Skip to main content
x

नवज्योत, अल्ताफ मोहम्मदी

मांडणशिल्पकार

मांडणशिल्प कलाकार (इन्स्टॉलेशन आर्टिस्ट) नवज्योत अल्ताफ मोहम्मदी या काश्मीरी कलावतीचा जन्म मीरत येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पृथ्वीसिंग व आईचे नाव रिपुदमन होते. नवज्योत यांचे शालेय शिक्षण जम्मू येथील मेरठ-दुर्गावाडी-शांतिनिकेतन शाळेत झाले. त्यांनी १९६७ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे उपयोजित कला व फाइन आर्ट या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला व १९७२ मध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला. जे.जे.मध्ये असताना सहाध्यायी व शिक्षक यांच्याशी त्यांच्या वैचारिक चर्चा होत असत. कधीकधी वासुदेव गायतोंडे, के.के. हेब्बर, अकबर पदमसी हेदेखील चर्चेमध्ये सहभागी होत. या चर्चासत्रांमधून त्यांना जगाचा कला-इतिहास व त्यांतील विविध प्रवाह यांबद्दल जाण आली. वैचारिक मंथनास चालना मिळाली.

जे.जे.च्या शेवटच्या वर्षास असताना त्यांचा मोहम्मदी अल्ताफ यांच्याशी परिचय झाला. अल्ताफ हे मार्क्सवादाचे अनुयायी होते. त्यांच्यामुळे नवज्योत मार्क्सवादाकडे आकृष्ट झाल्या. त्या १९७२ मध्ये  अल्ताफ यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. मार्क्सवादाच्या प्रभावामुळे त्यांनी सामाजिक बांधीलकी म्हणून १९७२-१९७७ या कालावधीत अपंग मुलांच्या शाळा, फिरती पाळणाघरे इत्यादी ठिकाणी काम केले. प्रोग्रेसिव्ह यूथ मूव्हमेंट (प्रोयोम) या समाजसेवी संस्थेसाठीही त्यांनी काम केले व त्यांच्यातर्फे प्रकाशित होणार्‍या ‘ललकार’ या नियतकालिकासाठी इलस्ट्रेशन्स काढली. त्यांना १९७१ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक कलाप्रदर्शनात विद्यार्थी विभागाचा पुरस्कार मिळाला. त्यांना १९८० मध्ये महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन व १९८३ मध्ये नवी दिल्ली येथील ऑल इंडिया फाइन आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटीचा पुरस्कारही मिळाला.

मार्क्सवादी विचारसरणीस अनुसरून कोणत्याही खासगी कलादालनात प्रदर्शन भरवायचे नाही असे सुरुवातीच्या काळात त्यांनी ठरविले आणि अल्ताफ व इतर मित्र-मैत्रिणींसमवेत मुंबईतील गिरण्या, कारखाने अशा ठिकाणी त्या प्रदर्शने भरवू लागल्या. त्यात विविध माध्यमांचा वापर करून संकल्पनाधिष्ठित कला सादर केली जाई.

त्यांच्या सुरुवातीच्या काळातील प्रदर्शनांचे विषय व मांडणी ही सहजसोपी व लोकाभिमुख असे. त्यात बहुधा कृष्णधवल चित्रे असत (उदा. ‘फ्लॉवर सेलर’,  १९७६) व मांडणीसाठी वापरलेली माध्यमेही सहज उपलब्ध होणारी व कमी खर्चिक असत. पुढे मात्र त्यांची मांडणी व विषयांच्या अभिव्यक्तीची पद्धत यांत क्लिष्टता व गुंतागुंत आलेली दिसते. त्यांच्या कलाकृतींमध्ये १९७० पासून  चौकटीचा वापर केलेला दिसतो (उदा. ‘मी मायसेल्फ’). वास्तवाची चौकटबद्धता दर्शविण्यासाठी हा चौकटीचा वापर असतो. त्यांनी १९७८ पासून कलाकृतींमध्ये स्वप्रतिमा वापरावयास सुरुवात केली. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना सरकारने १९८१ मध्ये ऐन पावसाळ्यात अनधिकृत झोपडपट्ट्या जमीनदोस्त करून तेथील रहिवाशांना उघड्यावर आणले. या घटनेवर आधारित ‘पेव्हमेंट्स’ या कलाकृतीमध्ये चौकटींद्वारा मनुष्याभोवती आकसत चाललेले अवकाश दर्शविले आहे.

त्यांनी कलाजगतात होणारी स्त्री-कलाकारांची कुचंबणा व मुस्कटदाबी १९८६-८७ मधील ‘कन्फ्रन्टेशन’, ‘प्रोसेस ऑफ सेल्फ-अॅनॅलिसिस’ व ‘अॅक्ट्रेस’ या मांडणशिल्पांद्वारे व्यक्त केली आहे. फ्रान्सिस बेकन या पाश्‍चात्त्य चित्रकाराशी साधर्म्य असलेल्या, विरूपीकरण केलेल्या बीभत्स स्त्री-प्रतिमा व त्याच चित्रात पुरुष प्रतिमेची उपस्थिती अशा चित्रणातून त्यांनी हे व्यक्त केलेले दिसते. (उदा. ‘ट्रिब्यूट टू ए पेंटर आय अॅडमायर’, १९९२). काही कलाकृतींत पुरातन कलेतील स्त्री-प्रतिमा किंवा शिल्पे, देवता, झाशीची राणी किंवा तत्सम वीरांगना अथवा प्रसिद्ध स्त्रियांच्या प्रतिमा वापरल्या आहेत. पुरुषांना अपेक्षित असलेल्या स्त्री-प्रतिमेतली विसंगती दाखवूनही त्यांनी हेच प्रतिपादन केलेले दिसते. (उदा. ‘इमेजेस ऑफ वूमन’). याच सुमारास त्यांनी स्त्रीच्या संदर्भात लैंगिकता, हिंसा इत्यादी विषयही हाताळले.

त्यांनी १९९३ नंतरच्या प्रदर्शनांतून सामाजिक विषयांचा त्याग केला व त्या आत्मशोध घेऊ लागल्या. अंतर्मुख होऊन, स्वत:चा शोध व स्वत:चे या विश्‍वातील स्थान यांविषयी भाष्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसतो. त्यांनी १९९४ मध्ये भरविलेल्या मांडणशिल्पांच्या ‘लिंक्स डिस्ट्रॉइड अ‍ॅण्ड रिडिस्कव्हर्ड’ या प्रदर्शनातून सर्जनशील कलावंतांची आपल्या समाजात होणारी कुचंबणा व अवहेलना हा विषय मांडला होता. लाकडी चौकटींवर असलेल्या भोकांमधून शेकडो मीटर्स लांबीचा काळी, प्लॅस्टिकची नळी फिरवून गुंता निर्माण करून मग त्यातूनच लाल रंगाची नळी फिरवून झालेल्या गुंत्यातून त्यांनी ही कुचंबणा व्यक्त केली होती. त्यांनी ‘आय हॅव नो फेट लाइन्स - थँक गॉड : १९९५’ या प्रदर्शनात दैवाचे अवडंबर व त्यापुढे हतबल होण्याची

मानवी प्रवृत्ती यांवर भाष्य करणारी मांडणशिल्पे सादर केली होती.

छत्तीसगडमधील खेडे-गावातल्या आदिवासी कारागीर आणि ग्रामीण चित्रकारांना बरोबर घेऊन नवज्योत यांनी काही संयुक्त प्रकल्प राबविले. विशेष म्हणजे, या उपक्रमामध्ये त्यांनी ग्रमीण कला आणि कलाकारांना आधुनिक कलाकारांप्रमाणेच सन्मानाने स्थान दिले. दृश्यकलेची माध्यमे, लोककला आणि आधुनिक कलाजाणिवा यांचा संयोग करीत सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडण्याचा हा प्रयत्न होता. यातील एक महत्त्वाचे प्रदर्शन मुंबई येथील ‘साक्षी’ गॅलरीत १९९८ च्या दरम्यान भरले होते व नवज्योत यांच्या सोबत हे आदिवासी कलावंतही त्यास उपस्थित होते.

भारतात, तसेच इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान इत्यादी ठिकाणी भरणार्‍या प्रतिष्ठित द्वैवार्षिक-त्रैवार्षिक कलाप्रदर्शनांमध्ये बर्‍याच वेळा नवज्योत यांची मांडणशिल्पे प्रदर्शित केली गेली आहेत. कलाविषयक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आपले निबंध सादर केले आहेत.  सध्या त्या मुंबई येथे स्थायिक असून मुंबई व बस्तर हे मध्य भारतातील आदिवासी खेडे, अशा दोन्ही ठिकाणी त्या कलासाधना व कलानिर्मिती करत असतात.

- डॉ. गोपाळ नेने

संदर्भ: १. संबराणी, चैतन्य; नवज्योत यांच्यावरील लेख; ‘एक्स्प्रेशन्स अॅण्ड इव्होकेशन्स’ या पुस्तकातून; ‘मार्ग’ प्रकाशनसंस्था. २. त्यांच्या प्रदर्शनांचे कॅटलॉग्स व त्यांतील लेख. ३. नवज्योत यांच्याशी प्रत्यक्ष बातचीत.

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].