Skip to main content
x

पुजारी, धनंजय हरी

              खानदेशातील ‘वरणगाव’ हे धनंजय हरी पुजारी यांचे मूळ गाव होय. त्यांचे वडील हरिभाऊ वरणगावकर (१८८५ — १९५५) हे नावाजलेले गायक व पुजारी होते. हरिभाऊंनी ग्वाल्हेरच्या शंकर पंडित यांच्याकडून धृपद व ख्यालगायनाची तालीम घेतली होती, तसेच बीनकार बंदेअली खाँ यांचे शिष्य मुराद खाँ यांच्याकडे ते सतारही शिकले. ते तबलाही वाजवत.

              आपल्या वडिलांकडेच धनंजय पुजारी यांनी सतार, गायन व तबल्याचे शिक्षण घेतले. हे पिता-पुत्र अमरावतीजवळच्या शिरजगाव बंड येथे स्थायिक होऊन तेथे पुजारी म्हणून व्यवसाय करत, तसेच सतार वादनाच्या जुगलबंदीचेही कार्यक्रम करत.

धनंजय पुजारी यांनी प्रथम हैद्राबाद येथे आकाशवाणीवर नोकरी सुरू केली. ते १९४९ साली नागपूर आकाशवाणीवर रुजू झाले. सतार वादनातील आलाप-जोड-झाला, लयकारीयुक्त गतकारीवर त्यांचे प्रभुत्व होते. शेख दाऊद खाँ यांसारखे नावाजलेले तबलावादक त्यांची मनसोक्त साथ करत. अब्दुल हलीम जाफर खाँ, पं. संपतलाल, यशवंत देव यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.  १९६८ साली हिंगणघाट येथे त्यांना मानपत्र देण्यात आले होते. त्यांचे वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी नागपूर येथेे निधन झाले.  

 — वि.ग. जोशी

पुजारी, धनंजय हरी