Skip to main content
x

पाटील, विष्णू किसन

         विष्णू किसन पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण खेड्यातच झाले. जळगावहून इंटर सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात ते दाखल झाले. त्यांनी १९६२मध्ये पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर राज्य शासकीय सेवेत विस्तार अधिकारी या पदावर ५ वर्षे नोकरी केली. दरम्यान पाटणा येथील बिहार पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशु-पैदास या विषयावर त्यांनी १९६६मध्ये एम.व्ही.एस्सी. मिळवली. १९७४मध्ये त्यांनी हिस्सार येथील हरयाणा कृषी विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी मिळवली. सातारा जिल्ह्यातील शिरवळसारख्या ग्रामीण भागात पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी त्यांची निवड झाली आणि सहयोगी अधिष्ठाता म्हणून त्यांनी ही संस्था केवळ ३ महिन्यांत कार्यरत करण्याची कष्टसाध्य कृती करून दाखवली. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना पशुवैद्यकीय पदवी मिळवण्याची सोय झाली.

         डॉ.पाटील यांनी एम.व्ही.एस्सी.साठी गवळाऊ जातीच्या गाई-बैलांचा सखोल अभ्यास करून व निरीक्षणे घेऊन पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त उत्पादक घटकांचा परामर्श घेतला. तसेच पीएच.डी. पदवीसाठी विविध रक्तगटांच्या संकरित गाईंचा तुलनात्मक व सखोल अभ्यास मांडला. त्यांनी म.फु.कृ.वि.त, ‘अखिल भारतीय समन्वित शेळी संशोधन प्रकल्प’ राबवण्याचे कार्य केले. या प्रकल्पात अंगोरा या लोकर (मोहेर) उत्पादन करणाऱ्या शेळीच्या जातीचे संकर स्थानिक शेळीच्या जातीशी करून लोकर उत्पादन देणाऱ्या संकरित शेळ्यांची पैदास करण्याचे आव्हानात्मक संशोधन कार्य होते. या संशोधन प्रकल्पावर १४ वर्षे सातत्याने काम करून संकरित पैदाशीद्वारे देशी शेळ्यांच्या अंगावर लोकर वाढवण्याचे तंत्र प्रस्थापित केले. यासाठी ५०० स्थानिक शेळ्या व अमेरिकेहून आयात केलेल्या अंगोरा जातीच्या ५० शेळ्यांचा वापर केला गेला. यासाठी अद्ययावत गोठे, प्रयोगशाळा व वैरण उत्पादन सुविधा डॉ. पाटील यांनी महत्प्रयासाने निर्माण केल्या. शेळ्यांची लोकर अतिशय तलम व चमकदार असल्यामुळे तिला देश-परदेशात मोठी मागणी असते. त्यामुळे या संशोधन कार्याला बरीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. प्रकल्पातून तयार झालेले संकरित नर पैदाशीसाठी विविध ठिकाणी वाटप करण्यात आले. या संशोधन कार्याचे सविस्तर वृत्त विविध देशी व परदेशी नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्याचप्रमाणे त्यांनी या कार्याचा सविस्तर अहवाल जागतिक शेळी परिषदेमध्ये अमेरिका, तसेच इंग्लंडमध्ये शेळीपालक संघटनेमध्ये आणि रशियामध्ये सादर करून प्रशस्ती मिळवली. या प्रकल्पाला देशात पहिला क्रमांक मिळाला.

         डॉ. पाटील यांनी म.फु.कृ.वि. येथे पशु-पैदास, शेळ्या-मेंढ्यांचे संगोपन व उत्पादनवाढ, वैरण विकास या विषयांवर विविध संशोधन प्रकल्प यशस्वीपणे पार पाडले. त्यांचे सुमारे १०० संशोधन प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. या व्यतिरिक्त एक जिज्ञासा म्हणून डॉ. पाटील यांनी ‘वैदिक काळातील गो-संवर्धन’ या विषयावर ऋग्वेद व अथर्ववेद यातील श्‍लोकांच्या आधारे ‘गाईंची दूध देण्याची क्षमता कशी वाढवली जात होती’, याचा संशोधनात्मक आढावा घेतला आहे. त्यामुळे त्यांना पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल व्याख्यानमालेत या विषयातील व्याख्याता म्हणून मान्यता मिळाली. त्यांनी नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई व राहुरी कृषी विद्यापीठ येथे पदवीपूर्व, पदव्युत्तर व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

- डॉ. वसंत नारायण जहागीरदार

पाटील, विष्णू किसन