Skip to main content
x

पालेकर, अमोल कमलाकर

भिनेता आणि दिग्दर्शक म्हणून परिचित असलेले अमोल कमलाकर पालेकर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून १९६५ साली ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंगया विषयात पदवी मिळवली. तर १९६६ मध्ये त्यांनी म्युरल पेंटिंगचा पदव्युत्तर शिक्षणक्रम पूर्ण केला. मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील १९६७-१९८० या काळातले एक महत्त्वाचे दिग्दर्शक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. आधी सत्यदेव दुबेंंच्या थिएटर युनिटमधून आणि नंतर स्वत: स्थापन केलेल्या अनिकेतया नाट्यसंस्थेमार्फत त्यांनी चाकोरीबाहेरची, वेगळ्या धाटणीची नाटके सादर केली. तोवर दर्शनी रंगमंचाच्या (Proscenium Arch) चौकटीत वावरणाऱ्या मराठी नाटकाला त्याबाहेरच्या मुक्त अवकाशात आणण्याचे महत्त्वाचे काम ज्या नाट्यकर्मींनी केले, त्यामध्ये पालेकरांचे स्थान अग्रगण्य मानले जाते. तसेच इतर भारतीय भाषांमधल्या नाकटकारांच्या नाटकांची महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना ओळख करून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.

अमोल पालेकर यांनी १९६७ पासून बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला सुरुवात केली. याच काळात त्यांनी बासू चटर्जी यांच्या रजनीगंधा’ (१९७४) या चित्रपटात नायकाची भूमिका केली. त्यातूनच त्यांची शेजारचा सखासोबतीअशी मोहक प्रतिमा निर्माण झाली. साधासुधा, सरळ, मध्यमवर्गीय नायक आणि प्रेमात उडणारी त्याची त्रेधातिरपीट हाच या प्रतिमेचा गाभा होता. रजनीगंधापाठोपाठ आलेल्या छोटीसी बात’ (१९७५), ‘चितचोर’ (१९७६), ‘दामाद’ (१९७८), ‘बातो बातों में’ (१९७९), ‘गोलमाल’ (१९७९), ‘अपने पराये’ (१९८०) या चित्रपटांतून त्यांची ही प्रतिमा अधिकच लोकप्रिय झाली. याच प्रतिमेद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्या काळातील त्यांच्या समकालीन नायकाच्या अवास्तव व उत्तुंग प्रतिमेला त्यांच्या या साध्या, सरळमार्गी प्रतिमेने आव्हान देऊन यशस्वीरीत्या छेद दिला. या प्रतिमेपलीकडे जाऊन त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भूमिका’ (१९७७), बिल्पव रॉय चौधरींच्या स्पंदन’ (१९८३), तपन सिन्हांच्या आदमी और औरत’ (१९८४), कुमार शहानींच्या तरंग’ (१९८४), आणि विधू विनोद चोप्रा यांच्या खामोश’ (१९८५) यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या सशक्त अभिनयाचे दर्शन घडवले. सर्वोत्कृष्ट अभिनेताम्हणून त्यांना तीन वेळा फिल्मफेअरव सहा वेळा राज्य पुरस्कार मिळाले.

हिंदी-मराठीसह बंगाली, कन्नड, मल्याळम व इंग्रजी चित्रपटांतही अभिनेता म्हणून त्यांची कारकिर्द लक्षणीय ठरली. मराठीत पदार्पणातल्या शांतता कोर्ट चालू आहे’ (१९६७) नंतर बाजीरावचा बेटा’ (१९६९), ‘तूच माझी राणी’ (१९७७) आणि स्वत: दिग्दर्शित केलेल्या आक्रीत’ (१९८०) व समांतर’ (२००८) या चित्रपटांमधून त्यांच्या समर्थ अभिनयाचा प्रत्यय आला. मदर’ (१९७९), ‘कलंकिनी’ (१९८१) व चेना अचेना’ (१९८३) या बंगाली भाषेतील चित्रपटांतील भूमिकांमुळे ते बंगालीतही लोकप्रिय झाले. कनेश्वर रामा’ (१९७७) व पेपर बोट्स’ (१९८०) या कन्नड, तसेच ओळगंल’ (१९८४) या मल्याळी भाषेतल्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. अभूतपूर्व लोकप्रियता आणि समीक्षकांकडून मन:पूर्वक स्वागत होत असतानाच या चतुरस्र अभिनेत्याने १९८६ नंतर अभिनयाची कारकीर्द थांबवून चित्रनिर्मितीचा ध्यास घेतला व संपूर्ण लक्ष दिग्दर्शनाकडे वळवले.

आक्रीत’ (१९८०) या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अमोल पालेकर यांनी चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रथम पाऊल ठेवले. त्या काळी महाराष्ट्रात गाजलेल्या मानवत हत्याकांडाच्या सत्य घटनेवर आधारित चित्रपटातील हत्याकांडाच्या पडद्यामागील सूत्रधाराची त्यांची खलनायकी भूमिका विशेष गाजली. फ्रान्समधील नान्तच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे स्पेशल ज्युरी पारितोषिक पटकवणारा हा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर पालेकर यांनी सार्थया बॅनरखाली प्रथम चित्रा पालेकर व नंतर संध्या गोखले यांच्या साहाय्याने तीन भाषांत १६ चित्रपट निर्माण केले.

आक्रीतनंतर अनकही’ (१९८४), ‘थोडासा रुमानी हो जाएं’ (१९९०), ‘दायरा’ (१९९६), ‘कैरी’ (२०००), ‘कल का आदमी’ (२००१), ‘पहेली’ (२००५), ‘दुमकटा’ (२००८) हे हिंदी चित्रपट; तसेच बनगरवाडी’ (१९९५), ‘ध्यासपर्व’ (२००१), ‘अनाहत’ (२००३), ‘थांग’ (२००६), ‘समांतर’ (२००९), ‘धूसर’ (२०१०)  आणि वी आर ऑन होऊन जाऊ द्या’ (२०१३) हे मराठी चित्रपट दिग्दर्शित केले. याशिवाय क्वेस्ट’ (‘थांगची इंग्रजी आवृत्ती - २००६) आणि अ‍ॅन्ड वन्स अगेन’ (२००९) हे इंग्रजी चित्रपट निर्माण केले.

अमोल पालेकर यांच्या अनेक चित्रपटांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. तसेच दर वर्षी भरणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय महोत्सवातील इंडियन पॅनोरामासाठी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांची हमखास निवड झाली आहे. १९९६ साली अमेरिकेतल्या टाईम मासिकाने जगातील त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांच्या यादीदायराची निवड केली होती; फ्रान्समधल्या व्हॅलेन्सिए आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ग्रां-प्रीसन्मानही प्राप्त झाला होता. २००६ साली ७८ व्या आवृत्तीमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या पारितोषिकासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पहेलीहा चित्रपट पाठवण्यात आला होता. त्यांच्या काही चित्रपटांचे जागतिक प्रिमियरआंतरराष्ट्रीय महोत्सवात झाले आहेत, तर ब्रिस्बेन, पुसान, बँकॉक, टोरान्टो, तेहरान, कार्लोव्ही, कैरो, लंडन अशा जगविख्यात महोत्सवासाठी त्यांच्या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

स्त्रीचे भावनिक विश्व, त्याची अतिशय तरलपणे केलेली मांडणी व स्त्री-पुरुष संबंधातील विविध पैलूंचा शोध हा त्यांच्या चित्रपटातील विषयांचा मुख्य गाभा राहिला आहे. विशेषत: स्त्रीच्या संवेदनाशील व्यक्तिरेखेचा विस्तार त्यांच्या चित्रपटात आढळतो. थांगमधील समलिंगी नवऱ्यास नाकारणारी सुशिक्षित सई, आपल्या रखेलपणाविरुद्ध बंड करणारी आक्रीतमधील रुही, आपला नवरा नाही हे माहीत असूनदेखील त्याच्यासारखा दिसणाऱ्या प्रियकराला स्वीकारणारी पहेलीतील लच्छी, स्वत:च्या लैंगिक भावनांची जाणीव व्यक्त करणारी अनाहतमधील राणी शीलवती, ‘अल्झायमर्ससारख्या असाध्य रोगाचा सामना करणारी धूसरमधील अव्वा आणि नवऱ्याच्या संततीनियमनाच्या एकांड्या ध्यासात स्वत:च्या मातृत्वाला तिलांजली देणारी ध्यासपर्वमधील मालती कर्वे... अशा एक ना अनेक चित्रपटांतील स्त्री व्यक्तिरेखा, त्यांतील स्त्रीचे स्वयंपण, तिच्या अपारंपरिक जाणिवा आणि तिच्या स्वीकार-नकारातील ताण-तणावांचे सर्जनशील चित्रण त्यांनी आपल्या चित्रपटातून केले. त्यासाठी कधी जी.ए. कुलकर्णी, व्यंकटेश माडगूळकर, चि.त्र्यं. खानोलकर व विजयदान देथा अशा साहित्यिकांच्या अभिजात साहित्यकृतींचा आधार घेतला आहे, तर कधी समाजातल्या ज्वलंत, भिडणाऱ्या मुद्द्यांभोवती गुंफलेल्या कलाकृती निर्माण करून समाजभाषेशी चित्रपटभाषेचा मेळ घातला आहे.

चिल्ड्रन फिल्म सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना अमोल पालेकर यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय बालचित्रमहोत्सव भरवण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या प्रभात चित्रमंडळया फिल्म सोसायटीचे अध्यक्षस्थानही त्यांनी काही काळ भूषवले होते. मुंबई अ‍ॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज’ (मामी) या संस्थेचे विश्‍वस्त-संस्थापक या नात्याने मुंबईत दर वर्षी भरवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मुहूर्तमेढही त्यांनी रोवली. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात ज्युरीया नात्याने काम पाहिले आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त कच्ची धूप’, ‘नकाब’, ‘मृगनयनी’, ‘कृष्णकलीया हिंदी आणि पाऊलखुणाही मराठी दूरचित्रवाणीमालिका अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केल्या. त्या वेळेस अनोळखी असलेल्या आणि आज नावारूपाला आलेल्या अनेक कलावंत-तंत्रज्ञ यांना पदार्पणाची संधी या मालिकांद्वारे मिळाली होती. याशिवाय, त्यांच्या अनेक चित्रपटांच्या पटकथाकार संध्या गोखले यांच्यासोबत त्यांनी सौंदर्यवादी गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर भिन्न षड्जहा जीवनपटही निर्माण केला आहे.

रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रांतील अमोल पालेकर यांची कामगिरी बहुआयामी आहे.  

- सतीश जकातदार

पालेकर, अमोल कमलाकर