Skip to main content
x

निडमूर्ती, गोपालकृष्ण

एन. गोपालकृष्ण

        निडमूर्ती गोपालकृष्ण यांचा जन्म आंध्र प्रदेशात पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम् या गावी एका मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचा मुख्य व्यवसाय शेती होता व ते गावचे पटवारी म्हणूनही काम पाहत होते. गोपाळकृष्ण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भीमावरम् येथेच झाले. त्यांनी १९३७मध्ये पुण्याच्या कृषी महाविद्यालयात बी.एस्सी.(कृषी)साठी प्रवेश घेतला. ते एक हुशार व अभ्यासू विद्यार्थी असल्यामुळे महाविद्यालयातील प्रत्येक वर्षाच्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पदवी परीक्षेतही ते १९४१मध्ये प्रथम वर्गात विशेष प्रावीण्यासह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सुवर्णपदकाचेही मानकरी ठरले होते. त्यांची हुशारी व कामातील तडफ पाहून त्या वेळच्या शासनाने त्यांना १९४६मध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी अमेरिकेत इलिनॉय विद्यापीठात उद्यानशास्त्रातील एम.एस. पदवीसाठी प्रतिनियुक्तीवर पाठवले. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दरम्यानही त्यांनी भाजीपाल्याचे नवीन वाण शोधून आपल्या कामाची चमक दाखवली व त्यावर ४ शोधनिबंध प्रसिद्ध केले. इलिनॉय विद्यापीठाने त्यांचा या कामाबद्दल खास बहुमानही दिला.

        गोपालकृष्ण मूळचे आंध्र प्रदेशातील असले तरी त्यांचा संपूर्ण सेवाकाल महाराष्ट्रातच गेला. ते पुण्यातच कायमस्वरूपी स्थायिक झाले. तत्कालीन तहसीलदारांच्या सुविद्य कन्या कमलाकुमारी यांच्याशी १९३७मध्ये त्यांचा विवाह झाला.

        गोपालकृष्ण हे जरी विशेष प्रावीण्यासह पदवीधर झालेले असले तरी, त्यांना नोकरीची सुरुवात मात्र अगदी सामान्य स्तरावरून  (युद्धजन्य परिस्थितीमुळे नोकरभरती बंदीमुळे) करावी लागली. त्यांनी कृषी खात्यातील नोकरीची सुरुवात १९४१मध्ये कृषी महाविद्यालयाच्या दुग्ध विभागात पहारेकरी व नंतर कृषी साहाय्यक म्हणून केली; तथापि १९४२मध्ये त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून त्यांना पाडेगाव संशोधन केंद्रावर साहाय्यक पैदासकार म्हणून तांत्रिक पदावर काम करण्याची संधी मिळाली. येथे केलेल्या संशोधनावर आधारित त्यांनी ४ शोधनिबंध प्रसिद्ध केले. याच कामाचे बक्षीस म्हणून त्यांना अमेरिकेत पदव्युत्तर प्रशिक्षणाची संधी मिळाली. पाडेगाव केंद्रावरून १९४५मध्ये त्यांची पुण्यास भाजीपाला संशोधन योजनेत गणेशखिंड येथे बदली झाली. अमेरिकेतून परत आल्यानंतर परत गणेशखिंड येथेच कृषी अधिकारी (भाजीपाला पैदासकार) म्हणून काम करत असताना त्यांनी टोमॅटो व वांग्याचे वाण विकसित करण्याचे काम केले.

        याच काळात ते महाविद्यालयात निर्देशक (डेमॉनस्ट्रेटर) म्हणूनही काम करत असत. १९५१मध्ये वडगाव (मावळ) भात संशोधन केंद्रावर बढतीवर भात पैदासकार म्हणून व १९५४मध्ये भात संशोधन केंद्र कर्जत येथे वर्ग-२ व काही काळातच वर्ग-१चे अधिकारी म्हणून बढती मिळून कर्जत येथे प्रभारी संशोधन अधिकारी म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. वडगाव व कर्जत येथील भात संशोधनात व नवीन वाणनिर्मितीच्या कामात त्यांचा मोठा वाटा होता. वडगाव येथे काम करत असताना १९५२-५३मध्ये रशियाचे त्या वेळचे पंतप्रधान निकिता कु्रश्चेव यांनी केंद्रास भेट देऊन गोपालकृष्ण यांच्या कामाचे कौतुक केले होते. त्यांचा अनुभव व शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन १ जुलै १९५६ रोजी त्यांची उद्यानशास्त्राचे राज्यस्तरीय विशेषज्ञ म्हणून ‘उद्यानविद्यावेत्ता’ या पदावर नेमणूक झाली. राज्यातील सर्व उद्यान संशोधन केंद्रांवरील संशोधनाची आखणी, नियोजन, मार्गदर्शन व अंमलबजावणी याबरोबरच पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील उद्यानविषयक पदवी व पदव्युत्तर कार्यक्रमाची जबाबदारीही त्यांच्यावर होती.

        चिकित्सक दृष्टी, शेतकर्‍यांच्या प्रश्नांची जाण, मृदू स्वभाव व उमद्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांचा सर्वसामान्य शेतकर्‍यांशी चांगला संपर्क होता. त्यांच्या विकास प्रयत्नांमुळेच द्राक्ष बागायतीचे क्षेत्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व झपाट्याने वाढले. अगदी विदर्भातही जळगाव, जामोद, पुसद, अकोला, चिखली येथेही त्यांनी द्राक्ष बागायत विकसित करून दाखवली. द्राक्षामध्ये छाटणी व वळण देण्याच्या पद्धतीमध्ये संशोधनांती बदल केले.

        सुरुवातीस खांबाच्या आधाराने आडव्या तारांवर द्राक्षवेलींना वळण दिले जात असे. त्यात त्यांनी संशोधनांती बदल करून प्रथम दूरध्वनीच्या तारांप्रमाणे तीन तारांची व नंतर सलग तारांची ‘मंडप’ वळण पद्धत (ओव्हरहेड वायर ट्रेलिज) विकसित केली. आजही सर्वदूर द्राक्ष लागवडीत वेलींना वळण देण्यासाठी मंडप पद्धतच वापरली जाते. प्रा. गोपाळकृष्ण व प्रा. फडणीस यांना महाराष्ट्रातील यशस्वी द्राक्ष बागायतीचे जनक म्हणावे लागते. त्यांच्या या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने त्यांना सल्ल्यासाठी विशेष निमंत्रित केले होते. त्यांनी संशोधनावर आधारित जवळजवळ ४० शोधनिबंध व शास्त्रीय लेख प्रसिद्ध केलेले आहेत.

        त्यांनी राज्याचे उद्यानविद्यावेत्ता म्हणून सहा वर्षे काम केल्यानंतर २३ नोव्हेंबर १९६२पासून बढतीवर अकोला येथील कृषी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांनी त्या कालावधीत महाविद्यालयांच्या इमारतींची उभारणी, विविध विभाग व त्यांच्या प्रयोगशाळांचा, प्रक्षेत्रांचा विकास ही कामे जलदगतीने यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेली. त्यांनी १९६८मध्ये महाराष्ट्रातील पहिल्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक म्हणूनही काम पाहिले. डॉ. पं.दे.कृ.वि.ची स्थापना झाल्यानंतर त्यांनी १९६९मध्ये कृषी शाखेचे अधिष्ठाता म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्याचप्रमाणे ऑक्टोबर १९७२ ते जून १९७८ अशी सहा वर्षे या कृषी विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू म्हणून काम पाहिले.

        प्रा. गोपालकृष्ण यांचा कृषिशास्त्राप्रमाणेच ज्योतिषशास्त्राचाही दांडगा अभ्यास होता. या विषयावरही त्यांनी १० अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध केले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांची धाडसी वृत्ती व परोपकारी स्वभाव होय. वयाच्या ८५व्या वर्षी गोपालकृष्ण यांचे पुणे येथे निधन झाले.

- प्रा. भालचंद्र गणेश केसकर

निडमूर्ती, गोपालकृष्ण