारत इतिहास संशोधक मंडळात ते सक्रिय होते व त्यांचे इतिहास विषयक शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते. व्यवसायाने कायदेतज्ज्ञ असलेल्या आबासाहेबांना ब्रिटीश सरकारने १९३५ साली ‘सी.आय.ई.’ हा किताब दिला व ‘पहिल्या दर्जाचे सरदार’ असा किताबही त्यांना दिला होता. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अनेक राजकारणी व्यक्तींशीही त्यांचे सलोख्याचे संबंध होते. मुळातील सरदार घराण्यातील श्रीमंती व उदारता त्यांच्याकडे पुरेपूर होती व या सार्‍याचा विनियोग त्यांनी संस्कृती व कलेच्या विकासासाठी आजन्म केला. त्यांनी भरीव असे संस्थात्मक कार्य पुष्कळ केले.

सार्वजनिक कार्यामुळे कायदेमंडळ, बँका,  विमाकंपन्या, देवस्थाने, व्यायाममंदिरे, वैद्यकीय, शैक्षणिक, शेतकी, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांतील सुमारे १८७ संस्थांशी ते अध्यक्ष, चिटणीस, विश्वस्त, मार्गदर्शक इ. नात्यांनी संबंधित होते. त्यांच्या प्रत्यक्ष कार्याचा, सल्ल्यांचा उपयोग अनेक संस्थांना झाला. बलोपासक व उत्तम टेनिसपटू असणार्‍या आबासाहेब मुजुमदारांनी सूर्यनमस्कार, कुस्ती व भारतीय व्यायाम पद्धतीचा नेहमी गौरव केला. महाराष्ट्र व्यायाम परिषदेच्या १९२७ सालच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. पुणे भारत गायन समाज, भरत नाट्य संशोधन मंदिर, गांधर्व महाविद्यालय अशा संगीत व नाट्यविषयातील संस्थांचे ते अध्यक्ष, मार्गदर्शक पदाधिकारी म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. एस.एस.सी. बोर्ड, पुणे विद्यापीठ अशा शैक्षणिक संस्थांच्या शिक्षण मंडळांवरही ते सल्लागार होते. सोलापूरच्या संगीत संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आकाशवाणीच्या चाचणी मंडळाचे ते अनेक वर्षे सभासद होते.

ब्रिटीश काळात भारतीय संगीतकलेचे स्वरूप बदलत असताना आबासाहेबांसारख्या रसिक श्रीमंतांनी अनेक कलाकारांना उदार आश्रय, आर्थिक साहाय्य व कलात्मक सहकार्य देऊन फार मोठे कार्य केले. त्यामुळे या कलेचे जतनीकरण व संवर्धन झाले. पुण्यातील कसबा पेठेतील मुजुमदार वाड्यातील मैफलींचा दर्जा काही वेगळा असे व यांत कलाकार आपले उत्तमातले उत्तम आविष्कार करत. गणेशोत्सवात, तसेच अन्यही निमित्तांनी मुजुमदार वाड्यातील गणेशमहालात कित्येक कलाकार हजेरी लावत. यांत बखलेबुवा, वझेबुवा, सवाई गंधर्व, मास्तर कृष्णराव, बालगंधर्व, विनायकबुवा पटवर्धन, मा. दीनानाथ, हिराबाई व सुरेशबाबू असे कित्येक कलाकार असत, शिवाय अल्लादिया खाँ, अब्दुल करीम खाँ, फैयाझ खाँ, विलायत हुसेन खाँ, मंजी खाँ, भेंडीबाजारवाले अमान अली खाँ, बडे गुलाम अली खाँ इ. मुसलमान गायकही अत्यंत भक्तिभावाने, श्रद्धेने गात असत. काशीकर, राशिनकर, निजामपूरकर यांसारखे विख्यात कीर्तनकार व बाई सुंदराबाई, यल्लूबाईंसारख्या मातब्बर लावणी व ठुमरी गायिकाही इथे गात.

त्या काळी अहोरात्र चालणार्‍या मैफलींत रसिकाग्रणी आबासाहेब ताठ बसून एकाग्र चित्ताने, रसिकतेने ऐकत असत आणि त्यांची पगडी डोलू लागली की कलाकारास खरे स्फुरण मिळे व अन्य श्रोत्यांनाही प्रस्तुती दर्जेदार असल्याची खात्री पटे. उदार, रुबाबदार  व भारदस्त व्यक्तित्व असणारे आबासाहेब कुठल्याच कलाकारास विन्मुख करीत नसत. शिकाऊंपासून ते तरबेज कलावंतांना ते समभावनेने ऐकत.

आबासाहेब हे एक वाद्यसंग्रहक व वाद्यवादकही होते. त्यांच्या संग्रहात पन्नासहून अधिक तंतु-सुषिर-अवनद्ध व घनवाद्ये होती, आणि रुद्रवीणा, स्वरमंडळ, स्वरशृंगार, सतार, सरोद, इसराज, सारंगी इ. तंतुवाद्ये ते स्वत: वाजवत. अनेक परदेशी अभ्यासकही त्यांच्याकडून भारतीय वाद्यांची माहिती घेत असत. प्रामुख्याने गायकीचे वर्चस्व असणार्‍या मराठी रसिकांमध्ये वाद्यवादनाबद्दल आस्था निर्माण करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. अनेक कलाकारांची बाडे त्यांनी संग्रहित केली व सुमारे ३५,००० दुर्मिळ रचनांचा संग्रह केला, ज्यांत धृपद, ख्याल, ठुमरी, टप्पा, लावणी, भजन या प्रकारांच्या शेकडो रचना आहेत.

अनेक भाषांचा अभ्यास असणार्‍या आबासाहेबांच्या संग्रहात संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, न्य भारतीय व युरोपीय भाषांतील संगीत विषयक दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, पोथ्या, कोशग्रंथ होते व त्यांचा उपयोगही त्या काळातील अनेक संशोधक कलाकार करत असत.

त्यांनी संगीत विषयक स्फुटलेखनही केले. १९१९ साली पुणे येथे भरलेल्या पहिल्या प्राच्यविद्या परिषदेत त्यांनी ‘कालिदास आणि संगीत’ हा निबंध वाचला होता. ‘वाद्यांचा इतिहास’ ही त्यांची लेखमाला दै. ‘केसरी’मध्ये १९६२-६३ साली प्रकाशित झाली. त्यांनी लिहिलेले ‘रागांची प्राचीनता’, भिन्नषड्ज व बिलावल रागांवर टिपण, ‘श्री समर्थ रामदास आणि संगीत’, ‘दिवाळी आणि संगीत’, ‘निसर्ग आणि संगीत’, ‘संगीत आणि मराठी वाङ्मय’, ‘गांधर्व महाविद्यालय व संगीतलेखन पद्धती’, ‘वाद्यसंगीताचे मानकरी गं.भि. आचरेकर’, ‘डिस्कव्हरी ऑफ ए न्यू कॉमेंटरी ऑन दी संगीत मकरंद’, इ. निबंध वेळोवेळी नियतकालिकांतून प्रकाशित झाले होते. ‘पठ्ठे बापूराव कृत ढोलकीच्या लावण्या’, मिराशीबुवांची ‘भारतीय संगीत माला’ अशा ग्रंथांना त्यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभल्या होत्या.

आबासाहेबांचा लावणीचाही उत्तम अभ्यास होता. त्यांना अनेक जुन्या लावण्या पाठ होत्याच, शिवाय लावणी-तमाशातील अनेक कलावंतांना त्यांनी मदतही केली. तत्कालीन मुंबई सरकारने तमाशावर बंदी आणली तेव्हा त्यांनी विरोध केला व तमाशा सुधारणा समितीत ते कार्यरत होते. पुण्यातील आर्यभूषण थिएटरमध्ये झालेल्या महाराष्ट्र तमाशा परिषदेच्या अधिवेशनात सत्तरीच्या वयात आबासाहेबांनी अस्सल ढंगाच्या लावणीचा टचका ऐकवून थक्क केले होते.

अभिजात नृत्याविषयी उदासीन असणार्‍या महाराष्ट्रात रोहिणी भाटे, सौदामिनी राव इ.नर्तिकांना प्रोत्साहन देऊन नृत्याच्याही संवर्धनात त्यांनी मदत केली. ‘‘महाराष्ट्र म्हटले की मास्तर कृष्णा, आबासाहेब मुजुमदार आणि प्रभात फिल्म कंपनी या तीनच ‘संस्था’ मला आठवतात,’’ असे गौरवोद्गार प्रख्यात बंगाली संगीतकार आर.सी. बोराल यांनी काढले होते.

प्रदीर्घ,आरोग्यपूर्ण आयुष्य लाभलेल्या आबासाहेबांचा वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी पुण्यात मृत्यू झाला. त्यांचे नातू प्रतापराव व नातसून अनुपमा मुजुमदार यांनी मुजुमदारवाड्यात संग्रहालय करून अभ्यासकांना ते उपलब्ध केले आहे, तसेच ‘स्वरसंगत सरदार’ हा चरित्रात्मक लेखसंग्रहही प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या वाड्यावर पुणे ऐतिहासिक वास्तू समितीने मानाचा नीलफलक लावला असून त्यांच्या नावाने पुणे भारत गायन समाजातर्फे पुरस्कारही दिला जातो.

चैतन्य कुंटे

मुजुमदार, गंगाधर नारायण