Skip to main content
x

फडके, रघुनाथ पुरुषोत्तम

            घुनाथ पुरुषोत्तम फडके १९५०मध्ये पुण्याच्या नूतन मराठी प्रविद्यालयातून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. सेवेत असतानाच त्यांना मुंबई विद्यापीठाची एम.एस्सी. ही पदवी व नंतर पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी मिळाली. त्यांनी १९५४मध्ये महाबळेश्‍वर येथे मधुमक्षिका संशोधन संस्था या महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या संस्थेतून मधमाशापालनविषयक ६ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याच संस्थेत त्यांनी १५ ऑक्टोबर १९५४पासून कनिष्ठ संशोधन साहाय्यक म्हणून नोकरी सुरू केली. नंतर ते पुण्याला केंद्रीय मधुमक्षिका संशोधन या अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग आयोगाने स्थापन केलेल्या संस्थेत तांत्रिक निरीक्षक म्हणून रुजू झाले. १६ ऑक्टोबर ७१ रोजी प्रथम संस्थेचे उपनिदेशक आणि १ एप्रिल १९८१ रोजी निदेेशक म्हणून बढती मिळाली. या पदावरून ते ४ एप्रिल १९८८ रोजी निवृत्त झाले, परंतु त्यांनी १ जानेवारी १९९०पासून ३१ डिसेंबर १९९२पर्यंत मानद विशेष अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली.

            फडके यांनी सेवाकाळामध्ये प्रामुख्याने संस्थेच्या रसायनशास्त्र विभागामध्ये संशोधनाचे कार्य केले. मध, मेण व अन्य उत्पादनांच्या गुणवत्तेचे व दर्जाचे प्रमाणीकरण करण्यासंबंधीचे त्यांचे बहुमोल संशोधन या उत्पादनांच्या दर्जाविषयक अधिकृत भारतीय परिमाणे निश्‍चितीसाठी झाले. मधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मधातील आर्द्रता कमी करणे त्याच्या मधावरील संशोधनातून या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली.

            फडके यांनी मधमाशापालन व्यवस्थापन, तत्संबंधीची साधने व त्यांचे प्रमाणीकरण, पीक परागीकरणविषयक व्यवस्थापन, मोहोळांच्या स्थलांतरांचे तंत्रज्ञान, मधमाशांचे विष निष्कासन, मधुबन स्थापनेसाठी सर्वेक्षण, मधनिष्कासनानंतरची त्यावरील प्रक्रिया अशा अनेक विषयांवर महत्त्वाचे संशोधन केले. या विषयांवर त्यांचे ५०हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्याशिवाय त्यांनी ‘भारतीय मधमाशा व मधमाशापालन’ हे पुस्तक प्रकाशित केले. जागतिक फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या मधमाशापालन व्यवस्थापन विषयावरील पुस्तकासाठी एक लेख लिहिला आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत ‘एका प्रकल्पाच्या मधमाशांची उत्पादने’ याविषयीच्या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले.

            डॉ. फडके यांच्या या मूलभूत कार्यामुळे त्यांची इंडियन काऊन्सिल फॉर अ‍ॅग्रिकल्चर रीसर्च या मध्यवर्ती कृषी संशोधन परिषदेच्या अखिल भारतीय मधमाशा प्रकल्पाचे प्रभारी समन्वयक म्हणून नेमणूक झाली होती. भारतीय मधमाशापालक संघाचे ते आजीव सदस्य असून इंडियन बी जर्नल या त्रैमासिकाच्या संपादक मंडळाचे अनेक वर्षे सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्रातील मधमाशापालनासाठी एक व्यापक योजना तयार करून ते कृषी संचालनालय व केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या संपर्कात आहेत.

- डॉ. कमलाकर क्षीरसागर

फडके, रघुनाथ पुरुषोत्तम